पेडणे, डिचोली व सत्तरीला पुराचा तडाखा

0
206

पश्‍चिम घाट व उत्तर गोव्यातील काही भागात पडलेल्या जोरदार पावसामुळे म्हादई, वाळवंटी, शापोरा, खांडेपार या प्रमुख नद्यांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. पेडणे तालुक्यातील इब्रामपूर, डिचोली तालुक्यातील साळ, साखळी व सत्तरीतील सोनाळ या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. तिळारी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने इब्रामपूर व साळ या गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. इब्रामपूर गावात पुरात सापडलेल्या एका महिलेला स्थानिकांनी वाचविले.

हंसापूर, चांदेल या भागात पुराचे पाणी घुसले. शापोरा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने बार्देश तालुक्यातील कोलवाळ, रेवोडा, नादोडा, कामुर्ली भागांतील काही घरांत पाणी घुसले. कोलवाळ येथे पुरामुळे काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले होते.
म्हादई नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने सत्तरी तालुक्यातील सोनाळ व इतर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे सत्तरीतील सोनाळ गावाचा संपर्क तुटला होता. सोनाळ गावातील काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. घोटेली, केरी येथील रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले होते. काही घरांत पाणी घुसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

खराब हवामानामुळे रायबंदर – चोडण या जलमार्गावरील फेरीबोट सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती.
बेळगाव जिल्ह्यातील काही भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गोव्यातील खांडेपार नदी आणि उत्तर गोव्यातील म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय पाणी लवादाने ट्विट संदेशाद्वारे दिली आहे.