‘नगरनियोजन’ खात्याचा कारभार ऑनलाइन करा

0
157

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना

नगरनियोजन खात्याचा कारभार येत्या सहा महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली.

नगरनियोजन खात्याच्या ऑनलाइन इमारत बांधकाम आराखडा मंजुरी सुविधेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील सूचना केली आहे. यावेळी नगरनियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर आणि नगरनियोजन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

नगरनियोजन खात्यात नागरिकांना अनेक विविध कामांसाठी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी समस्या सोडविण्यावर भर द्यावा. ऑनलाइन पद्धतीने विविध कारभार सुरू केल्यास नागरिकांचा त्रास कमी होऊ शकतो.

येत्या सहा महिन्यांत टीपीसीचे सर्व कारभार ऑनलाइन पद्धतीने सुरू करावेत. लोकांना कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
नगरनियोजन खात्याने शुल्क आकारणी सुध्दा ऑनलाइन पद्धतीने केली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी घर बांधणी व इतर कामे ऑनलाइन पद्धतीने सुरू केल्यानंतर आराखड्यांना मान्यता घेण्यासाठी कार्यालयात खेपा घालाव्या लागणार नाहीत, असे ते म्हणाले.