पाऊस! मनातला… गाण्यातला…

0
259

– डॉ. वासुदेव सावंत

काही गोष्टींची आवड किंवा काही गोष्टींविषयी नावड माणसाच्या मनात उपजतच निर्माण झालेली असते. त्याची काही तर्कशुद्ध कारणमीमांसा करता येत नाही. पाऊस ही अशी माझ्या लहानपणापासूनच मला आवडणारी, ओढून घेणारी गोष्ट. माझे बालपण आणि विद्यार्थिदशेचा बराचसा काळ अत्यंत कमी पावसाच्या किंवा ज्याला दुष्काळी म्हटलं जातं अशा प्रदेशात गेलेला. भारतातील सर्वात तीव्र पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून भूगोलाच्या पुस्तकात नोंदलेला सह्याद्रीच्या पश्‍चिमेकडील हा एक परिसर. पण ज्या गोष्टीची कमतरता असते किंवा जी गोष्ट दुर्मीळ असते तिच्याबद्दलच जास्त अपूर्वाई असते. त्यामुळे पावसाची वाट पाहणे, पाऊस आला की आनंदून जाणे आणि अपेक्षेनुसार न पडलेल्या पावसाची आभाळाकडे डोळे लावून वाट पाहणे ही त्याकाळी तरी इथल्या माणसांच्या जीवनातली एक नित्य आणि अंगभूत गोष्ट होती. अशा कमी पावसाच्या दुष्काळी प्रदेशात जन्मल्यावाढल्यामुळेच असेल कदाचित, पण पावसाची ओढ माझ्या मनात अगदी बालपणापासूनच रुजलेली.

पाऊस आला की घराबाहेर पडून त्या पावसात नाचायचं, बागडायचं हे लहानपणी वेडच होतं. पण पावसात नाचायची ही हौस बहुतेक वेळा घरच्यांचाविशेषतः आईचाडोळा चुकवूनच भागवावी लागायची. पाऊस पडताना मी घरात दिसलो नाही की आईची तगमग सुरू व्हायची. मला, माझ्या मित्रांना ती हाका घालायची. पावसातून मी घरी यावं म्हणून कधी स्वतः तर कधी कोणाला तरी मला आणण्यासाठी पाठवायची. भिजलेला, ओलाचिंब झालेला मी घरी आलो की तिचं रागावणं, बडबडणं सुरू व्हायचं. माझे भिजलेले कपडे बदलणे, ओले अंग पुसून कोरडे करणे हे सगळे बडबडतच सुरू असायचे. पण आई रागावली तरी आईने कुशीत घेऊन कोरड्या स्वच्छ टॉवेलने माझं डोकं पुसताना जो उबदार अनुभव यायचा त्याचा ठसा मनातून आजही पुसला जात नाही. आता प्रौढ वयात पावसात भिजण्याची ही ओढ अनेक कारणांमुळे प्रत्यक्षात आणता येत नसली तरी वर्षाच्या पहिल्या पावसात भिजताना, उन्हाळ्याची सगळी धग काहीकाळ तरी विसरून टाकणारा, तनामनाला गारवा देणारा तो सुखद अनुभव घेतल्याशिवाय आजही राहवत नाही. पडत्या पावसात (छत्रीरेनकोट घेऊन का असेना) फिरता फिरता पावसाळ्यात बदललेलं सृष्टीचं रूप न्याहाळण्याचा अनुभवही वारंवार घेत असतोच.

