जकार्ता पालेमबाग येथे २०१८ साली झालेल्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मिश्र रिले प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करत असल्याचे ट्विट भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने काल रविवारी केले. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, एम.आर पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. या स्पर्धेत बहारिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. परंतु, बहारिन संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने बहारिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्यपदकाचे रुपांतर आता सुवर्णपदकामध्ये करण्यात आले आहे.
‘काही दिवसांपूर्वीच मला आशिया चषक स्पर्धेचे ४ बाय ४०० मीटर मिक्ष रिले स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले होते. हे सुवर्णपदक मी ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे. कारण सध्या पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य ‘कोरोना वॉरियर्स’ हे मोलाचे काम करत आहेत. करोनाच्या काळात लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल, हे ‘कोरोना वॉरियर्स’ पाहत आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक मी ‘कोरोना वॉरियर्स’ना समर्पित करत आहे.’, असे हिमाने ट्विट केले आहे.