राज्यातील कोरोनाचा फैलाव कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यात आता भर पडली आहे दिवसागणिक जाणार्या बळींची. मात्र, या चिंताजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मात्र पुरेसे गंभीर दिसत नाही हे खेदाने नमूद करावे लागते आहे. राज्य सरकारने केंद्राने घालून दिलेल्या एसओपींकडे बोटे दाखवीत रुग्ण तपासणीमध्ये जी शिथिलता आणली आहे, ती गोव्यासाठी फार महाग ठरताना दिसते आहे. आपल्याला केवळ कोरोनाची बाह्य लक्षणे असतील तरच तपासणीसाठी या असे सरळसरळ रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते आणि अगदी स्वतःहून वेळीच तपासणीसाठी पुढे आलेल्यांनाही परत पाठवले जाते आहे. कोविड केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना जरा लक्षणे कमी झाली की केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार तपासणी न करताच ‘बरे झाल्या’चे सांगून घरी पाठवले जाते आहे. इतके सारे असूनही ज्या स्वॅब तपासण्या राज्यात होत आहेत, त्यांचे प्रमाणच एवढे वाढले आहे की त्यांचा अहवाल यायलाही आठवडा लागतो आहे. सर्वांच्याच चाचण्या करायच्या झाल्या तर ते निव्वळ अशक्य आहे. म्हणजेच ज्या आरोग्यविषयक सज्जतेची बात सरकार आजवर करीत होते ती आहे कुठे? रुग्ण कितीही वाढले तरी तपासण्यांत कमतरता येणार नाही असे सरकार पूर्वी सांगत होते, परंतु प्रत्यक्षात जमिनीवरील सद्यस्थिती वेगळेच चित्र समोर ठेवते आहे.
ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर्स उभारणी, तेथे रुग्णांना दाखल करणे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणे हे सगळे झेपेनासे झाल्यावर केंद्र सरकारच्या एसओपीनुसार आता रुग्णांना घरातच राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, बाह्य लक्षणे दिसत नाहीत म्हणून घरातच राहणे सोईचे जरी असले तरी त्यातून नंतर लक्षणे दिसू लागली तर आरोग्याला घातक ठरू शकतात. आधी पॉझिटिव्ह येणे, नंतर निगेटिव्ह येणे किंवा आधी निगेटिव्ह येणे, नंतर पॉझिटिव्ह येणे असले विचित्र प्रकार तर सर्रास सुरू आहेत. त्यामुळे आम नागरिकांवर संकटाची टांगती तलवार कायम राहते आहे. चाचण्यांचे प्रमाण आणि एकूण राज्यात झालेला कोरोनाचा फैलाव यांचे गुणोत्तर मांडायला गेलो तर असे फार मोठ्या संख्येने लक्षणविरहित रुग्ण असतील ज्यांना स्वतःलाही कल्पना नाही की आपण कोरोनाबाधित आहोत. ते मुक्तपणे हिंडत फिरत आहेत. फैलाव करीत आहेत.
सरकार सांगते की घाबरण्याची गरज नाही, त्यामुळे लोक कोरोनाला आता घाबरेनासे झाले आहेत आणि मास्क न लावता बिनधास्त हिंडू फिरू लागले आहेत. परिणामी, कोरोना कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच चालला आहे. आरोग्य खात्याची आकडेवारी आता आरोग्य केंद्रनिहाय आकडेवारीची चलाखी करीत असल्याने कोणत्या गावी किती रुग्ण आहेत हेही कळेनासे झाले आहे. बरे झाल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात घरी पाठवले जाणारे रुग्ण खरोखरच बरे झाले आहेत याची खात्री कोणी द्यायची? त्यांच्यापासून संसर्ग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे गैरसोयीचे ठरणारे प्रश्न कोणाला नको आहेत. सगळे काही आलबेल आहे असे भासवण्याचा नितांत आटापिटा चाललेला दिसतो आणि तो गोव्याला कोरोनाच्या संकटात अधिकाधिक खोल खोल टाकत चालला आहे.
भाजपाचे कोरोनाग्रस्त आमदार कोविड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले असूनही कोविड इस्पितळाऐवजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असल्याचे आढळून आले आहे. ही अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट आहे. गोमेकॉतील अन्य रुग्णांच्या प्राणांशी सरकारने मांडलेला हा खेळ आहे. सामान्य जनतेला एक न्याय आणि या राजकारण्यांना दुसरा न्याय कसा काय?
सामान्य जनतेमधून दिवसागणिक तीन – चार बळी चालले असताना राज्यात देशाच्या इतर राज्यांपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी असल्याची शेखी मिरवणे बेफिकीर वृत्तीचे निदर्शक ठरते. दिवसागणिक माणसे किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत आणि ‘को-मॉर्बिड’ चा युक्तिवाद करून सरकार हात वर करते आहे. हे जे काही चालले आहे त्याबाबत जनता नाराज आहे, संतप्त आहे, परंतु ती बिचारी हतबल आहे. राज्यातील कोरोनाचे सारे व्यवस्थापन राजकारण्यांच्या तालावर आणि इच्छेनुसार चालले आहे. रुग्ण वाढत आहेत, लोक मृत्युच्या जबड्यात ढकलले जात आहेत याचे सोयरसुतक आहे की नाही? स्वतःच स्वतःच्या पाठी थोपटण्याच्या या खेळात स्वतःचीच फसवणूक करून घेतली जात असताना आम गोमंतकीय जनता मात्र संकटात सापडली आहे याचे विस्मरण होऊ नये!