- मीना समुद्र
शब्दातलं ‘जंतर-मंतर’ लक्षात आलं की लेखनातलं ‘तंतर’ (तंत्र) लक्षात आलंच म्हणून समजावं. सध्याच्या ‘मरगळलेल्या’ काळात आठवणींचा ‘तिळा उघडल्या’वर असे वरवर निरर्थक वाटणारे ‘कळीचे’ शब्द भोवती गोळा होतात आणि मनात स्मरण-रंजनाचा खेळ रंगतो.
तिन्हीसांजेला काळोख दाटत आला तशी चिंटूची आई देवाजवळ सांजवात लावायला उठली. बाहेर अंगणात खेळणारे चिंटूचे सवंगडीही घरोघर पसार झाले तेव्हा आईची हाक ऐकून चिंटू धावत धावत घरात आला आणि मध्येच कशालातरी अडखळून जोरात आपटला. तेव्हा त्याने भोंगा पसरला. आई धावत धावत आली आणि त्याला काय झालं विचारू लागली; तेव्हा रडत रडत त्याने पाटाकडे बोट दाखवले. आईनं त्याला नीट बसतं केलं आणि ‘हातरे पाटा. का पाडलंस आमच्या चिंटूला? आता रहा उभा भिंतीशी’ असे म्हणून पाटाला एक टपली मारून त्याला शिक्षा केल्यासारखा भिंतीशी उभा करून ठेवला. एरव्ही चिंटू एवढ्याने लगेच गप्प झाला असता पण त्याचं भोकांड काही थांबेना. मग आईनं जास्त लागलंय का ते पाहिलं. त्याला खरचटलंसुद्धा नव्हतं, पण दुखत होतं. तेव्हा आईने त्याचा ‘बाऊ’ दूर घालविण्यासाठी एक मंत्र म्हटला, ‘आला सत्तर कोला मत्तर, कोल्ह्याची आई कांदे खाई, चिंटूचा बाऊ दूर घेऊन जाई छूः छूः छूः!’ आणि तिने त्याच्या पायावरून हात फिरवून तो ‘बाऊ’ हाताने दूर घालवून दिला तेव्हा चिंटूचे ते रडणे कुठल्या कुठे पळाले आणि तो हसून पाय धुवून परवचा म्हणायला आईच्या मांडीवर बसला.
असाच चिंटू एकदा जेवता जेवता काहीतरी तिखट लागलं म्हणून घाईघाईने पाणी प्याला, पण कसं? तर त्याच्या बाबांसारखं. भांड्याला तोंड न लावता ते वर धरून धार तोंडात सोडली आणि त्याला जोराचा ठसका लागला. तेव्हा जवळच बसलेली त्याची आजी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाली, ‘‘वर बघ वर. आढ्याला तुझी ’सासू टांगलीय.’ चिंटूला ‘आढं’ म्हणजे काय ते कळलं नाही तरी त्यानं वर पाहिलं आणि त्याचा अडकलेला थेंब घशात जाऊन त्याचा ठसका थांबला. ‘सासू टांगण्या’चा हा प्रकार लहानमोठ्या- अगदी कुणाच्याही बाबतीत घडे. कुणीतरी आढ्याला लोंबकळतंय (त्यातून सासू कजागपणाबद्दल, वस्तादगिरीबद्दल प्रसिद्ध) असं दृश्य एकदमच डोळ्यांसमोर उभं राहून मजा वाटे. ती सासू वर लोंबकळतीय, पाय हलवतीय, ‘कुणीतरी सोडवा’ म्हणून विनवणी करतय आणि बरी अद्दल घडली म्हणून सूनबाई पाहाताहेत असलं गमतीशीर चित्र डोळ्यांसमोर उभं राहिल्यावर ठसकाबिसका सगळं विरूनच जाणार ना!
