>> निर्णायक तिसरा कसोटी सामना आजपासून
इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा व निर्णायक कसोटी सामना आजपासून मँचेस्टर येथे खेळविला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून विंडीजने आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने दुसरी कसोटी जिंकून आव्हान कायम राखले होते. आता तिसर्या सामन्याचा विजेता मालिका आपल्या खिशात घालणार आहे.
दुसरा कसोटी सामना झालेल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरच तिसरा सामना होणार आहे. दुसर्या कसोटीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना साथ दिली होती. परंतु, शेवटच्या दोन दिवसांत खेळपट्टीने आपला रंग बदलला होता. खेळपट्टी संथ झाली होती. त्यामुळे फलंदाजी करणे तुलनेने सोपे झाले होते. तिसर्या कसोटीतही हाच संथपणा दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघ निवडताना उभय संघांना खेळपट्टीचे बारकाईने निरीक्षण करावे लागणार आहे.
इंग्लंडने काल सामन्याच्या पूर्वसंध्येला १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये जेम्स अँडरसन, मार्क वूड व जोफ्रा आर्चर यांचे पुनरागमन झाले आहे. गोलंदाजांना आलटून पालटून संधी देण्याची इंग्लंडची योजना पाहता दुसर्या कसोटीत खेळलेल्या वोक्स व करन यांना चांगल्या कामगिरीनंतरही अँडरसन व आर्चर यांच्यासाठी जागा खाली करावी लागू शकते. फलंदाजी विभागात इंग्लंड संघात बदल संभवत नाही. खराब कामगिरीनंतरही जोस बटलर याच्यावर निवड समितीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
पाहुण्या वेस्ट इंडीजची मात्र डोकेदुखी वाढली आहे. निर्णायक सामना असल्यामुळे शेय होपसारख्या अनुभवी खेळाडूला खराब फॉर्मच्या कारणास्तव संघाबाहेर बसवून नवोदिताला संधी देण्याचा जुगार खेळावा की होपला अजून एक संधी द्यावी या द्विधा मनस्थितीत त्यांचा संघ आहे. सलामीवीर जॉन कॅम्पबेल हा अपयशी ठरला असला तरी जोशुआ दा सिल्वा या मधल्याफळीतील फलंदाजाला संघात जागा दिल्यास संघातील इतर सदस्यांपैकी एकाला क्रेग ब्रेथवेटसह सलामीला उतरावे लागणार आहे.
विंडीजच्या गोलंदाजीचा विचार केल्यास दुसर्या कसोटीत ऑफस्पिनर रॉस्टन चेज याने पाच बळी घेत प्रभाव पाडला होता. परंतु, धावा रोखण्यात तो कमी पडला. पहिल्या डावातील दोन बळींनंतर किमार रोचने दुसर्या डावात दोन बळी घेतले खरे परंतु, इंग्लंडच्या वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नामुळे त्याला हे बळी मिळाले. शेन्नन गॅब्रियल याला तर शेवटपर्यंत सूर गवसला नाही. अल्झारी जोसेफ याचा मारा देखील बोथटच होता. तंदुरुस्तीच्या कारणास्तव या दोघांना सामन्यादरम्यान अनेकवेळा मैदान सोडावे लागले होते. पहिल्या दोन कसोटींत मिळून रोच व गॅब्रियल यांनी गोलंदाजीचा सर्वांत जास्त भार उचलताना अनुक्रमे ८० व ६९.५ षटके गोलंदाजी केली आहे. एवढी षटके गोलंदाजी केलेली असताना दोघांपैकी किमान एकाला तरी विश्रांतीची आवश्यकता होती. परंतु, मालिका गमावण्याचा धोका असल्यामुळे या दोघांना खेळविणे क्रमप्राप्त आहे. अल्झारी जोसेफ याच्या जागी मात्र वेगवान गोलंदाज चेमार होल्डर याला संधी दिल्यास विंडीजला फायदा होऊ शकतो.
इंग्लंड संभाव्य ः रॉरी बर्न्स, डॉम सिबली, झॅक क्रॉवली, ज्यो रुट, बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड.
वेस्ट इंडीज संभाव्य ः क्रेग ब्रेथवेट, शेय होप, शमार ब्रूक्स, रॉस्टन चेज, जोशुआ दा सिल्वा, जर्मेन ब्लॅकवूड, शेन डावरिच, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किमार रोच व शेन्नन गॅब्रियल.