दोन्ही जिल्हा इस्पितळांत अँटिजेन चाचणी सुरू

0
175

>> आरोग्य सचिव मोहनन यांची माहिती

>> मंडूरमध्ये कोविड इस्पितळासाठी प्रयत्न

आरोग्य खात्याने कोविड चाचणीसाठी अँटिजेन चाचणी मागील पाच दिवसांपासून सुरू केली आहे. सुरुवातीला दाभोळी विमानतळावर अँटिजेन टेस्ट केली जात होती. या टेस्टचे २० हजार कीट उपलब्ध झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये अँटिजेन चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. फोंडा आणि चिखली येथील उपजिल्हा इस्पितळांमध्ये अँटिजेन चाचणी सुरू केली जाणार आहे, असे आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी सांगितले.

कुंकळ्ळी आमदारांची
चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांचा कोविड चाचणी अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. आमदार डायस यांना कोरोनाची बाधा झाल्याने मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये महिनाभर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आमदार डायस यांना पुढील उपचारार्थ बांबोळी येथील जीएमसी इस्पितळात हालविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविड निगेटिव्ह झालेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह होऊ शकतो. त्यामुळे आयसीएमआरने कोविड रुग्णाला डिस्चार्ज करण्याच्या आपल्या एसओपीमध्ये बदल केला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली.

प्लाझ्मा थेरपी मशीनची
गोमेकॉत आज तपासणी
बांबोळी येथील जीएमसीमध्ये बसविण्यात आलेल्या प्लाझ्मा थेरपी मशीनची संबंधित यंत्रणेकडून तपासणी शनिवारी केली जाणार आहे. त्यानंतर प्लाझ्मा थेरपीबाबत मान्यता मिळणार आहे. बांबोळी येथे प्लाझ्मा थेरपीसाठी आत्तापर्यंत ३५ ते ४० जणांनी प्लाझ्मा दान केला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली.
कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या १९० जणांनी होम आयसोलेशनसाठी अर्ज केले आहेत. त्यातील २० अर्ज प्रलंबित आहेत. तर, २४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

तीन खाजगी कोविड केंद्र
राज्यात तीन खासगी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. तसेच राज्यातील आयसीयू सुविधा असलेल्या केवळ तीन इस्पितळांनी २० टक्के जागा कोविड व्यवस्थापनासाठी राखीव ठेवल्या आहेत असेही मोहनन यांनी सांगितले.

मंडूर येथे इस्पितळासाठी प्रयत्न
कोविड व्यवस्थापनाच्या सुविधांना अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. मंडूर येथे आयसीएमआरच्या सूचनेनुसार कोविड इस्पितळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात नाहीत, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

भोजन व्यवस्थेसाठी खास अधिकारी
राज्यातील कोविड केअर सेंटरमधील जेवण व इतर सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रुग्णांना जेवण देण्यासाठी स्थानिक पातळीवर जेवण पुरवठा करणार्‍या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड सेंटरमधील सुविधांसंबंधी काही तक्रार असल्यास चौकशी केली जाऊ शकते, असेही मोहनन यांनी सांगितले.

चाचणीसाठी स्वॅबचे नमुने दिल्यावर
संबंधितांनी होमक्वारंटाईन व्हावे
कोविड चाचणीसाठी स्वॅबचे नमुने देणार्‍या व्यक्तींनी नमुने घेतल्यानंतर अहवाल प्राप्त होईपर्यंत होमक्वारंटाईन राहिले पाहिजे, असे आरोग्य सचिव मोहनन यांनी स्पष्ट केले. स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल ७२ तासांपर्यंत दिला जातो. स्वॅबच्या वाढत्या संख्येमुळे अहवाल येण्यास थोडा विलंब होत आहे. ज्या लोकांना अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यांनी संबंधित आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधला पाहिजे, असेही मोहनन यांनी सांगितले.

प्लाझ्मा थेरपी मशीनची
आरोग्यमंत्र्यांकडून पहाणी
बांबोळी येथे जीएमसीमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्राची पाहणी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल केली. एम्सच्या सहकार्याने प्लाझ्मा थेरपी सुरू केली जाणार आहे. या मशीनमध्ये चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. कोविडनंतरसुद्धा या यंत्राचा वापर हॉस्पिटलसाठी केला जाणार आहे. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत प्रत्यक्ष प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची उपस्थिती होती.