आमच्या लहानपणी ज्वारीची भाकरी खाता खाता जर मध्येच कुणाला ज्वारीचा अख्खा दाणा आला तर ‘खंडा’ म्हणून ज्याला तो लाभला आहे तो जेवणाच्या मध्येच ओरडे. ही काय भानगड ते कळलं नाही. त्याचा उलगडाही कधी करून घेतला नाही. पण आज विचार करताना असं वाटतं की हा विशेष करून सगळ्यांचा लक्ष वेधण्याचा प्रकार असावा. ज्वारी दळून आणून केलेल्या भाकरीच्या पिठात एक अख्खा दाणा लपून राहावा आणि तो कुणाच्या तरी वाट्याला यावा, दाताखाली यावा याचीही त्या वयात अपूर्वाई वाटत असावी, आणि असं फार क्वचित होत असल्याने त्यात मजा वाटत असावी. पण ‘खंडा’ किंवा ‘खंड्या’ हा काय प्रकार? खंड म्हणजे तुकडा किंवा भाग, पण भाकरीत सापडलेला ज्वारीचा दाणा तर अख्खा असतो. आणि ‘खंडा’ म्हणजे ‘एक डाव होणे’- या अर्थाने तो आम्ही गजये (सागरगोटे) खेळताना वापरत असू.
हे सगळे स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचे किंवा दुसरीकडे लक्ष वेधण्याचे प्रकार आहेत, ज्यामुळे माणसाचे विशेषत्व (अगदी सूक्ष्म प्रमाणात) सिद्ध होते किंवा त्याचा त्रास, छोटी छोटी दुःखे यांपासून दूर नेण्याचा तो त्या क्षणीचा अगदी स्वाभाविक, सहजसोपा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यावेळची भाषा किंवा शब्दही सुचेल तसे ओठावर येतात. ते वापरले जातात. त्याचीच तर खूप गंमत वाटते. ‘आला मत्तर’मध्ये ‘मत्तर’ म्हणजे ‘मंत्र’ असावा. बाळाचा बाऊ दूर करणे हा हेतू तर स्पष्ट आहेच. पण कोला (की कोल्हा) म्हणजे काय असावे? कोल्ह्याची आई कांदे कशासाठी खाते? की ती कांदे खाते त्यामुळे बाळाच्या डोळ्यातले पाणी तिच्याकडे पळून जाते? आणि मग ‘बाऊ’ दूर न्यायला हा कोल्हाच कशाला? कोल्हा हा धूर्तपणासाठी प्रसिद्ध आहे. आणि काही बालकथांतून बालकांना झोपविण्यासाठी कोल्ह्याचा धाक घालतात हे वाचलेले. पण एकूण काय तर अशा या जादूच्या मंत्रामुळे बाळाचा बाऊ ‘छू मंतर’ होतो, निघून जातो, पळून जातो एवढे मात्र खरे!
काही शब्द तर त्याला आगा ना पीछा असे वाटतात. गजग्यांना ‘सागरगोटे’ का म्हणतात असा प्रश्न मला नेहमी पडतो. ते तर सागरातून मिळत नाहीत. झाडावर लागलेल्या, वरून काटेरी वाटणार्या फळाच्या आत लांबटगोल आकारातल्या दोन गुळगुळीत पिवळसर कप्प्यात हे गोटे एखाद्या बाळाने पाळण्यात झोपावे तसे (झोपलेले) असतात. गोटे म्हणजे गुळगुळीत गोलाकार असतात खरे, आणि वर किंचित टोक असलेले हे गोटे सागरावरील वाळूच्या रंगाचे किंचित राखाडी, पिवळसर असतात. सागराच्या लाटांनी खडकावर धडका देऊन आपटून हे गुळगुळीत गोटे बनवलेसे वाटतात म्हणून हे ‘सागरगोटे’ असावेत. घरात, खेळताना किंवा वर्गात शांतता किंवा गुप्तता पाळायची असेल तर ‘अळीमिळी गूप चिळी’ हा एक मंत्र होता. ‘आधी बोलेल तो काहीतरी घाण खाईल, नंतर बोलेल तो तूपसाखर खाईल’ अशी पुष्टीही त्याला जोडलेली. शेवटचा भाग ठीक आहे, पण मंत्राचा पहिला भाग कळत नाही. फक्त चूपचाप बसायचं एवढाच अर्थ गोषवार्यावरून निघायचा.
