>> श्रीरामाच्या जयघोषाने अयोध्या दुमदुमली
>> १७५ मान्यवरांना निमंत्रण
>> कडेकोट सुरक्षा व्यवस्था
अयोध्येत रामजन्मभूमीत भव्य राममंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज (दि. ५ ऑगस्ट) रोजी दु. १२.३० वाजता होणार आहे. राममंदिराच्या कोनशिलेचीही स्थापना त्यांच्याहस्ते होईल. यापूर्वी ते अयोध्येतील हनुमानगडी मंदिरात पूजा करतील. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी एकूण १७५ लोकांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती या मंदिराची जबाबदारी सांभाळणार्या जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिली. या लोकांमध्ये विविध अध्यात्मिक परंपरा मानणारे १३५ साधू आहेत. तर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त केवळ ५ मान्यवरच असणार आहेत. संपूर्ण देशभरात हा आनंद उत्सव साजरा होणार आहे.
मोदींबरोबरच रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत, इक्बाल अन्सारी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित असतील. दरम्यान देण्यात आलेल्या प्रत्येक निमंत्रणपत्रिकेवर एक कोड छापण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तो कोड तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक सिंघल यांच्या कुटुंबियांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे येथे मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान या सोहळ्याला लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेते उपस्थित नसतील, असे वृत्त आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे कमीत कमी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या यादीतील काही नावे वगळण्यात आली असून फक्त १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापैकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले.
अयोध्या नगरी सजली
भूमीपूजन सोहळ्याला निवडक २०० लोकांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्येतले रस्ते दुरुस्त करण्यात आले असून भिंतींवर रामायणातील चित्र काढण्यात आले आहेत. अयोध्येत ठिकठिकाणी सुंदर देखावेही उभारण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये दिपोत्सवालाही सुरुवात झाली असून मंदिरांवर रोषणाई करण्यात आली आहे. शरयू नदीचा काठही सजविण्यात आला आहे. नदीवरही गंगा आरती होणार आहे. तर अयोध्येतल्या २० हजार मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
अमेरिकेमध्येही आकर्षण
अयोध्येमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमीपूजनाचा सोहळा होणार आहे. हा ऐतिहासिक क्षण अमेरिकेतही साजरा केला जाणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या विशेष पूजा आणि प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे.
साडेबाराचा मुहूर्त
बुधवारी दुपारी साडेबारा वाजता भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ नंतर अयोध्येत पोहोचतील. ते हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील आणि नंतर रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते भूमीपूजन समारंभात सहभागी होतील.
पक्षकार अन्सारींना पहिले निमंत्रण
भूमीपूजनाची पहिली निमंत्रणपत्रिका बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांना देण्यात आली. अन्सारी यांनी निमंत्रण स्वीकारले असून ही भगवान रामाचीच इच्छा होती, असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
‘माझ्यासाठी भाग्याचा क्षण’
बुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. नियतीने माझ्याकडून रथयात्रा घडवली हे मी माझे भाग्य समजतो. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे, असे लालकृष्ण आडवाणी यांनी म्हणत कृतज्ञता व्यक्त केली आहे.