आनंद सुधा बरसे…

0
255
  • रामनाथ न. पै रायकर

मराठी संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गोमंतकीय गायक-नट, रामदास कामत यांनी नुकतीच वयाची नव्वदी पार केली आहे. गत सहा दशके त्यांनी श्रोत्यांना आपल्या आवाजाने व अभिनयाने मंत्रमुग्ध केले आहे. त्यांचे जीवन आणि कारकिर्दीच्या कालखंडाशी रामनाथ न. पै रायकर यांनी साधलेला हा संवाद.

रामदास कामत यांच्या नावाचा उल्लेख होताच मराठी रंगभूमीच्या इतिहासाशी नाळ जुळलेल्या रसिकांच्या नजरेसमोर मराठी संगीत रंगभूमीवरील एक कुशल कलाकार उभा राहतो, जो महाराष्ट्राच्या तसेच गोव्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे. गोव्यामध्ये जन्मलेल्या कामतांनी एक उच्च श्रेणीचे मराठी रंगभूमीवरील गायक-नट म्हणून १९६० ते १९८० हा कालखंड गाजवला होता. या काळात त्यांनी अक्षरशः मराठी संगीत रंगभूमीवर राज्य केले, असेच म्हणावे लागेल.

रामदास कामत यांचा जन्म साखळीच्या कामत कुटुंबात झालेला असून त्यांचे वडील ग्रामदेवता श्री दत्तात्रयाच्या पालखी प्रदक्षिणेत ‘पेणी’ गात असत. मुळे त्यांना हा सांगीतिक वारसा वडील तसेच जात्यावर दळण दळताना पारंपरिक ओव्या म्हणणार्‍या त्यांच्या आईकडून लाभला होता. बालपणी त्यांनी त्यांचे वडील बंधू, उपेंद्र यांच्याकडून हिंदुस्थानी, शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्यांच्या बालपणी गावातील काही लोकांनी ‘बेबंदशाही’ हे मराठी ऐतिहासिक नाटक सादर करायचे ठरवले आणि त्यामध्ये काही गाण्यांचा समावेशदेखील केला. या नाटकात कामतांना एक छोटीशी भूमिका देण्यात आली होती ज्यामध्ये त्यांना दोन गाणी म्हणायची होती. संवादाच्या नावाने त्यांच्या वाट्याला जेमतेम पाच वाक्ये आली होती. काही काळाने कामत पुढील शिक्षणासाठी पणजीला आले आणि त्यांनी पीपल्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.

मॅट्रीकची परीक्षा दिल्यानंतर ते मुंबईला त्यांच्या मामाकडे-वैकुंठ नेवरेकर- उच्च शिक्षणासाठी जाऊन राहिले. मुंबईमध्ये कामत यांनी त्यांचे इकॉनॉमिक्स विषयातील पदवीपर्यंतचे शिक्षण विल्सन कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर लगेच त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये त्यांना यश मिळू शकले नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या मराठी बोलण्यावर साफ कोकणी भाषेची छाप जाणवत होती. शेवटी त्यांच्याच कॉलेजमधील मराठीचे प्राध्यापक, वा. ल. कुलकर्णी यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि मराठी भाषेतील बारकावे तसेच उच्चार शिकून घेतले.

मुंबईमध्ये वास्तव्य करून असलेल्या गोव्यातील ख्यातनाम व्यक्तींनी एकत्र येऊन द गोवा हिंदू असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. कामत यांचा या संस्थेच्या सदस्याशी संपर्क आला. याचे कारण म्हणजे सुप्रसिद्ध गोमंतकीय लेखक, जगन्नाथ सुखटणकर यांनी कामत यांची असोसिएशनच्या सदस्यांशी केलेली शिफारस! सुदैवाने सुखटणकरांनी एचएमव्हीच्या एका ध्वनिमुद्रिकेसाठी गोमंतकीय कवी उदय भेंब्रे यांनी लिहिलेली व कामतांनी गायलेली कोकणी गीते ऐकली होती. याच वेळेस द गोवा हिंदू असोसिएशन, नव्याने सुरू झालेल्या वार्षिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सहभागी झालेली होती आणि लागोपाठ बिनीचे पुरस्कार प्राप्त करीत होती. कामतांना ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकात एक छोटीशी भूमिका देण्यात आली. मात्र सुरुवातीला या भूमिकेच्या लांबीवरून त्यांनी ती नाकारली. पुढे त्यांच्या बंधूंच्या सल्ल्याने त्यांनी ती भूमिका स्वीकारायचे ठरवले. या नाटकातील त्यांचे ‘‘हृदयी धरा हा बोध खरा’’ हे गाणे इतके चांगले उतरले की प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दणाणून सोडले.

