– डॉ. सुरज स. पाटलेकर
(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव )
हृद्रोगामध्ये रोग्यास पूर्ण विश्रांतीची गरज असते. आहार हा पातळ, पचायला हलका, संतर्पण व पोषण करणारा हवा. तांदळाची खीर, मूग, पडवळ, कारले, द्राक्ष, डाळिंब ई. पथ्यकर आहेत पण दिवसभर तेच खात ही बसू नये.
मागच्या लेखामध्ये हृद्रोग उत्पन्न करणार्या हेतू व त्यांची लक्षणे यांची माहिती करून घेतली. आता या लेखात हृदयातील काही व्याधींबद्दल जाणून घेऊया.
‘कार्डिऍक अरिदमिया’ म्हणजेच हृदयाची अयोग्य व अनियमित गती. ती अतिवेगात असू शकते किंवा अतिसंथ, मंदगती. लक्षणे असतीलही व नसतीलही. असलीच तर चक्कर येणे, मूर्च्छित(बेहोष)होणे, छातीमध्ये दुखणे व धडधडल्यासारखे वाटणे, हृदयाचे ठोके चुकल्यासारखे वाटणे, श्वासोश्वासाला त्रास होणे, डोकेदुखी, थकवा, चिंता ही लक्षणे असतात. तंबाखू, मद्यपान, व्यायाम, कॉफी, आजार (व्हायरल इ.), मानसिक तणाव, काही विशिष्ट आहार(मांस, जास्त प्रमाणात मीठ घातलेले जिन्नस, पिझ्झा) व औषध े(वैद्यांच्या सल्ल्याने न घेतलेली यासारखी), प्रदूषण यांच्या अतिरिक्त वापराने/केल्याने/अतिरेक झाल्याने हे त्रास वाढतात. पायाला (घोटा व तळवे यांना) सूज येते. तसेच ज्यांना उच्चरक्तदाब, प्रमेह, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी, स्थौल्य (जाड़ेपणा), झोप न येणे सारखे त्रास आहेत त्यांना हा व्याधी जास्त प्रमाणात होतो.
‘ऍथेरोस्क्लेरॉसिस’मध्ये हृदयातून संपूर्ण शरीराला, शरिरावयांना रक्त, प्राणवायू व पोषकांश पुरवणार्या रक्तवाहिन्या ह्या चरबी(फॅट्स), कॉलेस्टेरॉलसारख्या गोष्टींमुळे आतून अरुंद होतात (रक्तवाहिन्यांच्या आत थर उत्पन्न होतो), घट्ट होतात, कडक व ताठ होतात (त्यामधील लवचिकता नष्ट होते). हे कोरोनरी आर्टरी डीजीस/इस्च्केमिक हार्ट डीजीस (हृदयाला पुरवठा करणार्या रक्तवाहिन्या खराब होतात किंवा रोगग्रस्त) मधीलच एक. मधील सावकाश वाढणारा व्याधी असल्यामुळे सुरुवातीस काहीही लक्षणे नसतात पण जशा जशा रक्तवाहिन्या आतून अरुंद होत जातात किंवा रक्ताचा प्रवाह कमी झाल्यामुळे रक्ताची गाठ तयार होते तसे छातीत दुखणे, हार्ट ऍटॅक, हातापायात मुंग्या येणे, अडखळत बोलणे/बोलण्यास त्रास होणे, रक्तदाब वाढणे(रक्ताची गाठ/रक्तवाहिनी फुटल्यामुळे), वृक्क खराब होणे, दृष्टी कमी होणे सारख्या तक्रारी असतात. तळलेले पदार्थ, चरबीयुक्त (मांस इ.), पचायला जड (नूडल्स, पिझ्झासारखे मैद्याचे पदार्थ, चॉकलेट, चायनीज, मद्यपान, धूम्रपान यांमुळे हे होण्याची शक्यता अधिकच वाढते. ‘अँजायना पेक्टोरिस’ हासुद्धा याचाच एक प्रकार आहे व यालाच हृत्शूल म्हणतात. ही वेदना छातीच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांपासून किंवा पाठीतून चालू होते. त्यानंतर डावा खांदा, हात(भुज), बोटांपर्यंत जाते/संचार करते. मान व डाव्या कुशीमध्येसुद्धा कधीतरी वेदना जाणवतात. परिश्रम केल्याने वेदना वाढतात.
कार्डियो-मायोपॅथीमध्ये ह्रदयाचे स्नायू(हार्ट मसल्स) घट्ट, अशक्त होतात व शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा करण्यास अममर्थ ठरतात. हे आनुवंशिक असू शकते किंवा हेतूंमुळे (आहार-विहार मधील) तयार झालेले. बाकीच्या हृद्रोगाच्या लक्षणांसारखीच इथेही लक्षणे सारखीच असतात जसे की खोकला येणे श्वासोश्वासाला त्रास होणे(श्रम केल्यावर, झोपल्यावर जास्त वाढणे), छातीत दुखणे/गच्च झाल्यासारखे वाटणे, थकवा येणे, हातापायात सूज येणे, पोट फुगणे, हृद्गती अनियमित होणे, चक्कर येणे इ.
‘कंजेनायटल हार्ट डीजिस’ म्हणजेच जन्मजात किंवा जन्मापासूनच हृदयाच्या अनुचित आकारामुळे(हृदयाच्या भिंती, वाल्व्स, तेथून येणार्या रक्तवाहिन्या व नसा यामध्ये)ज्या व्याधी होतात. जीवनावधी कमी होते. डाऊन सिंड्रोम’ हा याचाच एक प्रकार. श्वासोश्वासाला त्रास होणे, ओठ-त्वचा-नख ह्या नीळसर पडणे, काहीही खाताना-पिताना त्रास होणे, व न खाल्ल्यामुळे वजन कमी होणे, शरीराची वाढ खुंटणे, अनियमित हृद्गती, छातीत दुखणे, चक्कर येणे, अंगास सूज येणे, थकवा जाणवणे ह्या तक्रारी एकत्र किंवा स्वतंत्रपणे असतात. गरोदरपणात घेतल्या गेलेल्या चुकीच्या किंवा एखाद्या विशिष्ट औषधामुळे/त्यांचा अतिरिक्त मात्रेमुळे(ओवरडोज), मद्यपान,धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन, व्हायरल इन्फेक्शन(गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्याच्या कालावधीत), प्रमेह(रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने) सारख्या गोष्टींमुळे हे होते. हृदयात सौम्य दोष/डिफेक्ट असतील तर ते पुढे जाऊन आपोआप बरे ही होतात. औषधी चिकित्सा व्यर्थ ठरल्यास हार्ट ट्रांसप्लांट(हृदय प्रत्यारोपण), ओपन हार्ट शस्त्रक्रिया, कॅथेटरायजेशन, हृदयामध्ये उपकरणांचे रोपण (इम्प्लांटेबल हार्ट डिव्हायसीस) जसे की पेसमेकर, डीफिब्रिलेटर(आयसीडी) यासारख्यांची गरज भासू शकते.
‘एँडोकार्डायटीस’ (हृदयाच्या आतील बाजुस, कक्ष/चेंबर्स व वाल्व्स यांना सूज येणे), ‘मायोकार्डायटीस’(हृदयाच्या स्नायूंना सूज येणे), ‘पेरिकार्डायटीस’(हृदयाच्या बाहेरील मेदयुक्त आवरणाला सूज येणे) हे व्याधी बॅक्टेरियल, व्हायरल, फन्गलसारख्या इन्फेक्शनमुळे होतात किंवा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती हे घडवून आणते. सर्दी, कोविड-१९/कोरोना वायरस, हिपॅटायटीस (यकृताची सूज) बी व सी, हर्पिस सिम्प्लेक्स (नागीण/सर्पीण रोग करणारे) उत्पन्न करणार्या व्हायरसमुळेही वरील व्याधी होऊ शकतात. हे जंतू मुखातून, रक्तातून, शरीराच्या इतर भागातून हृदयात जातात व तेथे सूज येते. बाकीच्या लक्षणांव्यतिरिक्त ताप, अंगाला पुरळ, थंडी वाजून येणे, रात्रींच्या वेळेस घाम खूप येणे, सन्धिशूल ही लक्षणे असतात.
मेनोपॉज (मासिक पाळी बंद होण्याचा काळ) मध्ये ईस्ट्रोजन हे हॉर्मोन (जे प्राकृत असल्यास रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकवून ठेवते) कमी होते आणि यामुळे रक्तवाहिन्या आतून घट्ट व अरुंद होतात व रक्तपुरवठा कमी होतो. अशाने हृदयाला मार बसू शकतो. त्यामुळे आलेल्या औदासिन्य व चिंतेनेदेखील हृद्रोग होतात व हृद्रोगामुळे औदासिन्य येते.
काही लोकानां वाईट सवय असते इंटरनेट वरून स्वतःच्या व्याधीचे निदान करण्याचे. असे करू नये आणी हृदयासारख्या अमूल्य अवयवाबद्दल तर बिलकूलच नाही. तज्ञ वैद्यांकडून व्याधीचे व्यवस्थित परीक्षण करावे व त्यांच्याकडूनच रक्तदाब इ. साठी औषध घ्यावे. एकच औषध सगळ्यानाच चालून जाईल असे नसते. आणि एकच औषध वर्षानुवर्षे वैद्यांच्या सल्ल्याविना चालू ठेवावे असेही नाही. कदाचित ते औषध घेण्याची गरजही नसेल किंवा त्याची मात्रा कमी-जास्त करण्याची गरज असेल व तुम्ही कंसल्टेशन फी वाचवण्याकरिता उगीचच ते त्याच मात्रेत घेत असाल. प्रत्येक मनुष्याचे वय, प्रकृती, बल, पचनशक्तीनुसार त्यांची औषधे व मात्रा बदलतात.
इतर परीक्षणांसोबतच ईसीजी(ईकोकार्डिओग्राम-स्ट्रेस, एक्सरसाइज़, ऍम्बुलेटरी, डोप्लर), सीटी स्कॅन(कम्प्यूटेड टोमोग्राफी), स्ट्रेस ईकेजी टेस्ट, होल्टर मॉनीटरिंग, विनस बी-स्कॅन, कॅरोटिड अल्ट्रासाऊंड,
एमआरआय (मॅग्नेटिक रेसोनन्स ईमेजिंग), एँजीओग्राफी (कोरोनरी,लफ़ट-राईट वेंट्रिकुलर), बायोप्सी (एँडोमायोकार्डियल) सारखे अनेक आधुनिक परीक्षणे व्याधीचे निदान करण्यास गरजेचे ठरतात.
हृद्रोगामध्ये रोग्यास पूर्ण विश्रांतीची गरज असते. आहार हा पातळ, पचायला हलका, संतर्पण व पोषण करणारा हवा. तांदळाची खीर, मूग, पडवळ, कारले, द्राक्ष, डाळिंब ई. पथ्यकर आहेत पण दिवसभर तेच खात ही बसू नये. तिखट, आंबट ताक, तुरट रसाचे, पचायला जड, तैलकट पदार्थ खाऊ नयेत.