प्रो लीगद्वारे ऑलिंपिक तयारी ः रिड

0
514

हॉकी प्रो लीग स्पर्धेत जगातील आघाडीच्या देशांविरुद्ध खेळल्यास ऑलिंपिकची तयारी करता येईल, असे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांची सुरुवात होत असल्याने भारतासाठी ही नक्कीच सुखावह बाब आहे. अत्यंत चुरशीच्या प्रो लीग स्पर्धेत खेळून खेळाडूंना दबावाखाली खेळण्याचा अधिक सराव मिळेल, असे रिड यांना वाटते. भारताने या वर्षी हॉकी प्रो लीग स्पर्धेची झंझावाती सुरुवात केली होती.

नेदरलँड्‌सविरुद्ध भारताने ५-२ व ३-३ (३-१) असा विजय मिळवला होता. यानंतर विश्‍वविजेत्या बेल्जियमविरुद्ध भारताने २-१ असा विजय व ३-४ असा पराभव स्वीकारला होता. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-४ असा पराभव व २-२ (३-१) असा विजयदेखील भारताने संपादन केला होता. यानंतर कोरोनाच्या कारणास्तव स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उर्वरित सामने पुढील वर्षी होणार आहेत. १० व ११ एप्रिल रोजी अर्जेंटिनाविरुद्ध भारत झुंजेल. यानंतर ८ व ९ मे रोजी ब्रिटनविरुद्ध इंग्लिश भूमीवर भारताचे सामने होतील. इंग्लंडमधील सामन्यांनंतर भारत स्पेनमध्ये १२ व १३ मे रोजी सामने खेळेल. यानंतर जर्मनीविरुद्ध १८ व १९ मे रोजी तर यानंतर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध २९ व ३० मे रोजी भारताला दोन हात करावे लागणार आहेत.