‘संशय कल्लोळ’ नंतर ‘शारदा’ सारख्या काही जुन्या काळातील अभिजात संगीत नाटकांमध्ये कामतांनी भूमिका केल्या. अर्थात ही नाटके द गोवा हिंदू असोसिएशनतर्फे सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. पुढे असोसिएशनने लवकरच कामत यांना पराशर ऋषींची भूमिका करण्यासाठी संस्थेच्या पहिल्यावहिल्या महत्त्वाकांक्षी ‘मत्स्यगंधा’ या नाट्यनिर्मितीसाठी निवडले. नाटकाचे लेखन वसंत कानेटकर यांनी केले होते तर संगीतकार, जितेंद्र अभिषेकी व दिग्दर्शक, मास्टर दत्ताराम हे गोमंतकीय स्नेही होते. आशालता वाबगांवकर यांनी १९६४ साली रंगमंचावर आलेल्या या नाटकात शीर्षक भूमिका साकारली होती. महाभारतामधील काही घटनांवर आधारलेल्या या नाटकातील कामत यांच्या ‘‘देवाघरचे ज्ञात कुणाला’’, ‘‘साद देती हिमशिखरे’’,‘‘गुंतता हृदय हे’’ आणि ‘‘नको विसरू संकेत मीलनाचा’’ अशा नाट्यगीतांनी त्यांना मराठी संगीत रंगभूमीवरील श्रेष्ठ कलाकारांच्या पंक्तीला नेऊन बसवले.
१९५३ ते १९६० या काळामध्ये कामत यांनी केंद्र सरकारच्या मुंबईतील अकाउंटंट जनरल कार्यालयात काम केले. १९६० मध्ये त्यांना एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी दुहेरी व्यवसाय पत्करताना सकाळ ते संध्याकाळपर्यंत कार्यकारी अधिकारी आणि संध्याकाळ ते सकाळ रंगभूमी कलाकार म्हणून वावरले.
‘मत्स्यगंधा’च्या यशानंतर कामतांवर नवनव्या संगीत नाटकांमधील भूमिकांचा वर्षाव झाला. त्यांनी त्यांपैकी ‘मदनाची मंजिरी’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘हे बंध रेशमाचे’ आणि ‘मीरा…. मधूरा!’ अशा नव्या नाटकांमधून, त्याचप्रमाणे ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘होनाजी बाळा’, आणि ‘एकच प्याला’ या जुन्या अभिजात नाटकांमधून काम केले. ही सर्व नाटके आणि त्यातील कामत यांच्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. कामत यांनी मुगल बादशहा अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध गायक तानसेनची भूमिका रंगवत, गोमंतकीय लेखक, गोपाळकृष्ण भोबे यांच्या ‘धन्य ते गायनी कला’ या नाटकांमध्येदेखील काम केले. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी यांनी रचलेली ‘‘दान करी रे’’, ‘‘करुणाकरा’’, आणि ‘‘चिरंजीव राहो’’ ही गाणी या नाटकाचे एका अभिजात निर्मितीमध्ये रूपांतर करण्यास कारणीभूूत ठरली. ही गाणी म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरील नाट्यसंगीताच्या तिजोरीतील मौल्यवान रत्नेच होय!

कामतांनी याच दरम्यान पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडून नाट्यसंगीताचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर त्यांना पं. जितेेंद्र अभिषेकी, भालचंद्र पेंढारकर आणि भीमसेन जोशी यांच्याकडून महत्त्वाचे सांगीतिक धडे मिळाले.
कामत यांनी१९७० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्‍वगायक म्हणून प्रवेश केला आणि तेथेही आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. या व्यतिरिक्त त्यांनी गायलेल्या भावगीतांमध्ये ‘‘अंबरातल्या निळ्या धनाची शपथ तुला’’, ‘‘हे आदिमा हे अंतिमा’’ आणि ‘‘सखी सांज उगवली’’ यासारख्या अप्रतिम रचनांचा समावेश आहे.
कामतांना त्यांनी मराठी संगीत रंगभूमीला दिलेल्या योगदानामुळे मिळालेल्या विष्णुदास भावे पुरस्कारापासून ते त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्राप्त झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारापर्यंत अनेक मानसन्मान लाभले आहेत.

कामतांनी आपला गहिरा, भारदस्त आवाज त्यांच्या वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत टिकवून ठेवत श्रोत्यांसाठी अनेक गाण्याच्या मैफिली रंगवल्या.मात्र आज वाढत्या वयामुळे त्यांना निवृत्तीकडे वळणे भाग पडले आहे. मात्र त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर गायलेल्या नाट्यगीतांमुळे त्याच्या नाटकांतल्या अभिनयामुळे आणि त्यांच्या नाटकांना लाभलेल्या लोकप्रियतेमुळे ते एका समृद्ध अशा सांगीतिक वारश्याचा अविभाज्य घटक बनलेले आहे, हे नाकारता येणार नाही.