खरे तर पावसाशी माझी अधिक जवळीक झाली ती मामाच्या गावी. मी शहरात राहणारा आणि माझं कुटुंब तसं पांढरपेशा असलं तरी मामा मात्र शेतात राबणारा अस्सल शेतकरी. मामाचं कुटुंबही त्याच्या इतर भाऊबंदांप्रमाणे रानातशेतातच वस्ती करून राहणारं. शाळेला उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुट्टी असली की माझा मुक्काम मामाच्या घरी. त्यांच्या कुटुंबातलाच एक होऊन जायचो. दिवसभर रानात, निसर्गाच्या सहवासात मनसोक्त भटकायला मिळायचं. मामाने सांगितलेली शेतातली, रानातली किरकोळ कामे करण्याबाबत मी नेहमी उत्साही असे. त्यामुळे मामाकडे राहून शेती आणि शेतकर्‍यांचं जीवन यांच्याशी एक जवळचं नातं निर्माण झालं. ज्या पावसात भिजण्याची आपणास केवळ मजा वाटते, तो पाऊस शेतकर्‍यांच्या आणि एकूण माणसाच्या जीवनाचा कसा अंगभूत भाग आहे हे कळायला लागलं. शाळेत न शिकताही इथल्या शेतकर्‍यांना रोहिणीमृगआर्द्रापासून चित्रास्वातीपर्यंतची सगळी पावसाळी नक्षत्रे माहीत आहेत आणि पावसाळी नक्षत्रांची ही नावे त्यांच्या बोलीभाषेचाच भाग आहेत हे इथे समजायला लागले. काही नक्षत्रांच्या मूळ नावांऐवजी शेतकर्‍यांत रूढ असणारी वेगळी नावेही इथेच पहिल्यांदा माहीत झाली. पुनर्वसू आणि पुष्य ही लागोपाठ येणारी नक्षत्रे शेतकर्‍यांच्या लेखी तरणा पुक आणि म्हातारा पुक अशी होती. चित्रा नक्षत्राला आंधळी, आश्‍लेषा हे आसळका तर स्वाती नक्षत्राला सायसाती म्हणून ओळखले जायचे. या प्रत्येक नक्षत्राबद्दल काही म्हणी किंवा पद्यात्मक लोकोक्तीही रूढ होत्या. त्यात्या नक्षत्रात पडणार्‍या पावसाचे स्वरूप, त्या नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे किंवा न पडल्याने होणारे परिणाम याबद्दल अचूक वर्णन या लोकोक्तींतून केलेलं असायचं.

आल्या आसळका सळासळा घाईघाईनं पळा

नाही पडल्या मघा तर आभाळाकडे बघा

पडतील सायसाती तर पिकतील माणिकमोती

अशा ओळी बायकांच्या तोंडीही असायच्या. इथे माणिकमोती म्हणताना शेतकर्‍यांना स्वाती नक्षत्रातील पावसाच्या थेंबांमुळे शिंपल्यात तयार होणार्‍या खार्‍या मोत्यांपेक्षा शेतात पिकणार्‍या धान्याचे टपोरे दाणेच अभिप्रेत असायचे. बारीकमोठा, झिमझिमधोधो अशा अनेक प्रकारे पडणार्‍या पावसाबद्दल शेतकरी माणसाचं सूक्ष्म निरीक्षण आजही मला थक्क करणारं वाटतं. सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नक्षत्रे गेली तर बाकी शून्य राहील ही बिरबलची प्रसिद्ध गोष्ट मी पुस्तकात वाचण्यापूर्वीच माझ्या मामाने मला सांगितली होती. मामाच्या गावच्या त्या वातावरणात माझ्या मनात पावसाच्या मूळच्या आकर्षणाबरोबर पावसाचं माहात्म्य आणि आदरही वाढतच गेला.

