डावखुरा असल्याचा पंतला फायदा

0
167

ऋषभ पंत डावखुरा फलंदाज असल्यामुळेच टीम इंडियात संजू सॅमसनपेक्षा ऋषभला अधिक संधी दिली जाते, असे मत सॅमसनचे प्रशिक्षक बिजू जॉर्ज यांनी व्यक्त केले आहे. विश्‍वचषक नजरेसमोर भारतीय संघाची बांधणी सुरू आहे.

एखाद्या संघात दर्जेदार डावखुरा फिरकीपटू, लेगस्पिनर किंवा डावखुरा जलदगती गोलंदाज असल्यास डाव्या हाताने फलंदाजी करणार्‍याला उजव्याच्या तुलनेच काहीशी मोकळीक मिळते. त्यामुळेच पंतला पसंती मिळत असावी, असे जॉर्ज म्हणाले. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध खेळाडू निवडताना पंत किंवा सॅमसन हे निवड समितीने ठरवायचे असते. निवड समिती जाणूनबुजून कोणालाही संघाबाहेर ठेवत नाही, असे वक्तव्यदेखील जॉर्ज यांनी करताना सॅमसनला मुद्दाम संघातून डावलले जात नसल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

‘क्रिकेटची पायरी तुम्ही चढत जाता तसतशी काठिण्य पातळी वाढत जाते. समस्यासुद्धा वाढत जातात. त्यामुळे खेळाडूंची निवड करणे सोपे नसते. संजूचा खेळ तुम्ही पाहिल्यास असे दिसून येते की त्याचा खेळ ‘टायमिंग’वर आहे. फटकेबाजीसाठी तो ओळखला जात नाही,’ असे जॉर्ज पुढे म्हणाले.

‘आयपीएलमध्ये तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच मागील वर्षीच्या आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ठोकलेले त्याचे शतक पाहिल्यास त्याला कव्हर्सवरून खेळण्यास आवडत असल्याचे तुम्हाला जाणवेल. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर मात्र त्याला कुणीतरी चेंडू वेगाने मारायची सूचना केली. त्यामुळे त्याला नैसर्गिक खेळ दाखवता आला नाही,’ असे जॉर्ज म्हणाले.

२०१९ हे वर्ष ऋषभ पंतला खराब गेले होते. खराब कामगिरीमुळे त्याच्यावर सातत्याने दबाव होता. फलंदाजीसह त्याच्या यष्टिरक्षणाचा दर्जादेखील खालावला होता. त्यावेळी बांगलादेशविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी संजू सॅमसनची टीम इंडियात निवड करण्यात आली. परंतु, दुर्देवाने त्याला एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नाही. यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी त्याला वगळण्यात आले. परंतु, शिखर धवनच्या दुखापतीमुळे सॅमसनला संघात निवडले. पण, संपूर्ण मालिकेत त्याला ‘अंतिम ११’मध्ये स्थान मिळाले नाही.

सॅमसन याचे वडील विश्‍वनाथ यांनी संजू (११ वर्षांचा असताना) व त्याचा मोठा भाऊ सॅली यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे तत्कालीन प्रशिक्षक बिजू जॉर्ज यांच्याकडे प्रशिक्षणासाठी घातले होते. सॅली याच्या अष्टपैलूत्वामुळे जॉर्ज प्रभावित झाले. पण संजूचे पदलालित्य, हातांचा व चेंडूचा सुरेख समन्वय त्यांना त्यावेळीच भावला होता. २५ वर्षीय संजू टीम इंडियाकडून केवळ ४ टी-ट्वेंटी सामने खेळला असून ८.७५च्या सरासरीने केवळ ३५ धावा त्याच्या नावावर आहेत.