>> जॉनी बॅअरस्टोवने कुटल्या ८२ धावा
जॉनी बॅअरस्टोवने केवळ ४१ चेंडूंत कुटलेल्या ८२ धावांच्या बळावर इंग्लंडने दुसर्या वनडे सामन्यात ६ गडी व १०५ चेंडू राखून पराभव केला. आयर्लंडच्या २१२ धावांना उत्तर देताना इंग्लंडने ३२.३ षटकांत केवळ ४ गडी गमावून २१६ धावा करत विजय साकार केला. इंग्लंडने या विजयासह ३ सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. मालिकेतील तिसरा सामना ४ रोजी होणार आहे.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात आयर्लंडप्रमाणेच खराब झाली. जेसन रॉय शून्यावर बाद झाला. परंतु, याचा परिणाम बॅअरस्टोवने आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही. तो विशेषकरून जोशुआ लिटल् व क्रेग यंग या नव्या चेंडूने गोलंदाजी करणार्या आयर्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. जेम्स व्हिन्स (१६) व टॉम बँटन (१५) यांना सलग दुसर्यांचा चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. बॅअरस्टोव बाद झाला त्यावेळी फलकावर १३१ धावा लागल्या होत्या. यातील ८२ धावा एकट्या बॅअरस्टोवने १४ चौकार व २ षटकारांसह केल्या होत्या. बॅअरस्टोवला बाद केलेल्या लिटल् याने कर्णधार ऑईन मॉर्गन (०) व मोईन अली (०) यांना बाद करत इंग्लंडला ६ बाद १३७ अशा अडचणीत आणले. यावेळी सॅम बिलिंग्स (नाबाद ४६, ६ चौकार) व डेव्हिड विली (नाबाद ४७, ५ चौकार, २ षटकार) यांनी ७९ धावांची अविभक्त भागीदारी करत संघाला विजयी केले. आयर्लंडकडून जोशुआ लिटल् याने ६० धावांत ३, कर्टिस कँफरने ५० धावांत २ तर क्रेग यंगने ६८ धावांत १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या फलंदाजांना कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. सलामीवीर गॅरेथ डेलानी १२ चेंडू खेळून भोपळाही न फोडता विलीच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन परतला. यानंतर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिले. त्यांच्याकडून अष्टपैलू कर्टिस कँफर याने ८७ चेंडूंत सर्वाधिक ६८ धावांचे योगदान दिले. सिमी सिंग (२५), अँडी मॅकब्रायन (२४) यांच्यामुळे आयर्लंडला द्विशतकी वेस ओलांडता आली. इंग्लंडकडून लेगस्पिनर आदिल रशीद याने १० षटकांत ३४ धावा मोजून सर्वाधिक ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः आयर्लंड ः ५० षटकांत ९ बाद २१२ (स्टर्लिंग १२, डेलानी ०, बालबर्नी १५, टेक्टर २८, ओब्रायन ३, टकर २१, कँफर ६८, सिंग २५, मॅकब्रायन २४, यंग नाबाद २, अवांतर १४, विली ४८-२, टॉपली ३१-१, अली २७-०, व्हिन्स १८-१, रशीद ३४-३, मेहमूद ४५-२) पराभूत वि. इंग्लंड ३२.३ षटकांत ६ बाद २१६ (रॉय ०, बॅअरस्टोव ८२, व्हिन्स १६, बँटन १५, बिलिंग्स नाबाद ४६, मॉर्गन ०, अली ०, विली नाबाद ४७, अवांतर १०, यंग ६८-१, लिटल् ६०-३, मॅकब्रायन ३३-०, कँफर ५०-२, सिंग ३-०)