अपेक्षित काळजी हृदयाची घेतो का? भाग – १

0
338
  •  डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

हृदय हा खूपच नाजूक अवयव व एक प्रकारचे मर्म आहे, जिथे प्राण राहतात आणि त्यामुळे येथे मार लागल्याने लगेचच मृत्यूदेखील होऊ शकतो. पण खरंच, आपण जेवढी अपेक्षित आहे तेवढी काळजी आपल्या हृदयाची घेतो का?

हृदय हा खूपच नाजूक अवयव व एक प्रकारचे मर्म आहे, जिथे प्राण राहतात आणि ह्याच्याचमुळे येथे मार लागल्याने लगेचच मृत्यूदेखील होऊ शकतो. पण खरंच, आपण जेवढी अपेक्षित आहे तेवढी काळजी आपल्या हृदयाची घेतो का? आपला रक्तदाब(ब्लड प्रेशर) हृदयाशीच तर निगडीत असतो. तिथून नियमित व सातत्याने रक्तपुरवठाच (पर्यायाने रक्तातून प्राणवायू व जीवनावश्यक असणार्‍या इतर घटकद्रव्यांचा) जर झाला नाही तर ह्या शरीराला काहीही महत्त्व नाही. म्हणूनच हृदयाची विकृती झाल्यास (हृद्रोग असेही म्हणतात), शरीरात अनेक गंभीर लक्षणे उत्पन्न होतात. त्यांपैकी काही लगेचच दिसू लागतात तर काही लक्षणे पूर्णपणे व्यक्त होण्यास थोडासा अधिक कालावधी लागतो आणि हेच घातक ठरते. कारण जोपर्यंत आपल्याला ह्या सर्व गोष्टी दृष्टीस, लक्षात येतात तोपर्यंत उशीर झालेला असतो किंवा आपण ह्या सर्व तक्रारींकडे क्षुल्लक समजून दुर्लक्ष करत असतो.

कोरडा/शुष्क आहार (चणे, पाव इ.), अति उष्ण (गुण व स्वरूपाने सुद्धा), पचायला जड, आंबट-खारट-कडू-क्षारीय-तुरट रसाचे पदार्थ खाणे-पिणे, मर्यादेपेक्षा अधिक उपवास करणे-अगदीच कमी जेवणे, अजीर्ण झाले असताना जेवणे, मद्यपान-धूम्रपान-अमली पदार्थांचे सेवन करणे, जास्त प्रमाणात श्रम करणे (शारीरिक कसरत, यात व्यायामदेखील समाविष्ट), छातीला (हृदयाच्या ठिकाणी) मार लागल्याने जे एखादा अपघात/मारामारीसारख्या गोष्टींमुळे होऊ शकते, उन्हात फिरणे, क्रोध-भय-चिंता-शोक करणे-रडणे-दुःख करत बसणे (कारण मनाचे स्थान देखील हृदय असे सांगितले आहे), वेगांचे धारण करणे (शिंका, उलटी, अश्रू, सारखे वेग अडवायचे नसतात) किंवा मुद्दामहून प्रवृत्त करणे (उलटी इत्यादी जाणूनबुजून काढणे), पंचकर्म (वमन, विरेचन, बस्ती) चुकीच्या पद्धतीने जर घेतल्या गेल्या आणि उल्लेखीत सर्व कारणांचा जर अतियोग झाला, अतीप्रमाणात केल्या गेल्या तर हृद्रोग उत्पन्न होतात. अतिरिक्त ताणतणाव (घरी, व्यवसाय, नातीसंबंधी इ.), कामाचा व्याप (टार्गेट कम्प्लिशन इ.), कामाच्या बदललेल्या वेळा (रात्रपाळीमुळे होणारे जागरण) ह्या गोष्टीदेखील हृद्‌रोगासाठी तेवढ्याच कारणीभुत ठरतात.

हृद्रोगाच्या लक्षणांमध्ये विशिष्ट प्रकारच्या वेदना जाणवतात जसे की छातीमध्ये आवळल्यासारखी, जखडल्यासारखी, टोचल्यासारखी, चिरल्यासारखी, कापल्यासारखी, फुटल्यासारखी, घुसळल्यासारखी वेदना होणे. रुग्णास आवाज सहन होत नाही, श्वासोश्वासाला त्रास होतो, हृदयाच्या ठिकाणी स्पंदने जाणवतात (छातीत धडधडणे), हृद्गती बिघडते, हृदयाच्या आवाजामध्ये बदल होतो, नेहमीच भीती वाटू लागते, एकप्रकारचे दैन्य वाटते, उत्साहहानी होते, दुर्बल होणे, आळस येतो.

याशिवाय त्वचेचा वर्ण/रंग बदलणे, त्वचा निस्तेज/फिकट- सफेद दिसणे, काळपट पडणे, डोके दुखणे, चक्कर-ताप-खोकला येणे, उचक्या-धाप लागणे (विशेषत: चालल्यावर), तोंडाची चव बिघडणे (आंबट, कडवट होणे), अरुची असणे, तोंडात कफ आल्याने पुन:पुन्हा थुंकावेसे वाटणे /तोंड सुकून येणे, जीभ बाहेर पडणे, लाळ गळणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, खूप तहान लागणे, अस्वस्थता जाणवणे, उलटी होणे (कडवट), अंगास सूज येणे, घाम जास्त येणे, हृदयाच्या ठिकाणी जळजळ व भारी/जड होणे (एखादे वजन किंवा दगड ठेवल्याप्रमाणे), घुसमटल्यासारखे वाटणे, झापड येणे यांसारख्या तक्रारी असतात. यकृतालाही सूज येते (कारण गर्भोत्पत्तीच्या वेळेस हृदय, फुप्फुस यांचा यकृत, प्लीहा यांच्याशी संबंध असतो, त्यांची उत्पत्ती एकाच वेळेस होते व यांच्या विकृती परस्परांचा उपघात करू शकते) असे दिसून आले आहे आणि याने जलोदर (पोटात पाणी साचणे इ.) नावाच्या व्याधीची उत्पत्तीदेखील होते. हृद्रव/हृदयाच्या ठिकाणी शैथिल्य येऊन आकार वाढतो (आणि हे लक्षण कोविड-१९/कोरोनामुळे संक्रमित झालेल्या किंवा त्यातून बरे झालेल्या रुग्णांमध्येही दिसते, असे सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे). ही सर्वच लक्षणे एकत्रितपणे येतील असेही नाहीये. ह्याव्यतिरिक्त अजूनही बरीचशी असू शकतात.

आयुर्वेदामध्ये असाही उल्लेख आहे की तिन्ही दोषांमुळे (वात-पित्त-कफ)/त्यांच्या विकृतीमुळे जो हृद्रोग होतो त्यामध्ये जर रुग्णाने तीळ, दूध, गूळ यांसारखे शरीरातील कफ वाढवणारे पदार्थ खाल्ले गेले तर त्याच्या हृदयामध्ये ग्रंथींची(गाठ) उत्पत्ती होते व हृदयाचा तो भाग विकृत होतो. आणि तेथे सूक्ष्म, अणूसारख्या कृमींची (जंतांची) उत्पत्ती होते जे नंतर हृदय कुरतडतात व खातात (हाच त्यांचा स्वभाव आहे). ते एवढे सूक्ष्म असतात की डोळ्यांनीदेखील दिसत नाहीत. म्हणूनच त्यांना हृदयाद कृमी असे म्हटले आहे. अशाने हृदयात शस्त्राने, सुयाने टोचल्याप्रमाणे तीव्र वेदना होतात. बाकीची लक्षणेही असतात.
(क्रमश:)