आधुनिक भारताचा झुंजार नेता लोकमान्य टिळक

0
622
  •  सौ. निलांगी औ. शिंदे
    (धारगळ- पेडणे)

उसळत्या रक्तात मॉं ज्वालामुखीचा दाह दे,
वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे |

अशा प्रकारचे राष्ट्रभक्तीचे असीधाराव्रत ज्यांनी घेतले, भारताचे सर्वप्रथम पूर्णवेळ राजकारणी, ज्यांनी आपल्या निःस्वार्थ कार्य आणि असामान्य धैर्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतभूमीवर आपला ठसा उमटविला अशा प्राच्यविद्या पंडित, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधी अविश्रांत लढ्याचे सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सादर भावांजली!

लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीचा. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्‍वात याच रत्नागिरीने मराठी, संस्कृत आणि इंग्रजी शिक्षणाने मानाचे स्थान प्राप्त केले होते. समुद्राचा रांगडेपणा, सह्याद्रीचा कठीणपणा पण काटेरी फणसासारखा आतून मधाळ आणि कठोर नारळाच्या कवचाच्या आत मधुरता जपणारे असे टिळकांचे व्यक्तित्व. ज्यांनी आयुष्यात कायमचा खडतर संघर्ष, बळकट हाडे, तरतरीत बुद्धीच्या जोरावर आपल्या महत्त्वाकांक्षा चेतवल्या, त्या टिळकांनी युवामनामध्ये जहाल राष्ट्रवाद चेतवला. राष्ट्राच्या शत्रूपुढे कधीही झुकणार नाही हा स्वाभिमान लोकमान्यांनी तत्कालीन युवकांमध्ये जागविला आणि याच प्रेरणेतून पुढे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीने आपला परमोच्च बिंदू गाठला.
बीए. एल.एल.बी.पर्यंतचं डेक्कन कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करून आपले मित्र आगरकर यांच्यासह देशकार्याला वाहून घ्यायचा संकल्प केला. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकरांसोबत १८८० साली ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा स्वीकारला. या तिघांनी मिळून आर्यभूषण छापखाना काढला आणि त्याकाळची अग्रणी वृत्तपत्रे ‘केसरी’ व ‘मराठा’ सुरू केली. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार करणे हा त्यांचा मनोदय होता.

टिळकांच्या गुणवैशिष्ट्यांना धार चढली आणि त्यांना दुर्ज्ञेय व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले ते त्यांच्या असाधारण पत्रकारितेमुळे. त्यांच्या नेतृत्वाइतकीच त्यांची पत्रकारिता ज्वलंत होती. भारतीयांच्या नवचैतन्याचे निर्देशक ठरलेले असे ते अग्रणी संपादक होते. उघड, निर्भीड, बोचरी टीका करणार्‍या टिळकांचा विरोधकांना आणि नोकरशहा यांना धाक वाटायचा.

श्रेष्ठ पत्रकाराला आवश्यक असे अफाट वाचन, मुलाहिजा न ठेवण्याचा स्वभाव, स्वतंत्र वृत्ती आणि साहस या आणि लिहिण्या-बोलण्यातील परखडपणा यांनी भारतीय वृत्तपत्रजगतामध्ये त्यांना अजोड स्थान मिळवून दिले.

गणेशोत्सव आणि शिवजयंतीद्वारे मध्यम आणि निम्न वर्गीयांना संघटित करून त्यांच्या मनात राष्ट्राभिमान जागृत करण्याचे टिळकांनी ठरवले. त्याच काळात ब्रिटिश कापडावर बसविल्या जाणार्‍या जकातीची भरपाई करण्यासाठी भारतीय कापडावरील उत्पादन शुल्क सरकारने वाढविले. तेव्हा या नव्या कराविरुद्ध टिळकांनी टीकेची झोड उठवून आणि विदेशी कापडावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा वापर करावा, असे आवाहन लोकांना केले.
सार्वजनिक सभा आणि डेक्कन सभा या दोन संस्थांच्या माध्यमातून देशात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे कार्य टिळकांनी केले. आपल्या क्षुब्ध वक्तृत्वाने आणि धारदार लेखणीने राजद्रोही फूत्कार टिळकांनी काढले, ज्यामुळे आधुनिक भारताचा झुंजार नेता म्हणून टिळक उदयास आले. नोकरशहांच्या काळजात त्यांनी धडकी भरवली आणि लोकांची मने स्वचैतन्याच्या संजीवनीने भारून टाकली.

शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुकारलेल्या संघर्षात टिळक गुंतले असतानाच दुष्काळाच्या पाठोपाठ महाराष्ट्रात प्लेगची साथ पसरली आणि टिळकांना लोकांचे संरक्षण करण्यासाठी धावून जावे लागले. सरकारने, ब्रिटिश सोल्जरांनी अत्यंत निंद्य अशा पद्धतीने आरोग्याच्या प्रतिबंधक उपाययोजना योजिल्या. लोकांचा छळ वाढू लागला आणि जनतेमध्ये असंतोष पसरला. टिळकांनी लोकांचे हाल कमी करण्यासाठी अन्य पुढार्‍यांच्या मदतीने हिंदू लोकांना स्वखर्चाने उपचार घेता येतील असे एक हिंदू रुग्णालय सुरू केले. लोकांना विनामूल्य भोजनव्यवस्था केली. संकटग्रस्त लोकांच्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले. निःस्वार्थ भावनेने ते अविरत झटले. पुण्यात रँडने जो प्लेगच्या वेळी अनन्वित छळ चालवला त्याच्या परिणामस्वरूप चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला. त्यावेळी सरकारने पुन्हा जनतेवर जुलूम केला. टिळकांनी, ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांना अठरा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.

राजद्रोहाच्या शिक्षेनंतर टिळकांचे व्यक्तित्व तेजाने झळाळून उठले. ‘पुनश्च हरि ॐ’ या लेखातून लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीवर त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला. त्यांनी जनतेत प्रचंड चळवळ उभारून संपूर्ण राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे असे टिळकांचे मत होते.

टिळकांनी बंगालमध्ये कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीला विरोध केला. संपूर्ण देशात आणि बंगालमध्ये फाळणी विरोधात उभारलेल्या चळवळीला पाठिंबा दिला. या काळात स्वामी विवेकानंद, कविगुरू रवींद्रनाथ ठाकूर यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कार्यास पाठिंबा टिळकांनी दिला.

स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. पण याच मुद्यांवरून कॉंग्रेस अधिवेशनात फूट पडली. टिळकांना पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा व दंड ठोठावला. त्यांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथेच त्यांनी ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे लेखन केले.

मुक्ततेनंतर त्यांनी हिंदी स्वराजसंघ, होमरूल लीगची स्थापना केली. त्यानंतर कॉंग्रेस लीग संयुक्त अधिवेशनात स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. होमरूलच्या प्रसारासाठी आणि चिरोलविरुद्ध खटला लढण्यासाठी टिळक इंग्लंडला गेले.
टिळकांनी डेमॉक्रॅटिक स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा जाहीरनामा म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवजच होता. त्यामध्ये ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीने भारताचे स्थान, जागतिक शांततेची प्रस्थापना, व्यापारी फुटीपासून मुक्तता आदी मुद्दे विषद केले होते. त्यांनी दारूबंदी चळवळ सुरू केली, स्वदेशी चळवळ, स्वराज्याचा लढा लढविला. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत बंडखोरीचा झगा पेहेरलेले टिळक ब्रिटिश साम्राज्याला लाभलेली मूर्तिमंत दहशत होते. ते आशियाई राष्ट्रवादाची धगधगती मशाल होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’ हा मंत्र जागवणारे लोकमान्य जरी देहरूपाने आमच्यामध्ये नसले तरीही राष्ट्राभिमानी जनतेच्या अंतःकरणामध्ये त्यांची सावळी मुद्रा, विशाल मस्तक, भेदक तांबूस नेत्र, जाड भुवया, मोठ्या वाढलेल्या मिश्या, खांद्यावरील उपरणे, डोक्यावर लाल पगडी, पांढर्‍या शुभ्र धोतरातळी तांबडे पुणेरी जोडे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक म्हणून त्यांची प्रतिमा राहील व कृतज्ञतापूर्वक त्यांचे स्मरण केले जाईल.