आलेमांव कुटुंबाचे म्यांव म्यांव बंद करा

0
114

दिलीप बोरकर

गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्राला लागलेले आलेमांव कुटुंबाचे ग्रहण सध्या अधिकाधिक खग्रास होत चाललेले आहे. आलेमांव कुटुंबातील चर्चिल या राहूने या आधी गोव्यात उच्छाद मांडलेला. त्यांचा हात धरून राजकारण या धंद्यात विशेष नफा असल्याचे दिसून आल्यावर चर्चिल बंधू ज्योकीमही राजकारणात आले अन् स्थिरावले. कुठल्याही नफ्याचा धंदा हा ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाचा पारंपरिक धंदा असतो, तसाच राजकारण हाही धंदा पारंपरिक असल्याचा समज करून घेऊन आलेमांव बंधूंनी आपल्या मुलांनाही या धंद्यात प्रवेश देण्याचा खटाटोप सुरू केलेला आहे. गोव्याचे राजकारण आणि त्या अनुषंगाने पदरी पडणारी सत्ता ही आपल्या कुटुंबाची मक्तेदारी असा समज करून घेऊन या संपूर्ण आलेमांव कुटुंबाने कॉंग्रेस पक्षालाच वेठीस धरले आहे. हा चाललेला भस्मासुरी नाच पाहिल्यास भविष्यात भल्याभल्यांना पळावे लागेल, अशीच परिस्थिती दृष्टीक्षेपात येऊ लागलेली आहे.

चर्चिल आलेमांव आणि त्यांच्या कुटुंबाने गोव्यातील किंवा राष्ट्रीय राजकारणात उतरण्यास कोणाची ना नाही. लोकशाहीत लोकप्रतिनिधी बनण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. समाज किंवा मतदार हा विहीर अथवा तळ्याच्या रूपात असतो. विहीरीतून पाण्याने भरलेली कळशी आपण घेतो तेव्हा ते पाणी त्या विहिरीतील अथवा तळ्यातील प्रातिनिधिक स्वरूपाचे असते. त्या विहिरीत असलेले पाणीच त्या कळशीत येणार यात शंकाच नाही, असे जरी आपण रूढ अर्थाने म्हणत असलो, तरी गोव्यासारख्या अत्यंत लहान मतदारसंघ असलेल्या राज्यात आम्ही लोकप्रतिनिधींना कळशीची आणि मतदारसंघांना विहीरीची उपमा देऊच शकत नाही. इतर ठिकाणी विहीर साफ केली तर, विहीरीतून कळशीत घेतलेले पाणी हे स्वच्छ असण्याची शक्यता असते, पण गोव्यातील राजकारण हे व्यक्तीगत पातळीवर असल्याने, जो कोणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, तो आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घरातील प्रत्येक मतदाराला नावाने ओळखत असतो. मतदारसंघातील दरेक घरात किती मतदार आहेत आणि त्यातील किती मते आपल्या पदरी मिळू शकतील याचा हिशेब उमेदवाराकडे असल्याने घरोघरी वस्तूंचे आणि पैशांचे वाटप करूनच असे उमेदवार निवडून येतात. येथे विहीर स्वच्छ करण्याचे अभियान राबवून कळशी स्वच्छ पाण्याची भरून घेता येईल ही अपेक्षाच अव्यवहार्य मानावी लागेल. म्हणूनच असे उमेदवार पैशांच्या जोरावर निवडून येतात आणि मुजोर होत असतात. त्यांच्या या मुजोरपणाला थोपवण्यास लोकशाहीत कुठलीच व्यवस्था नसल्यानेच त्यांचे फावले आहे.

हा सगळा प्रकार किती काळपर्यंत चालू ठेवायचा यालाही मर्यादा आहे. लोकप्रतिनिधींनी लोकमताला जागावे लागते, हा प्रकार गोव्यात तर अस्तित्वातच नाही. गोव्यात मतदारसंघांच्या रूपाने आहेत ती संस्थाने. आमदारांनी ही संस्थाने आपल्या नावावर करून घेतली आहेत. त्या संस्थांनांवर आसमंतात चंद्रसूर्य असेपर्यंत आपल्याच कुटुंबातील कोणीतरी निवडून आला पाहिजे हाच अट्टहास या संस्थानिकांची असते. त्यांचे दुर्दैव म्हणजे त्यांच्या जगण्याला मृत्यूनेच मर्यादा आणलेली आहे. मृत्यू नसता तर त्या मतदारसंघात दुसरी कोणी व्यक्ती निवडून येऊच शकली नसती. किंबहुना तसा कोणी विचारही केला नसता. मृत्यूची मर्यादा असल्याने आज काही उमेदवार आपल्यानंतर आपल्या मुलांची वर्णी त्या मतदारसंघावर लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर ज्यांची आस भागलेली नाही, ते आपली लाकडे स्मशानात पोचली तरी त्या मतदारसंघातून हटण्याचा विचारही करीत नाहीत. उलट त्या मतदारसंघाच्या आसपासच्या मतदारसंघात आपल्या मुलांची वर्णी लावण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करीत असतात.