कमी पावसाच्या प्रदेशातील इथल्या लोकांच्या दृष्टीने मान्सूनइतकाच मान्सूनपूर्व किंवा वळवाचा पाऊसही महत्त्वाचा असायचा. कारण शेतकर्‍यांचा पेरणीचा पहिला हंगाम (खरीप हंगाम) वळीव पडल्यावरच खर्‍या अर्थाने सुरू व्हायचा. पेरणीसाठी मान्सूनच्या पावसावर कधी विसंबून राहता येत नसे. ऐन उन्हात जिवाची काहिली झाल्यावर काहीसा आकस्मिकपणे आणि बहुधा दुपारनंतर येणार्‍या वळवाच्या पावसाची अनेक रूपे मनात साठलेली आहेत. सकाळी आकाशात ढगांचा कुठे मागमूस नसताना दुपारी आकाशात एका बाजूने ढगांची फळी हळूहळू तयार होत राहायची. मग काही वेळाने सोसाट्याचा वारा, ढगांचा कधी कानाचे पडदे फाडतोय असं वाटणारा गडगडाट, विजांचा डोळे दीपविणारा चकचकाट यांनी सगळं वातावरणच कल्लोळित व्हायचं आणि सडसडून पावसाच्या धारा वर्षू लागायच्या. कडाडणार्‍या विजांची भीती वाटत असली तरी आकाशात जमलेले हत्तीसारखे प्रचंड काळे ढग, ते ढग एकमेकांवर घासताना चमकून जाणारी विजेची लांबलचक वाकडीतिकडी चमकती रेघ आणि त्यानंतर काही क्षणांनी ऐकू येणारा गडगडाट हे सारे मला फार उत्सुकतेने ऐकावे आणि पहावेसे वाटायचे. केशवसुतांच्या कवितेतील

ज्ञाताच्या कुंपणावरून उड्डाण करून चिद्घनचपला जी जाते ही ओळ वाचताना डोळ्यांसमोर आजही मनात ठसलेली ही विजेची रेघच उभी असते. केशवसुतांच्या कवितेतला विजेसाठी वापरलेला चिद्घनचपलाहा वैशिष्ट्यपूर्ण शब्द आजही मोठा लक्षवेधक वाटतो. वळवाच्या पावसावेळी चमकणार्‍या विजा जमिनीवर पडून कधीकधी नुकसान करणार्‍याही कशा ठरतात हे आपण ऐकतोच. त्यामुळे असा विजांचा कडकडाट सुरू झाला की वडीलधार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे घरापुढे लोखंडी वस्तू टाकायची आम्हा मुलांची धडपड सुरू व्हायची. घरावर वीज पडण्याचा धोका जास्तीत जास्त कमी व्हावा म्हणून घरापुढे जास्तीत जास्त लोखंडी वस्तूंची शोधाशोध सुरू असायची. आज या धडपडीची गंमत वाटते. खाली पडलेली वीज विनाशकारी असली तरी रानात पडलेली वीज जमिनीला पाण्याचा पाझर फोडणारी असते असे सांगितले जायचे. आमच्या गावाहून मामाच्या गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर एक मोठा माळरानासारखा भाग लागत असे. इथे रस्त्यालगतच काठावर एका झाडाखाली विहिरीसारखा एक खोल खड्डा होता आणि त्यात स्वच्छ पाण्याचा एक छोटासा झरा होता. माळावर वीज पडून हा खड्डा आणि झरा तयार झाला असे सांगितले जायचे. त्याला आणि त्या ठिकाणालाच वीजझराअसे नाव पडलेले होते. तो वीजझरा मी एकदा प्रत्यक्ष जाऊन पाहिला तेव्हा ऐन उन्हाळ्यातही वैराण माळरानावरचं ते स्वच्छ पाणी पाहून आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. काही वर्षांनंतर पाहिले तर या माळरानावर एका मोठ्या कालव्याच्या खोदाईचे काम चालू होते आणि तो वीजझरा आणि त्या काठावरचं वाढलेलं झाड कुठे बेपत्ता झाले होते हेच कळत नव्हते.

