॥ मनःशांती उपनिषदातून ॥ थेंबुटा सागरी बुडाला…

0
580
  •  प्रा. रमेश सप्रे

ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे आणि केवळ ध्वनी-शब्द-वाक्यांचा उच्चार करत राहणं म्हणजे वाचन नव्हे. श्रवण म्हणजे लक्ष देऊन (अवधानपूर्वक) भावार्थ लक्षात घेऊन ऐकणं. मुख्य म्हणजे जे ऐकलंय नि वाचलंय त्यातील काहीतरी स्वतःच्या जीवनात उतरवणं नि चांगला माणूस बनत राहणं. हे खरं अध्यात्ममार्गाचं रहस्य (ध्येय) आहे.

‘आत्मज्ञानातून मनःशांती लाभते’, हे तीन शब्दांचं साधं वाक्य! पण कांगारुच्या पोटाबाहेरच्या पिशवीत जसं पिल्लू असतं, तसे या शब्दांच्या पोटात जे शब्द आहेत, त्या छोट्या शब्दांचा अर्थ मात्र महान नि गहन आहे – आत्म, ज्ञान, मन, शांती हे ते चार शब्द. या शब्दांचा खरा अर्थ समजण्यात वर्षानुवर्षं घालवावी लागतात. कारण त्यांचा अर्थ समजणं म्हणजे त्यांचा अनुभव घेणं. ‘मन’ या शब्दाची व्याख्या करणं आजपर्यंत शक्य झालं नाही. पण आपल्याला मन आहे. आपले भावनिक व्यवहार हे मनाचे कार्य आहे याचा अनुभव आपल्याला येतो. आत्मज्ञान तर पूर्णपणे अनुभवाचा विषय आहे. समर्थ रामदास अगदी सोप्या शब्दात पण स्पष्टपणे सांगतात –
ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान | पाहावे आपणासि आपण ॥
अशा ज्ञानासाठी व्यक्तीची सर्व दृष्टींनी तयारी होणं अपेक्षित असतं. अशी तयारी नचिकेत्याची आहे हे जाणून कठोपनिषदातील संवादात यम त्याला म्हणतो –
* हे नचिकेता, वासनातृप्ती, जगाचा आश्रय, उपासनेचे फळ, अभयाची पराकाष्ठा, स्तुत्य, महान, गतिमान (स्थिर नसलेले) असे सर्व तू जाणून त्यागले आहेस, म्हणून तू धन्य आहेस. अनित्य गोष्टींचा त्याग करण्यासाठी जे धैर्य, जो निग्रह आवश्यक असतो तो तुझ्यात आहे.

प्रत्यक्ष अनुभवाला पर्याय नाही. रोज काशीसारख्या पवित्र क्षेत्रात जाणारी नि परतणारी गाडी नि तिचे चालक यांना काशीविश्‍वेश्वर, गंगास्नान घडत नाही. म्हणजे काशीयात्रेचा अनुभव ते घेत नाहीत. गाडी तर निर्जीव असते. पण तिच्या चालकांची तीर्थयात्रा करण्याची भावना नसल्याने यांत्रिकपणे फक्त पोचणं नि परतणं एवढंच घडतं.
याहिपेक्षा एक प्रत्ययकारक उदाहरण आहे. सत्यघटना आहे ही. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर एक पांगळा तिकिट मास्तर होता. त्याला सर्व प्रसिद्ध पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्रं, वाटेतील सुखसोयी यांचं पूर्ण ज्ञान होतं. शिवाय ‘प्रवासी मार्गदर्शक’सारख्या पुस्तकात पाहून तो प्रवाशांना चांगलं मार्गदर्शन करीत असे. पण पाय नसल्यामुळे तो स्वतः कधीही मुंबई सोडून गेला नव्हता. त्याचं सगळं ज्ञान पुस्तकी होतं.

अध्यात्मक्षेत्रात कीर्तनं प्रवचनं निरुपणं करणारे विद्वान, आध्यात्मिक विषयांवर ग्रंथ लिहिणारे पंडित यांना प्रत्यक्ष जीवनानुभव नसल्याने त्यांचे शब्द नुसत्या बुडबुड्यांसारखे असतात. श्रोत्यापैकी काहीजण त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन स्वतःमध्ये यशस्वी परिवर्तन करून घेत. पण बुवा कोरडे ते कोरडेच!
समाधान, संतोष, शांती, आनंद यांच्या अनुभवाशिवाय सारी उपासना वांझोटी असते.

शरीराच्या पातळीवरची, विज्ञान- तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिलेली सारी सुखं ही क्षणभंगुर असतात. अनित्य, अशाश्‍वत, अस्थिर वस्तूंपासून क्षणिक उपभोगाचं समाधान मिळू शकतं पण टिकणारा, शिळा न होणारा आनंदानुभव कधीही मिळू शकणार नाही. असा आनंदानुभव सर्वांना हवा असतो. पण कसा? तर चांदीच्या तबकातून आपल्यासमोर आरामात सादर केलेला.

एरवी, मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडावं लागत नाही. त्यातून (घराच्या आकर्षणातून उपभोगातून) सुटावं मात्र लागतं. अनासक्त, अलिप्त वृत्तीनं भोग भोगले तरी चालतात. पण आपल्याला घर न सोडता मोक्ष हवा असतो. जे मोक्षाचं, तेच आनंदाचं!
शरीराच्या पातळीवर स्पर्शातून घेतले जाणारे भोग जोपर्यंत हवेहवेसे वाटतात; मनाच्या पातळीवर सुखदुःखाच्या लाटांवर हेलकावत राहणं नकोसं वाटतं, तोपर्यंत देहमनाच्या पलीकडे बुद्धी, चित्त यांच्या पातळीवरील कशावरही अवलंबून नसलेला म्हणून कोणत्याही स्थितीत- परिस्थितीत अखंड अनुभवता येणारा आनंद मिळणार नसतो. नचिकेताकडे असा आनंद अनुभवण्याची क्षमता आहे याचा विश्‍वास यमाला आल्यावर त्यानं आत्मदर्शनाचा मार्ग सांगण्यास आरंभ केला –

* तं दुर्दर्शं गूढम् अनुप्रविष्टम्
गुहाहितं गह्वरेष्ठं पुराणम् |
अध्यात्मयोगअधिगमेन देवं
मत्वा धीरो हर्षशोकौ जहाति ॥

या मंत्राचा अर्थ अतिशय सुंदर आहे.

दिसण्यास (अनुभवण्यास) अत्यंत अवघड असलेल्या (तं दुर्दर्शं), त्या गूढ (मायेच्या पडद्याखाली लपलेल्या), सर्वव्यापी (अनुप्रविष्टम्), सर्वांच्या हृदयरूपी गुहेत असलेल्या (गुहाहितम्), संसाररूपी गहन अरण्यात असणार्‍या (गह्वरेष्ठं), अतिशय सनातन (पुराणम्) अशा आत्म्याला अध्यात्मयोगाची प्राप्ती करून घेऊ (अध्यात्मयोग अधिगमेन) जाणून घेऊन (मत्वा) धैर्यवान माणूस (धीरो) हर्ष आणि शोक (अशा द्वंद्वांचा) त्याग करतो. (अखंड आनंदात राहतो. आनंदाचे डोही…) उपनिषदांची भाषा जुन्या, ऋषिमुनींच्या काळातील (आर्ष) असल्याने गीतेपेक्षा अवघड आहे. गीता ही त्यामानानं खूप अलीकडची (सु. ५००० वर्षांपूर्वीची) आहे. पण उपनिषदातील मुख्य विचार किंवा संदेश गीतेनं (म्हणजे भगवान श्रीकृष्णानं आणि महर्षी व्यासांनी) स्वीकारलेला सहज दिसून येतो. या मंत्राचा प्रभाव गीतेतील विचारांवर स्पष्ट दिसून येतो.

अलीकडील विचारवंतांना उपनिषदातील मूलगामी विचार म्हणजेच गीतेतील अध्यात्मसंदेश आकर्षित करतो याचं मुख्य कारण म्हणजे त्यात विधी, उपचार, मूर्ती यांचा विचार न करता (जो पुराणग्रंथातून कथाचरित्र सांगून केलेला असतो) मूळ सत्य आत्मा, आनंद, मुक्ती यांच्या प्राप्तीचा मार्ग दाखवतो (अध्यात्मयोग). या दृष्टीनं कठोपनिषद आदर्श आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांसारख्या समाजाभिमुख असलेल्या संन्यासी यतींना कठोपनिषद अत्यंत प्रिय असतं.
अशा मंत्रांचं उपयोजन आपल्या दैनंदिन जीवनात कसं करायचं?…

* सर्वप्रथम आत्मज्ञान मिळवण्याचा म्हणजे सोप्या शब्दात सुखदुःखाच्या पलीकडे असलेल्या आनंदाचा अनुभव घेण्याचा निर्णय घेणं, त्या दृष्टीनं अन् दिशेनं प्रयत्न करण्याचा निश्चय करणं, कोणत्याही परिस्थितीत हा माझा जन्मसिद्ध अधिकार मिळवण्याचा निर्धार करणं आणि निग्रहपूर्वक तो मिळवणं हे महत्त्वाचं आहे.

* यासाठी आपण आजपर्यंत करत असलेली पूजा, इतर विधी तसेच दैनंदिन उपासना या गोष्टी बंद करण्याची बिलकुल आवश्यकता नसते. त्या अधिक भावपूर्ण रीतीनं सुरूच ठेवायच्या. यांच्या जोडीला अंतरंग उपासना अधिक जाणीवपूर्वक चालू करायची.
* ही आतली उपासना असल्यामुळे तिला कोणतीही बाह्य साधनं, उपचार यांची आवश्यकता नसते. शिवाय शारीरिक शक्ती नि म्हटलं तर वेळसुद्धा खर्च करावा लागत नाही. खरी आंतरिक उपासना मौन- श्रवण- वाचन- मनन- चिंतन- ध्यान- निदिध्यासन… या स्वरूपाची असते नि या सार्‍यांना जोडणारं समान सूत्र असतं नाम (नामस्मरण किंवा नामजपः या प्रकारच्या साधनेला अनुसंधान म्हणतात.
* अनुसंधान म्हणजे परमेश्‍वरी शक्तीशी (परमात्म्याशी) अखंड जोडलेलं राहणं. त्यामुळे आपण साधा ‘माणूस’ नावाचा दोन पायांचा प्राणी नसून त्या परब्रह्म -परमात्म्याचा (सद्गुरु- चैतन्याचा) अंश आहोत(आत्मा) याची जिवंत जाणीव राहते.

* मी हाडामांसाचा देह नाही, मी नाक-कान-डोळे-हात-पाय अशा इंद्रियांचा म्हणजे त्यांच्या भोगविषयांचा गुलाम नाही तर मी आहे माझ्या मन-बुद्धी पलीकडचा आत्मा! हा विचारच किती सुखद नि आनंदमय आहे! या विचारात अखंड डुंबत राहणं म्हणजे अनुसंधान. थोडक्यात अनुसंधानाच्या साधनांचा विचार करु या.
* मौन ः सोप्या शब्दात न बोलणं. पण मनातील संवाद, बुद्धीतल्या प्रतिक्रिया चालूच राहतात. त्यांच्या पलीकडे गेल्यावरच साधतं खरं मौन! असं मन निर्विचार पातळीपर्यंत आपल्याला नेऊ शकतं. जिथं आपला आत्म्याशी म्हणजेच ‘स्व’शी (स्वतःशी) मूळ संवाद सुरू होतो. त्यामुळे मन शांत होऊ लागतं. मौन हे मनःशांतीचं महाद्वार आहे. मौनातून मनशक्तीचा प्रचंड संचय होऊ लागतो. शक्तीची आय (कमाई) अधिक प्रमाणावर होेते; नि क्रोध, लोभ इ. विकारांमुळे होणारा शक्तीचा व्यय कमी होतो. म्हणून शक्तिसंचयासाठी अतिशय प्रभावी साधन किंवा माध्यम मनच आहे.

* श्रवण – वाचन ः ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे आणि केवळ ध्वनी-शब्द-वाक्यांचा उच्चार करत राहणं म्हणजे वाचन नव्हे. श्रवण म्हणजे लक्ष देऊन (अवधानपूर्वक) भावार्थ लक्षात घेऊन ऐकणं. मुख्य म्हणजे जे ऐकलंय नि वाचलंय त्यातील काहीतरी स्वतःच्या जीवनात उतरवणं नि चांगला माणूस बनत राहणं. हे खरं अध्यात्ममार्गाचं रहस्य (ध्येय) आहे. समर्थ रामदासांचं या संदर्भातलं सूत्र आपल्याला माहीत आहेच. ‘श्रवणाचा आरंभ कानात, मध्य मनात अन् शेवट जीवनात होतो म्हणजे झाला पाहिजे.’
वाचन म्हणजे काय तर लेखी किंवा छापील शब्दांवर विचार करत ते शब्द, वाक्यं इ. समजून घेणं. वाचनात आकलनाबरोबरच मनन- चिंतनाचा समावेश होतो.

* मनन-चिंतन ः ऐकलेलं- वाचलेलं- अनुभवलेलं मनात घोळवत ठेवणं, त्याच्या अर्थावर खोल विचार म्हणजे चिंतन करत राहणं आवश्यक असतं. यामुळे बुद्धी योग्य निर्णय घेण्यासाठी नि चित्त चिंतन करण्यासाठी सक्षम बनतं. याच्यासाठी थोडं संथ- शांत बसणं आवश्यक असतं. आनंदप्राप्तीच्या वाटेवरचं खरं पाथेय (शिदोरी) हे मनन-चिंतनच असतं. याविषयी अधिक मार्गदर्शन कठोपनिषदातच पुढे केलं आहे.

* ध्यान ः हे करायचं नसतं तर ते आपणहून लागायला हवं असतं. यात मनापेक्षा बुद्धीची भूमिका महत्त्वाची असते. ध्यान शब्दातला मूळ शब्द धी म्हणजे बुद्धी हाच आहे.
इकडे तिकडे भटकणारे नि भरकटणारे विचार, कल्पना हे सारं क्रमाक्रमानं शांत व्हावं लागतं. ‘ठायीच बैसोनि करी एकचित्त| आवडी अनंत आळवावा ॥ ध्यानानं अंतर्बाह्य शुद्धीचा अनुभव येतो.
* नाम ः ‘नामस्मरण’ ही मौन क्रिया आहे. नामजप ही प्रकट, मुखानं करायची क्रिया आहे. ओठानं हलकं स्वतःलाच ऐकू येईल असं पण स्पष्ट उच्चारलेलं नाम हे एकाग्रतेसाठी जास्त प्रभावी असतं. याला ‘उपांशू जप’ असंही म्हणतात. अनेकांना सहभागी करून वैखरीनं मोठ्यानं नाम घेण्याला नामसंकीर्तन म्हणतात. मौनापासून ध्यानापर्यंत मधल्या सर्व पायर्‍यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘नाम’ होय. स्थूल देह आणि सूक्ष्म अंतर्मन (बुद्धी) यांना एकाच वेळी जोडणारा सजीव सेतू म्हणजे नाम!
अशा अंतरंग उपासनेचा एक महत्त्वाचा प्रभाव जीवनावर पडतो. तो म्हणजे सर्व अवस्थात आपल्याला भगवंताचा किंवा सद्गुरूंचा अनुभव येत राहतो. आपण ‘सद्गुरूमय’ बनून जातो. दुधात लोणी असतं तसा आणि बर्फात पाणी असतं तसा चैतन्यमय भगवंत किंवा सद्गुरू आपल्या तनामनाजीवनात गच्च भरून राहतो, आणि तो पूर्ण आनंदमय असल्याने जीवन मृण्मय (पार्थिव; मातीच्या) अवस्थेतून वाङ्‌मय – चिन्मय – आनंदमय अवस्थातून परम अशा ब्रह्ममय अवस्थेत जातं. थेंबुटा (लहान थेंब) सागरी बुडाला नि सागरची झाला हा दिव्य अनुभव येतो. असा जीव-शिव मीलनाचा अनुभवच उपनिषदातील ऋषी घेऊन आपल्याला सांगून राहिलेयत. आपण त्यांचं अनुसरण करायला नको का?