कामत – भेंब्रे कोंकणी रचना

रामदास कामत यांनी उदय भेंब्रे यांची दोन कोंकणी गीते गायली आहेत. या दोन गाण्यांची ‘‘मंद वार्‍यावर दर्या ल्हारार’’ आणि ‘‘सूर्य गेला पलतडी’’… चंद्र आलतडी’’ – एम एम व्ही कंपनीने १९५० च्या दशकात ध्वनिमुद्रिका काढली होती. ही गीते नुसती लोकप्रियच झाली नाहीत तर त्यामुळे कामत यांच्यासाठी मराठी रंगभूमीचे द्वारही खुले झाले.
भेंब्रे याबद्दलची आठवणी सांगताना म्हणताना की प्रसिद्ध गोमंतकीय बासरीवादक श्रीधर केंकरे हे एचएमव्हीमध्ये कामाला होते आणि त्यांनी संगीत रचना केलेल्या दोन कोंकणी गाण्याची मुद्रिका निघाली होती. गोमंतकीय गायक उल्हास बुयांव यांनी गायलेली ही गाणी होती- उदय भेंब्रे यांचे ‘‘चान्न्याच्या राती’’ आणि मनोहरराय सरदेसाय यांचे ‘‘गोंयच्या म्हज्या गोंयकारांनो’’.
जेव्हा ही ध्वनिमुद्रिका तुफान लोकप्रिय झाली तेव्हा केंकरे यांनी एचएमव्ही कंपनीला आठ कोंकणी गीते असलेली एक ध्वनिमुद्रिका काढण्याचा प्रस्ताव दिला. भेंब्रे यांच्या सांगण्यानुसार सदर ध्वनिमुद्रिकेमध्ये रामदास कामत यांनी गायलेली व स्वतः भेंब्रे यांनी लिहिलेली दोन गाणी होती, तर त्यात आशालता वाबगांवकर यांनी म्हटलेली सहा गाणी होती ज्यामध्ये ‘‘काजाराचे उतोर तुका दिता’’ आणि‘‘मोगा पिशें जालां कशें’’ यांचा समावेश होता.
‘‘मी त्यावेळी कायद्याच्या शिक्षणासाठी मुंबईत होतो आणि मी केंकरे यांच्या विनंतीनुसार त्यांना माझी दोन गाणी दिली. या गाण्यांमध्ये ‘‘सूर्य गेला पलतडी… चंद्र आलतडी’’ आणि आणखी एका गाण्याचा समावेश होता’’ भेंब्रे म्हणाले.
भेंब्रे यांना आठवते की जेव्हा ते कामतांना भेटले तेव्हा त्यांनी भेंब्रे यांचे वडील लक्ष्मीकांत भेंब्रे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. लक्ष्मीकांत भेंब्रे हे स्वातंत्र्यसैनिक होते व १९५० च्या दशकात त्यांना गोव्यामधील तत्कालीन पोर्तुगीज सरकारने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी पोर्तुगालमधील तुरुंगात केली होती.
भेंब्रे यांच्या म्हणण्यानुसार कामतांनी त्यांना प्रस्तावित ध्वनिमुद्रिकेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘‘सागरा प्राण तळमळला’’ या ‘‘गीताच्या धर्तीवर एखादे गाणे लिहिण्याची विनंती केली. मात्र भेंब्रे यांनी सुरुवातीला आपल्यापाशी सावरकरांचे अनुभव तसेच त्यांची अलौकिक प्रतिभा नाही म्हणून कबूल केले व असे गीत लिहिण्यास असमर्थता दर्शवली. पुढे त्यांनी कामतांची विनंती मान्य करून ‘‘मंद वार्‍यार दर्या ल्हारार’’ हे गीत लिहिले, ज्यामधून कामत तसेच भेंब्रे या दोघांचाही त्यांचा मातृभूमीबद्दलच्या उत्कट प्रेमाचा श्रोत्यांना प्रत्यय आला.

नमन नटवरा….