मान्सूनपूर्वी पडणार्‍या या वळवाच्या पावसाबद्दल अनेक गोष्टी मला मामाकडूनच माहीत झाल्या. उन्हाळ्यात एके दिवशी मी आणि मामा त्यांच्या वस्तीकडे जाणार्‍या गाडीवाटेच्या रस्त्याने येत होतो. उन्हाळ्यामुळे रस्त्यावर मातीफुफाटा जास्तच माजलेला होता. पुढे काही अंतरावर मला एक दृश्य दिसत होते. काही चिमण्या झेप घेऊन मातीने भरलेल्या त्या रस्त्यावर येत होत्या आणि रस्त्यावरच्या फुफाट्यात चोच खुपसून अंगावर माती उडवून घेत होत्या. चिमण्यांच्या त्या माती उडविण्याची मला गंमत वाटत होती. एवढ्यात मामा मला म्हणाला, ‘‘बघ, चिमण्या मातीत आंघोळ करताहेत. म्हणजे एकदोन दिवसांत पाऊस नक्की येणार!’’ आणि खरेच दुसर्‍या दिवशी दुपारी वळवाचा पाऊस कोसळून गेला. चिमण्या बघून मामा जेव्हा पावसाचे भविष्य सांगत होता त्यावेळी रखरखीत उन्हाशिवाय वातावरणात पावसाचे कसलेही चिन्ह नव्हते. त्यामुळे मामाने केलेल्या त्या भविष्यवाणीचे मला फार नवल वाटले. पण शेतकर्‍यांना हवामानपावसाबद्दलचे अंदाज त्यांच्या निसर्गनिरीक्षणामुळे सहजपणे बांधता येतात हे हळूहळू माहीत झाले. सूर्यास्ताच्या वेळी आकाश नेहमीपेक्षा अधिक लाल होणे, विशिष्ट प्रकारचे टोळकिडे घोळक्याने उडलेले दिसणे ही पाऊस येण्याची पूर्वचिन्हे असतात किंवा पावसाळ्यात चांदण्यारात्री पावसाचा जोर कमी असतो अशा काही गोष्टीही माहीत झाल्या. चांदण्यारात्री पावसाचे प्रमाण कमी असते ही गोष्ट अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकरीत्याही सिद्ध केलेली आहे असे एकदा कुठेतरी वाचले तेव्हा भारतीय शेतकर्‍यांच्या या निरीक्षणाचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही.

लहानपणीच मनात रुजलेला हा पाऊस गाण्यातून आणि पुढे कवितेतूनही भेटत गेला. मराठी मुलांचं बालपण तर चिऊकाऊच्या गोष्टींप्रमाणे येरे येरे पावसा, तुला देतो पैसाया पावसाच्या गाण्यानेच सुरू होते (व्हायचे!). गाण्यातला पाऊस पहिल्यांदा या बालगीतातूनच भेटला. पण पावसाला येण्यासाठी खोट्या पैशांचे आमिष दाखवावे लागते आणि खोट्या पैशाला भुलण्याइतका पाऊस भोळा असतो हे तेव्हाही फारसे पटत नसे. आता तर केजीतली मुले पावसाच्या येण्याऐवजी रेन रेन गो अवेअसली पावसाला पिटाळणारी गाणी म्हणतात हे मनाला पटतच नाही. नुसता पाऊसच नव्हे तर वळवाचा पाऊसही बालपणी गाण्यातून भेटला. मोसमी पावसाच्या तुलनेत वळवाचा पाऊस हा तात्कालिक, पडून लगेच जाणारा. म्हणून भावाच्या बहिणीवरील प्रेमाची क्षणभंगुरता एका लोकगीतात वळवाचा पाऊस पडून ओसरला, भाऊ बहीण विसरलाअशा शब्दांत सांगितलेली आहे. आमच्या गावातला देवीचा एक पोतराज घरोघर गाणी म्हणत भिक्षा मागत फिरायचा. देवीच्या गाण्यांबरोबरच तो पोवाडे, लोकगीतेही सुंदर गायचा. भावाच्या प्रेमाबद्दलचं हे लोकगीत तो खास त्याच्या शब्दांत आणि ढंगात असे गायचा

वळवाचा गं पाऊसऽऽ

आला गेला ओसरूनऽ

आता भावाला झाल्या लेकी

गेला भैणीला विसरूनऽऽ

मूळ लोकगीताला त्यानं आपल्या पद्धतीनं शब्दरूप देऊन हलगीच्या आणि पायातील तोड्यांच्या तालावर म्हटलेलं हे लोकगीत आणि त्यातला तो वळवाचा पाऊस कानात आजही तसाच रुणझुणत राहिलेला आहे. हा वळवाचा पाऊस मोठ्या कवीभावगीतकारांनाही लोभावल्याशिवाय राहत नाही. ‘आज कुणीतरी यावेया गीतातील कवीला

जशी अचानक या धरतीवर, अवचित यावी वळवाची सर तसे तिने यावे असे वाटत असते, तर आकस्मिकपणे भेटलेल्या प्रेयसीचे या वळवाच्या सरीपरी तू आलिस माझ्या दारी गं! अशी वळवाच्या सरीचीच उपमा देऊन वर्णन करताना दिसतात.

कवितेतला हा पाऊस शाळेत गेल्यावर शाळेतल्या पाठ्यपुस्तकांतून वारंवार भेटू लागला. पुढे पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर भाषा हाच विषय अभ्यासासाठी निवडल्यामुळे अनेक कवींचे कवितासंग्रह अभ्यासावे लागले. पावसाबद्दलच्या, पावसाचा संदर्भ असणार्‍या अनेक कविता त्यांमधून वाचता आल्या. आवड म्हणूनही अन्य अनेक पुस्तके, काव्यसंग्रह वाचले. मराठीतील अनेक सर्वोत्तम कविता वाचल्या. तरी माझ्या उपजत प्रवृत्तीनुसार पावसाबद्दलच्या कवितांकडेच लवकर लक्ष वेधले जायचे. आज असे लक्षात येते की पदवीपदव्युत्तर पातळीवर अभ्यासलेल्या कवितांपेक्षाही शाळाहायस्कूलच्या पुस्तकांतील कविताच मनात अधिक रूजून राहिलेल्या आहेत. कुसुमाग्रज, बा. . बोरकर, मंगेश पाडगावकर, ना. धों, महानोर या कवींच्या काव्यसंग्रहांपेक्षा शालेय पाठ्यपुस्तकात असलेल्या त्यांच्या कविताच आज चटकन ओठांवर येतात. पावसाळ्यात फिरायला बाहेर पडलं की कधीकाळी पाठ्यपुस्तकात वाचलेली

पावसाच्या धारा येती झरझरा

झाकळले नग सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ

जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ

ही कविता नकळतपणे ओठांवर येतेच.

सजल शाम घन गरजत आले बरसत आज तुषार

आता जीवनमय संसार!

अशी भारदस्त भाषा पाहिली की हे गरजणारे घन कुसुमाग्रजांच्या कवितेतील आहेत हे लक्षात येतेच. पाडगावकर, बोरकर, बालकवी, महानोर हे तर निसर्गाविषयी लिहिणारे कवी. जिप्सी किंवा विदूषक वाचण्यापूर्वी पाडगावकर पहिल्यांदा मला भेटले ते आठवीच्या पाठ्यपुस्तकात. पाऊस पडल्यावर उगविणार्‍या पहिल्यावहिल्या तृणपात्याचा सत्कार ते सत्कारनावाच्या कवितेतून करीत होते. त्या कवितेतील कोसळली सर दक्षिणउत्तर घमघमले मातीतुन अत्तर

या ओळीत त्यांनी पाऊस पडल्यानंतर सुटणार्‍या मातीच्या सुगंधाला अत्तर म्हटले आहे. या अत्तराची प्रचिती तर मी अनेकदा घेतलेली आहे. पण माझ्या विद्यार्थिदशेतला एक प्रसंग आजही विसरता येत नाही.

महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचं एक वर्ष संपून नव्या वर्षातला मे महिना संपत आला होता आणि त्यावेळी एका दुपारनंतर वळवाचा एक जोरदार पाऊस तासदीड तास पडून गेला. नेमका या पावसाच्या वेळीच मला सायकलीवरून बारापंधरा किलोमीटर प्रवास करण्याची पाळी आली होती. त्यावेळी वर्षभर पावसावाचून करपलेल्या भूमीचा पहिल्या पावसानंतर जो अप्रतिम मृद्गंध सर्वत्र दरवळत होता तो कुठल्याही सेंटला किंवा अत्तराला मागे सारणारा होता. मृद्गंधाने भरलेली ती पावसाळी हवा मी छातीत भरभरून घेत होतो तरी समाधान होत नव्हते. पावसाबद्दल विचार करायला लागलो की त्यावेळचा तो मृद्गंध आणि पाडगावकरांच्या वरील काव्यपंक्ती हमखास आठवल्याशिवाय राहत नाही.

निसर्गाविषयी अत्यंत संवेदनशील असलेल्या बोरकरांच्या कवितेतही हे पावसाळी अत्तर दरवळलेले आहे.

क्षितिजी आले भरते गं

घनात कुंकुम खिरते गं

झाले अंबर

झुलते झुंबर

हवेत अत्तर तरते गं

पावसाळी मृद्गंधाचे वर्णन करताना बोरकर किंवा या ध्वनींची अनुप्रासात्मक पुनरावृत्ती करून पावसाची लय कवितेलाही प्राप्त करून देतात. पावसावर विविध मराठी कवींनी अनेक कविता लिहिलेल्या असल्या तरी बोरकरांची कविता खास वेगळी ठरते ती तिच्या अशा अंगभूत लयीमुळे. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना प्रत्यक्ष बोरकरांच्या तोंडूनच

घन वरुसे घन वरुसे रे/P>

जळात जळसर आले सरसर मल्हाराचे स्वरसे रे

ही त्यांनी मल्हारच्या स्वरातच गायिलेली त्यांची कविता ऐकायची संधी मिळालेली होती. तेव्हा त्यांच्या कवितेतील या संगीताचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडलेला होता. पावसावरची त्यांची आणखी एक कविता खास बोरकरांच्या रचनावैशिष्ट्यामुळे मला अविस्मरणीय वाटणारी आहे.

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले

शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले

या कवितेतून वर्णिलेलं पावसाचं दृश्य अत्यंत चित्रमय तर आहेच, पण सुरुवातीच्याच या दोन ओळींत काही अपवादात्मक दीर्घ अक्षरे वगळता बहुतांशी र्‍हस्व अक्षरे आणि तीही सहज अनुप्रास साधणारी अशी वापरून बोरकरांनी जो वैशिष्ट्यपूर्ण परिणाम साधलेला आहे तो केवळ अप्रतिमच म्हणावा लागेल. आपल्या गोव्याच्या भूमीची सगळी वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे टिपताना पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा असं इथल्या पावसाचं रूपही टिपतात. बोरकरांच्या कवितेतला हा पाऊस माझ्यासारख्या पाऊसवेड्याच्या मनात कायमचं घर केल्याशिवाय राहत नाही.

बोरकरांप्रमाणे बालकवी हेही निसर्गाचे कवी. पण त्यांच्या फुलराणी, श्रावणमास, औदुंबर, पारवा, निर्झरास अशा कविता मराठी वाचकांच्या डोळ्यांसमोर येतात तशी पावसाबद्दलची त्यांची एखादी कविता सहजपणे आठवत नाही. कारण खास पावसाविषयी अशा कविता बालकवींनी फार अपवादात्मक लिहिलेल्या आहेत. दहावीच्या (किंवा कदाचित बारावीच्या) पुस्तकात त्यांची पावसाचं वर्णन करणारी पाऊसया नावाचीच

थबथबली ओथंबुन खाली आली

जलदाली मज दिसली सायंकाली

अशी एक कविता होती. पण तिच्या रचनेच्या वेगळेपणामुळे असेल कदाचित, पण मुलांनाआणि मलाहीत्यांच्या अन्य प्रसिद्ध कवितांसारखी फारशी भावलेली नव्हती. हे बालकवी ज्यांचे अत्यंत आवडते कवी होते त्या बा. सी. मर्ढेकर यांनी मराठी कवितेचं रूप आमूलाग्र बदलून बकाल यंत्रयुगीन जीवनाचं भकास चित्र उभी करणारी नवी कविता मराठीत लिहिली. प्रेमकविता, निसर्ग कविता असली कवितेची वर्गवारी त्यांनी संपविली. पण त्यांनाही पावसाबद्दल कविता लिहावीशी वाटलेली आहेच.