इथे फक्त आलेमांव कुटुंबच या प्रयत्नात आहे असा समज कोणी करून घेऊ नये. ढवळीकर कुटुंब म्हणा, अथवा मोन्सेरात कुटुंब म्हणा, त्यांना अडवणे कुणाच्याच हाती राहिलेले नाही. एका कुटुंबाला जरी पक्षाने डिवचण्याचा प्रयत्न केला, तरी ते कुटुंब संपूर्ण पक्षच नेस्तनाबूत करण्याच्या प्रयत्नास लागते. याच कुटुंबाच्या आशीर्वादाने आपल्याही पदरी सत्ता पडत असते याची कल्पना पक्षाध्यक्षापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांनाच असल्यामुळे सत्तेला मुंगळ्यांप्रमाणे चिकटून बसलेल्या या कुटुंबांना धक्का लावण्याचे धाडस गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणीच करण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळेच या कुटुंबांचे फावलेले आहे.

संस्थांनिकांप्रमाणे जशी काही कुटुंबे मतदारसंघांना आपल्या अधिपत्याखाली घेऊन आहेत, तसेच इतर काही मतदारसंघ गेली पंधरावीस वर्षे काही आमदार आपल्या हाताखाली घेऊन आहेत. त्यांची कामे मतदारसंघात विकास घडवून आणण्याची नाहीत तर, मतदारसंघातील प्रत्येक घरात काय हवंय, काय नको ते पाहात त्या गोष्टी पुरवण्याचे! घरात तांदुळ नसले तरी ते नेऊन देण्याचे काम काहीजण करीत असतात. कुणाच्या घरातील बारशापासून लग्नापर्यंत आणि अंत्येष्टीपासून तेराव्यापर्यंत हजेरी लावून तुम्ही आपले मतदार असल्याची जाणीव ते सातत्याने मतदारांना करून देत असतात. येन् केन् प्रकारेण आपले मतदार हलता कामा नये याची दक्षता हे घेत असतात. जो कोणी हलेल त्याला निवडणुकीच्या वेळी दामदुप्पटीने पैसे देऊन किंवा दमबाजी करून मार्गावरआणले जाते. या धंद्याला आवर घालण्याचा लोकशाहीत कुठलाच मार्ग राहिलेला नाही. एकच मार्ग आहे, तो म्हणजे जनतेला शिक्षित करण्याचा! पण विकले जाणारे विकले जातात आणि राहिलेले आपल्याला त्याचे काहीच पडून गेलेले नाही असे म्हणून जगत असतात.

ही सगळी परिस्थिती अशा लोकांच्या पथ्थ्यावर पडलेली असल्याने ते आपले तेच खरे म्हणू लागलेले आहेत. शिक्षण माध्यमाच्या नावाने चर्चिल आलेमांवनी संपूर्ण सरकारच नव्हे तर, अख्या कॉंग्रेस पक्षालाच वेठीस धरलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांत चर्चिलनी अथवा आलेमांव कुटुंबाने शिक्षण माध्यमाकडे कधी ढुंकूनही पाहिलेले नाही, पण त्यांचे प्रतिस्पर्धी मिकी पाशेको यांनी माध्यमाचा प्रश्‍न थडग्यातून बाहेर काढून चर्चसमोर नाचवायला प्रारंभ केल्याबरोबर चर्चिलने संपूर्ण चर्च आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या जोरावर मुठीत घेतली आणि तीच मूठ त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर आपटण्यास प्रारंभ केला. सुभाष शिरोडकरांसारखे स्वतःला शिक्षणतज्ज्ञ म्हणविणारे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि दिगंबर कामतांसारखे कलाप्रेमी मुख्यमंत्री जेव्हा चर्चिलसारख्याच्या तालावर नाचू लागतात, गर्भगळीत होऊन वागतात, तेव्हा प्रश्‍न पडतो, चर्चिल आणि त्याच्या कुटुंबाकडे अशी कोणती ताकद आहे, ज्यामुळे मुख्यमंत्र्यापासून पक्षाध्यक्षापर्यंत सगळेचजण त्यांच्यासमोर नमते घेतात? ‘मिलके खायेंगेया एकाच तत्त्वावर आजचे सरकार गोवा लुटले जात असले तरी, शिक्षण माध्यमाच्या प्रश्‍नावर निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी हजार वेळा विचार करणे भाग पडले असते. पण त्यांनी चुटकीसरशी निर्णय घेतला आणि अजूनही ते आपल्या निर्णयापासून विचलीत झालेले नाहीत. दिल्लीला पैशांच्या बॅगा गोव्यातून जातात, ते एकवेळ समजण्यासारखे आहे, पण इथे काय घडले असावे?

काहीतरी घडलेले आहे, म्हणूनच गोव्यात माध्यम विरोधी रण पेटत असतानाही मुख्यमंत्री कान हलवत नाहीत. ते आलेमांव कुटुंबाला घाबरतात. म्हणूनच सुभाष शिरोडकर आणि दिगंबर कामत आपल्या पदाचा दुरूपयोग करून वालांका आलेमांव सारख्या एका यकःश्‍चित युवतीला युवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बनविण्यासाठी धडपडतात. चर्चिल आणि त्यांचे बंधू ज्योकीम राजीनामा देण्याची धमकी देतात. राजीनामा स्विकारण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांना होत नाही. चर्चिलच्या मुठीत असे काय आहे, की जी मूठ आपटल्याबरोबर सर्वांची बोबडी वळते? चर्चिल आलेमांव हे सिंह बनून सध्या डरकाळ्या फोडत असल्याने सरकार घाबरून सैरावैरा पळते की आलेमांवच्या म्यॉंव म्यॉंवलाच मुख्यमंत्री डरकाळी समजतात हेच कळायला मार्ग नाही.