भक्तीची बुद्धीझेप

0
125

– सुधाकर नाईक

गोव्याची पहिली इंटरनॅशनल वुमन ग्रॅण्डमास्टर तथा गोवा कार्बन लिमिटेडची ब्रँड अँबॅसिडर भक्ती कुलकर्णीने गोव्यात बुद्धिबळ इतिहासात नवा सुवर्णक्षण नोंदताना नुकत्याच चेन्नईमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या नॅशनल वुमेन्स चेस चॅम्पियनशीपचे अजिंक्यपद प्राप्त केले.

गेल्या महिन्यात कोलंबो (श्रीलंका) येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर बुद्धिबळ अजिंक्यपदानंतर भक्तीने गेल्या रविवारी प्रतिष्ठेची नॅशनल वुमेन्स चॅलेंजर्स स्पर्धा जिंकून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केलेल्या चौगुले कॉलेजच्या या विद्यार्थिनीने गेल्या पाचसहा वर्षांत यशस्वी आगेकूच जारी ठेवली असून २००५ मध्ये वुमन फिडे मास्टर, २००९ मध्ये कॅडिड मास्टर आणि २०१० मध्ये गोव्याची पहिली इंटरनॅशनल महिला ग्रॅण्डमास्टर बनण्याचा मान मिळविला आहे.

आईवडिलांना बुद्धिबळ खेळताना पाहून लहानग्या भक्तीच्या मनात या खेळाविषयी प्रेम निर्माण झाले. भक्तीला सुरुवातीच्या काळात स्थानिक स्पर्धांत विशेष यश लाभले नाही, पण नंतर तिने प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात भरीव प्रगती साधून स्थानिक स्पर्धांत यश मिळविले. २००४ नंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले (मुंबई) प्रशिक्षण देण्यासाठी गोव्यात आले आणि भक्तीचा खेळ बहरला. गोवा कार्बन लिमिटेडने स्पॉन्सरशीपचा सहयोग दिला आणि फायनान्सियल बर्डनहटले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेण्याचा तिचा मार्ग सुकर झाला. आर्थिक विवंचना मिटल्याने भक्तीला खेळावर अधिक लक्ष केंद्रित करता आले आणि मिळत गेलेल्या यशामुळे तिचा आत्मविश्‍वास दृढावत गेला.

तीन वेळा राज्य विजेतेपद प्राप्त केलेल्या भक्तीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दर्शविताना तेहरान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य आणि सिंगापूरमधील वर्ल्ड स्कूल चेस चॅम्पियनशीपमध्ये १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक प्राप्त करून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला. व्हिएतनाम येथे झालेल्या वर्ल्ड युथ चेस स्पर्धेत तिला १६ वर्षांखालील मुलींच्या गटात सांघिक कांस्यपदक मिळाले. औरंगाबादमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य तर चेन्नईत झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. २००९ मध्ये भक्तीने आपली आगेकूच जारी राखताना ग्रीसमधील वर्ल्ड स्कूल चेस स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात रौप्यपदक प्राप्त केले. २००९ मध्येही यशस्वी वाटचाल जारी राखीत भक्तीने कॅडिड मास्टर आणि २०१० मध्ये गोव्याची पहिली इंटरनॅशनल वुमन ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान प्राप्त केला.

गोवा कार्बन लिमिटेडचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी भक्तीचा जीसीएल ब्रँड अँबॅसिडर करार दोन वर्षांनी वाढवला असून त्यापासून स्फूर्ती घेत तिने गेल्या सलग दोन महिन्यांत एशियन ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप आणि नॅशनल वुमेन्स चेस चॅलेंजर्स अशी दोन नवी यशोशिखरे पादाक्रांत केली आहेत. श्रीनिवास धेंपो यांच्याकडून लाभलेले भक्कम आर्थिक पाठबळ आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांच्या कुशल मार्गदर्शनात आपली यशस्वी वाटचाल सुरू केलेली भक्ती आता वर्ल्ड युथ ज्युनिअर चॅम्पियनशीप (अथेन्स) आणि एशियन ज्युनिअर चॅम्पियनशीप (ताश्कंदउझ्बेकिस्तान) या जागतिक स्पर्धांत भाग घेणार आहे.

माजी विश्‍वविजेता गॅरी कास्पारोव्ह यांना आराध्य मानणारी भक्ती विश्‍व क्रमांक दोन भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हंपीप्रमाणे पुरुष ग्रॅण्डमास्टर किताब प्राप्त करण्याचे ध्येय उराशी बाळगून आहे आणि तिचा निर्धार व मेहनत पाहता लवकरच तिची स्वप्नपूर्ती होईल असे वाटते.

भक्तीने गेल्या दोन वर्षांत अचाट प्रगती साधलेली असून तिला उज्ज्वल भविष्यकाळ आहे आणि लवकरच ती पुरुष ग्रॅण्डमास्टर किताबाचे आपले स्वप्न साकार करीलअशा शब्दांत गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आशिष केणी यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

ध्येयनिष्ठ प्रयत्न, सातत्य आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर या गोमंतकन्येने बुद्धिबळ क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केलेली असून आपल्या अचाट कामगिरीने ध्येयपूर्तीबरोबरच राज्य आणि देशाची मान उंचवावी ही सदिच्छा!