दहावीचा निकाल ९२.६९ टक्के

0
153

>> यंदाही मुलींची बाजी, ११८ विद्यालयांचा निकाल १०० टक्के

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मे-जून २०२० मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. राज्यातील १८९३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १७५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२७ तर मुलांची ९२.०८ टक्के एवढी आहे. राज्यातील ११८ विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यात अनुदानित ८३ आणि सरकारी ३५ विद्यालयांचा समावेश आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

कोरोना महामारीमुळे दहावीची एप्रिलमधील नियोजित परीक्षा पुढे ढकलून २१ मे ते ६ जून या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा राज्यातील २९ केंद्रे आणि १७३ उपकेंद्रातून घेण्यात आली. तसेच सीमावर्ती भागात महाराष्ट्रात ४ आणि कर्नाटकात २ केंद्रातून परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला बसलेल्या ९३१९ मुलांपैकी ८५८१ मुलगे उत्तीर्ण झाले. तर ९६२० मुलींपैकी ८९७३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ७५ ते १०० टक्केवारीमध्ये २१.०८ टक्के, ६० ते ७४ टक्केवारीत ३३.५१ टक्के, ४५ ते ५९ टक्केवारीत ३५.७९ टक्के, ३३ ते ४४ टक्केवारीत ८.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली. यावेळी सचिव भगीरथ शेट्ये हेही उपस्थित होते.

मंगेशी केंद्राचा सर्वाधिक निकाल
मंगेशी केंद्राचा सर्वाधिक ९८.०६ टक्के आणि केपे केंद्राचा सर्वांत कमी ८६.८५ टक्के निकाल लागला आहे. नावेली या सर्वाधिक १५२२ विद्यार्थी संख्या असलेल्या केंद्राचा निकाल ९४.२८ टक्के आणि पैंगीण या सर्वांत कमी २३० विद्यार्थी संख्या असलेल्या केंद्राचा निकाल सर्वांत कमी ९६.९६ टक्के लागला आहे.

११८ विद्यालयांचा
१०० टक्के निकाल
राज्यातील ११८ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात अनुदानित ८३ आणि सरकारी ३५ विद्यालयांचा समावेश आहे. बार्देश तालुक्यात ८ अनुदानित आणि १ सरकारी, डिचोली तालुक्यातील ४ अनुदानित आणि ७ सरकारी, काणकोण तालुक्यातील १ अनुदानित आणि ३ सरकारी, धारबांदोडा तालुक्यातील ४ अनुदानित आणि १ सरकारी, केपे तालुक्यातील ४ सरकारी, मुरगाव तालुक्यातील ११ अनुदानित, पेडणे तालुक्यातील ११ अनुदानित आणि ५ सरकारी, फोंडा तालुक्यातील १४ अनुदानित आणि २ सरकारी, सासष्टीतील १७ अनुदानित, सांगेतील ४ सरकारी, सत्तरीतील १ अनुदानित आणि ६ सरकारी, तिसवाडीतील १२ अनुदानित आणि २ सरकारी विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. एनएसक्यूएफ विषय घेऊन बसलेल्या १९०६ विद्यार्थ्यापैकी १७०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

क्रीडा गुणांमुळे झाले
२७३ विद्यार्थी उत्तीर्ण
७०७३ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण प्राप्त झाले आहेत. २७३ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणामुळे उत्तीर्ण झाले आहेत. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १०१ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
ओपन स्कूलशी करार
गोवा बोर्डाची दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण करू न शकणारे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलशी (एनआयओएस) सामंजस्य करार करण्यात आला आहे. गोवा बोर्डातील नापास विद्यार्थी टान्स्फर ऑफ क्रेडिट योजनेखाली एनआयओएसच्या माध्यमातून दहावीच्या परीक्षेला बसू शकतात. २८ विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे, असे सामंत यांनी सांगितले.

गुण पडताळणीसाठी
८ ऑगस्टपर्यंत मुदत
विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ८ ऑगस्ट २०२० पर्यत ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवर अर्ज केला पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले.

उत्तरपत्रिकांचे विश्‍लेषण
विद्यालयांना पाठवणार
गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या उत्तरपत्रिकेचे सखोल विश्‍लेषण करण्यात आले असून ते सर्व विद्यालयांना पाठविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे नियोजन करण्याची सूचना केली जाणार आहे, अशी माहिती सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली.

पुरवणी परीक्षा ३ सप्टेंबरपासून
दहावीची पुरवणी परीक्षा ३ सप्टेंबर २०२० पासून घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. ही परीक्षा १२ तालुका केंद्रांतून घेतली जाणार आहे. दि. २१ मे ते ६ जून या काळात परीक्षेला बसू न शकलेले विद्यार्थी या पुरवणी परीक्षेला बसू शकतात, असे सामंत यांनी सांगितले.

चार शिक्षकांना वगळले
दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेतील एका वादग्रस्त प्रश्‍नप्रकरणी चार शिक्षकांना मंडळाच्या परीक्षेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत. या प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सामंत यांनी सांगितले.