एखाद्या खेळात डाव कुणी घ्यायचा हे ठरविण्यासाठी किंवा दोन पार्ट्यातले भिडू निवडण्यासाठीही एक मंत्र होता. सगळ्यांनी गोलाकार उभं राहून एकानं प्रत्येकाला हात लावून म्हणण्याचा. त्याचा उत्तरार्ध ‘रेणमाख करवंजाळी अल्ली, जल्ली, फुल्ली’ असा होता. मात्र ‘फुल्ली’ येईल तो एक भिडू इकडे, दुसर्यावेळी दुसरा तिकडे अशी विभागणी होई. या शब्दांनीही अर्थाच्या बाबतीत गुंगाराच दिला आहे. लपंडावात ‘रामराई साई सूऽऽटयो’ असं स्वतःच्या हातांनी डोळे झाकून म्हणणारा मग लपलेल्यांना शोधायला जातो. हा त्याचा सुरुवातीचा मंत्र असे. ‘रामाच्या बागेत खेळ चाललेला आहे आणि ‘साई’ नावाचा मुलगा हात डोळ्यांवरून काढून लपलेल्यांना शोधायला ‘सूऽऽटयो’ म्हणजे सुटला आहे, असा अर्थ एका मैत्रिणीने काढला तेव्हा मात्र कपाळाला हात लावला.
खेळाच्या दोन टिम निवडण्यासाठी आणखी एका प्रकारे या ‘रामराई….चा’ उपयोग होई. गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात हातात धरून उंचावायचे आणि ‘सूऽऽटयो’ला खाली घेत टाळी वाजवायची. हातावर पालथा हात असलेल्यांची एक बाजू आणि उलथा असलेल्यांची दुसरी बाजू- असे विभागून मग उंदीर-मांजर, खो-खो असले खेळ खेळायचे. थोडक्यात ही ‘छाप की काटा’वाली नाणेफेकच म्हणा ना!
एखाद्या गोष्टीचा ‘चट्टामट्टा’ करणे म्हणजे खाऊन फस्त करणे, संपवणे. पण एकदा याचं यमक जुळेल असा ‘हिंगणमिट्टा’ हा शब्द कुठेतरी ऐकला. त्याचा संबंध मी आपला हिंग न् मिठाशी लावला. हाताच्या नखावर नखं घासली की केस काळे राहतात असं रामदेवबाबांनी सांगितल्याचं कुणी सांगितलं तेव्हा मला ‘घारी घारी कवडी दे, बगळ्या बगळ्या पाणी दे’ म्हणत आम्ही नखावर नख घासायचो त्याची आठवण झाली. नखावर कवडीच्या आकाराचा पांढरा डाग आला की काहीतरी लाभ होतो अशी समजूत. तर कुणी म्हणे ते तर ऍनिमियाचं लक्षण. खरं खोटं कोण जाणे.
पण बगळ्याकडे पाणी आणि घारीकडे कवडी का मागितली जात असावी? बगळा पाण्यात उभा राहतो म्हणून त्याच्याकडे पाणी मागणं कळू शकतं. एकूण काहीतरी स्वतःचा वेळ घालवणे आणि करमणूक करून घेणे हा उद्देश असावा. खेळताना कुणी ‘गजानन’ असं छान नाव असलेला मुलगा असला तरी ‘गजा रे गजा, तुझी काय मजा, कोंबडीच्या लग्नाला बेंड (बँड?) बाजा’ असं त्याला चिडवलं जाई. कोंबडीच्या लग्नाला आणि बेंडबाजा वाजवणारा गजा हे यमक जुळतं म्हणून ऐकायला गंमत वाटते. खेळातला ‘हु तू तू तू तू तू’ करणारा शब्द हाही प्रतिस्पर्ध्याला चिथवणारा आणि आपला दमसास टिकवणारा आणि वाढवणारा असावा बहुधा!
शब्दातलं ‘जंतर-मंतर’ लक्षात आलं की लेखनातलं ‘तंतर’ (तंत्र) लक्षात आलंच म्हणून समजावं. सध्याच्या ‘मरगळलेल्या’ काळात आठवणींचा ‘तिळा उघडल्या’वर असे वरवर निरर्थक वाटणारे ‘कळीचे’ शब्द भोवती गोळा होतात आणि मनात स्मरण-रंजनाचा खेळ रंगतो.