आला आषाढश्रावण आल्या पावसाच्या सरी

किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी

मुंबईतल्या पावसाचं वर्णन करताना या कवितेत मर्ढेकर पुढे लिहितात

चाळीचाळीतुन चिंब ओली चिरंगुटे झाली

ओल्या कौलारकौलारी मेघ हुंगतात लाली

पाठ्यपुस्तकातून पहिल्यांदा वाचताना या कवितेनं लक्ष वेधून घेतलं होतंच, पण मर्ढेकरांची पावसाबद्दलची कविता म्हणून तिच्या नावीन्यामुळे ती आजही लक्षात राहते. मर्ढेकरांच्या कवितेतील मुंबईच्या चाळीतला हा पाऊस नामदेव ढसाळांच्या कवितेत मुंबईच्या गोलपिढ्यातला, झोपडपट्टीतला पाऊस म्हणून भेटला आणि त्या कवितेतला पाऊस पाहिल्यावर पावसाबद्दलच्या मनातल्या सगळ्या सौंदर्यपूर्ण आणि भावुक कल्पनांना धक्का बसल्याशिवाय राहिला नाही. खरे तर १९६० नंतरच्या मराठी कवितेत पावसाचं जे चित्र उमटलेलं आहे ते वाचकांना विचार करायला लावणारं आणि अंतर्मुख करणारं असंच आहे. या काळात दलित, शेतकरी आणि वंचित स्तरांतून आलेल्या अधिकांश लेखकांनीच मराठी साहित्याची घडण केलेली आहे. त्यामुळे या काळातला कवितेतला पाऊस त्यांच्या जीवनातील सुखदुःखाशीच नेहमी जोडला गेलेला आहे. ना. धों. महानोर, प्रकाश होळकर, इंद्रजित भालेराव यांसारखे कवी पावसाच्या वेळेवर येण्याने आणि न येण्याने शेतकर्‍यांची जी अवस्था होते त्याचे चित्र उभे करीत असतात. महानोरांचा एक कवितासंग्रह पावसाची गाणीयाच नावाचा आहे. ‘रानातल्या कवितालिहिणारा हा कवी नभाने भुईला पावसाचं दान द्यावंअशी प्रार्थना कवितेतून करीत असतो. आणि हे दान मिळाल्याने अन्नधान्याने सुफलित झालेली भूमी पाहिल्यावर

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

असं पावसामुळे शेतकर्‍यांचं पुण्य फळाला आल्याचं समाधान व्यक्त करतो. पण असे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण शेतकर्‍याच्या वाट्याला फारच थोडे येणारे. बाकी पावसाची आर्ततेने वाट पाहणे आणि पावसाअभावी आलेल्या दुःखभोगाला सामोरे जाणे हेच शेतकर्‍याचे भागध्येय असते. म्हणून होळकरांसारखा कवी

भरू दे यंदा मृगाचं आभाळ

पिकू दे यंदा खंडीभर रास

नावाचा तुझ्या यळकोट करीन

असं म्हणत राहतो. पण मृगाचं आभाळ बरसतच नाही. त्यामुळे

आला मिरग संपत नाही पेरणीला वल

काय खळला रे बाप्पा कसा पडला रे पीळ

असा पोटाला आणि मनालाही पडलेला पीळ कवितेतून मांडत राहतो, तर दुसरीकडे यशवंत मनोहर यांच्यासारख्या कवीला आपली वंचितता कालचा पाऊस आमच्या गावावर आलाच नाही अशी पावसाच्याच प्रतीकातून मांडावीशी वाटते. आजचा कवितेतला पाऊस हा असा जीवनाला थेट भिडणारा आहे.