इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर पाहुण्या पाकिस्तानने तिसर्या दिवशी मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडवर १०७ धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर पाकिस्तानने दुसर्या डावात अंतिम वृत्त हाती येईपर्यंत ३१ षटकांत ४ बाद ८७ धावा केल्या होत्या. असद शफिक २१ व मोहम्मद रिझवान १६ धावांवर नाबाद आहेत.
इंग्लंडने दुसर्या दिवसाच्या ४ बाद ९२ धावांवरून काल पुढे खेळताना पहिल्या डावात २१९ धावांपर्यंत मजल मारली. २२ वर्षीय ओली पोप याने आपले पाचवे कसोटी अर्धशतक लगावताना इंग्लंडकडून सर्वाधिक ६२ धावा केल्या. जोस बटलर (३८) याच्यासह पोपने पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. तळात स्टुअर्ट ब्रॉडने नाबाद २९ धावा केल्याने इंग्लंडला द्विशतकी वेस ओलांडता आली. पाकिस्तानकडून लेगस्पिनर यासिर शाह सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६६ धावांत ४ गडी बाद केले.
मोहम्मद अब्बासने ३३ धावांत २ तर गुगली गोलंदाज शादाब खानने १३ धावांत २ गडी बाद केले. शाहीन आफ्रदी व नसीम शाह यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पहिल्या डावात ३२६ धावा केलेल्या पाकिस्तानची दुसर्या डावातील सुरुवात खराब झाली. पहिल्या डावातील शतकवीर शान मसूद दुसर्या डावात भोपळाही फोडू शकला नाही. आबिद अली (२०), अझर अली (१८) व बाबर आझम (५) हे देखील स्वस्तात बाद झाले.