राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ९ हजार पार

0
190

>> आणखी ३१७ जण सापडले पॉझिटिव्ह

>> दिवसभरात ५ रुग्णांचा झाला मृत्यू

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने काल नऊ हजारांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ९०२९ झाली आहे. काल सोमवारी नवीन ३१७ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्याची रुग्णांची संख्या २७४१ झाली आहे. काल दिवसभरात आणखीन पाच रुग्णांचे निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ८० झाली आहे. आणखी २१३ रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६२०८ एवढी झाली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत असल्याने जनता धास्तावली आहे.

आके, मडगाव येथील ४९ वर्षांच्या महिला रुग्णाचे कोविड हॉस्पिटलमध्ये रविवारी मध्यरात्री निधन झाले. केपे येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे आणि झुवारीनगर येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड हॉस्पिटलमध्ये काल निधन झाले आहे. इंदिरानगर, चिंबल येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णांचे आणि माशेल येथील ७४ वर्षीय महिलेचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत २३४८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ३१७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्रयोगशाळेत ७३० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य खात्याने आणखीन १८९८ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

बांबोळी येथील गोमेकॉच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ९२ रुग्णांना सोमवारी दाखल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर कोरोना संशयितांची संख्याही वाढत चालली आहे.

मनपाचा शिपाई पॉझिटिव्ह
महानगरपालिकेतील एक शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो मागील आठ दिवस कामाला आला नव्हता. महानगरपालिका कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिकेत कामासाठी येणार्‍या नागरिकांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. केवळ तातडीचे काम असल्यास नागरिकांनी कार्यालयात यावे, असे आवाहन महापौर उदय मडकईकर यांनी केले आहे. दरम्यान, ताळगाव येथील कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णावर सांतइनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पणजी शहरात १२ नवे रुग्ण
पणजी शहरात काल नवीन १२ रुग्ण आढळून आले असून शहरातील एकूण रुग्णसंख्या १०३ झाली आहे. उच्च प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एका निवासी इमारतीमध्ये एक रुग्ण सापडला आहे. मिरामार, कांपाल, रायबंदर, आल्तिनो, करंझाळे, मळा, सांतइनेज या भागात नवे रुग्ण आढळले आहेत.