रामदास कामत यांचा सतत मनोरंजनाच्या दुनियेत वापरण्यात येणार्‍या ‘‘द शो मस्ट गो ऑन’’ या वाक्प्रचारावर पूर्ण विश्‍वास होता. त्यांचे व्यावसायिक रंगभूमीवरील पहिले संगीत नाटक होते ‘मत्स्यगंधा’ आणि या नाटकातील गाण्यांसाठी त्यांनी श्रोत्यांकडून वारंवार ‘वन्स मोअर’ मिळवत उत्तुंग उंची गाठली होती. जेव्हा या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग ठरला तेव्हा कामतांच्या आईचे निधन झाले. तरी त्यांनी सदर प्रयोग रद्द न करता त्या रात्री प्रयोगात भूमिका केली. महाराष्ट्राचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, पु. ल. देशपांडे जे या प्रयोगाला प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते, त्यांना ही गोष्ट कळल्यावर ते सद्गदित झाले आणि त्यांनी उद्गार काढले की ‘‘मराठी रंगभूमी ही मंत्रितांची आहे, आमंत्रितांची नव्हे!’’ काही वर्षानंतर कामतांना आणखी एका नाटकामध्ये भूमिका करायची होती आणि त्यांच्या वडिलांची प्रकृती गंभीर झाली. कामत हे वेषभूषेसकट घरी गेले आणि वडिलांना बघून नाट्यगृहात परतले. नाटक संपल्यावर घरी जाईपर्यंत त्यांच्या वडिलांचे प्राणोत्क्रमण झाले होते. त्यानंतर बर्‍याच काळाने कामत यांना द गोवा हिंदू असोसिएशनच्या ९० व्या वर्धापनदिनासाठी गायन करायचे होते. यावेळी त्यांच्या पत्नी आजारी होत्या. कार्यक्रम करून कामत यांनी घराकडे धाव घेतली. पुढे काही तासांनी त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली. कामतांनी त्यांच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंगांचा धैर्याने सामना केला आणि त्यांच्या रंगभूमीशी असलेल्या निष्ठेशी कधीही तडजोड केली नाही.

सिनेपार्श्‍वगायन…

रामदास कामत यांनी मराठी चित्रपटांसाठीही काही गाणी गायली आहेत. त्यांपैकी ‘‘हे शिवशंकर गिरीजातनया’’ (थापाड्या) आणि ‘‘हे गणनायक, सिद्धिविनायक (पटलं तर व्हय म्हणा!) ही चित्रपटगीते लोकप्रिय झाली आणि आजही तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. ‘‘प्रथम तुज पाहता’’ हे उपशास्त्रीय ढंगाचे गीत त्यांनी १९७० मध्ये पडद्यावर आलेल्या ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटामध्ये गायले होते. हे गाणे सुप्रसिद्ध सिनेअभिनेता, अरुण सरनाईक यांच्यावर चित्रित झालेले आहे. कामतांच्या म्हणण्यानुसार या गीताचे ध्वनिमुद्रण म्हणजे एक चमत्कारच होता. त्याच्या सांगण्यानुसार सदर चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक, सुधीर फडके यांनी त्यांना फोनवरून संदेश दिला की अमुक रविवारी हे गीत ध्वनिमुद्रित करायचे आहे. कामतांचा शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला एक गाण्याचा कार्यक्रम होता आणि म्हणून त्यांनी त्या रविवारी ध्वनिमुद्रणाला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. फडके तर कामतांच्या आवाजात हे गाणे ध्वनिमुद्रित करण्याचा हट्टच धरून बसले होते. त्यांना कामतांनी कसेही करून हे गीत ध्वनिमुद्रित करावे असे वाटत होते. शेवटी गायकाने आपला विचार बदलला आणि शनिवारी रात्रीच कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला परतण्याचे निश्‍चित केले. दुर्दैवाने कामतांना गाडीमध्ये आरक्षण मिळाले नाही आणि खूप त्रासात प्रवास करावा लागला. मुंबईत पोहोचेपर्यंत त्यांचा आवाज संपूर्णपणे बसला होता. जेव्हा ते रेकॉर्डिंग स्टुडिओत गेले, तेव्हा प्रसिद्ध वादक वसंत आचरेकर (तबला), रामनारायण (सारंगी) आणि प्रभाकर पेडणेकर (ऑर्गन) हे त्यांना साथसंगत करण्यासाठी तयारीने बसलेले होते. कामतांनी फडकेंना ध्वनिमुद्रण पुढे ढकलण्याची विनंती केली, मात्र त्यासाठी एक तांत्रिक अडचण पुढे आली. ध्वनिमुद्रित गीत त्याच रात्री कोल्हापूरला पाठवणे गरजेचे होते कारण ते दुसर्‍या दिवशी कोल्हापूरमधील स्टुडिओमध्ये चित्रित करायचे होते. शेवटी कामतांनी काही घशाचे व्यायाम केले आणि त्यांचा आवाज सुस्थितीत आणला. गाणे ध्वनिमुद्रित झाले आणि ठरल्याप्रमाणे सरनाईकांवर चित्रित करण्यात आले. कलावती रागावर आधारित असलेले हे गाणे सदर चित्रपटाचा महत्त्वाचा भाग ठरले आणि त्याने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले.