>> बळींची संख्या ७०
>> सध्याची रुग्णसंख्या २२८२
>> कोरोनामुक्त १४२
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूची काल नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या ७० झाली आहे. दरम्यान, नवे ३३३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आठ हजाराच्या जवळ येऊन ठेवली आहे. कोरोना पॉझिटिव्ह एकूण रूग्णांची संख्या ७९४७ झाली असून सध्याच्या रूग्णांची संख्या २२८२ एवढी झाली आहे.
राज्यातील १४२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची संख्या ५५९५ एवढी झाली आहे.
राज्यात मागील दहा दिवसांपासून कोरोना रूग्णाच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. म्हापसा येथे ६२ वर्षीय पुरूष रूग्णाला मृतावस्थेत उत्तर गोवा जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मयताचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
३० वर्षाच्या रूग्णाचे निधन
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या कुडणे डिचोली येथील ३० वर्षाच्या युवकाचे कोरोनाने निधन झाले. सडा वास्को येथील ८० वर्षाच्या इसमाचे बांबोळी येथील इस्पितळात निधन झाले आहे. या दोघांचेही को-मॉर्बिडमुळे निधन झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
सात दिवसांत २५ बळी
राज्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या सात दिवसांच्या काळात २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या काळात दर दिवशी किमान तीन रूग्णांचा मृत्यू होत आहे. २ ऑगस्टला ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
गोमेकॉत ६७ संशयित दाखल
जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात ६७ कोरोना संशयित रूग्णांना दाखल करण्यात आले आहेत. आरोग्य खात्याने २६२२ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पणजी येथील आर्थिक गुन्हे विभागातील एक वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
३९ जणांकडून प्लाझ्मा दान
राज्यातील ३९ जणांनी आत्तापर्यत प्लाझ्मा दान केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार सुरू असून रूग्णांना लाभ होऊ लागला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल दिली.
पणजीत एकूण १७ रुग्ण
पणजीत एकूण १७ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. आल्तिनो व्यतिरिक्त भाटले येथे तीन रूग्ण, दोनापावल येथे २ रूग्ण आणि करंझाळे येथे २ रूग्ण आढळून आले आहेत.
एसबीआयचा कर्मचारी बाधित
भारतीय स्टेट बँकेच्या पणजी मुख्य शाखेतील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे शाखा ७ ते ९ ऑगस्ट २०२० दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे, असे शाखेच्या मुख्य व्यवस्थापकांनी कळविले आहे.
आल्तिनो परिसरात १४ पॉझिटिव्ह रुग्ण
आल्तिनो पणजी स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या मागील बाजूच्या कोरोना विषाणूने एका युवकाचा मृत्यू झालेल्या भागात नवे १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आल्तिनो येथील सदर भागातील २९ वर्षीय युवकाचा कोरोना विषाणूने मृत्यू झाल्यानंतर त्या भागातील ११२ जणांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १४ जणांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
आल्तिनो भागातील १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना इस्पितळामध्ये हालविण्यात आले आहेत. तर, चार पॉझिटिव्ह रुग्णांनी त्यांच्या कुटुंबात लहान मूल असल्याने घरीच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कुटुंबातील सदस्यांची पुन्हा स्वॅब चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात दाटीवाटीने घरे आहेत. सदर भागात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. या भागाच्या खालच्या भागातसुद्धा दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्या भागात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पणजी महानगरपालिकेने कोरोना रुग्ण आढळून आलेल्या आल्तिनो भागात निर्जंतुकीकरण केले आहे. महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कामराभाट, करंजाळे, सांतइनेज बांध, भाटले, चिंचोळे, मळा, रायबंदर आदी भागात कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत.
ओल्ड गोव्यात ११ पोलीस बाधित
ओल्ड गोवा येथे काल ११ पोलीस बाधित सापडले असून त्यात तीन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. राज्यात पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची बाधा होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. फोंडा पोलीस स्थानकानंतर आता ओल्ड गोवा पोलीस स्थानकाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची स्वॅब चाचणी केली जाणार आहे.