आमदारांच्या अपात्रता याचिकेवर आज सुनावणी

0
123

सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर शुक्रवार दि. २४ जुलैला सुनावणी होणार आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ७ ऑगस्टला सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, या अपात्रता याचिकेवर जलदगतीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याने लवकर सुनावणी घेण्यात येत आहे. या अपात्रता याचिकेमध्ये गोवा विधानसभा सभापतींना प्रतिवादी करण्यात आलेले आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींसमोर याचिका दाखल केलेली आहे. सदर याचिकेवर सुनावणी घेण्यास दिरंगाई केली जात असल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिकेच्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेच्या अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनीही मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील अपात्रता याचिकेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकीय पातळीवर विविध प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे.