राज्यात नवे १४९ पॉझिटिव्ह रुग्ण

0
126

>> तिघांचा मृत्यू : बळींची संख्या झाली २९

>> वास्कोत सर्वाधिक २८ रुग्ण सापडले

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी तिघांचा कोरोनाने बळी घेतला असून बळींची संख्या २९ झाली आहे. नवीन १४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १६०७ झाली आहे. बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतपर्यंत ४१७६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून आत्तापर्यंत २५४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
३१ दिवसांत २९ जणांचा बळी
राज्यात मागील ३१ दिवसांत २९ जणांचा बळी गेला आहे. फातोर्डा येथील ५० वर्षीय रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार सुरू असताना काल सकाळी निधन झाले आहे. बोगदा वास्को येथील ५२ वर्षीय इसमाचा कोरोना विषाणूने जीएमसीमध्ये मृत्यू झाला आहे. मांगूर हिल येथे ७१ वर्षीय रुग्णाचे कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले.
पणजीत नवीन १४ रुग्ण
पणजी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात नवीन १४ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. चिंबल येथील रुग्णांची संख्या ७२ आहे.
साखळीत नवीन १३ रुग्ण
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या मतदारसंघात साखळी येथे नवीन १३ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ९२ झाली आहे. पेडणे येथे ५ रुग्ण आढळले. म्हापसा येथे १ रुग्ण आढळला.
मये येथे रुग्ण
मये येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. बेतकी येथे नवीन ६, कोलवाळ येथे ३, खोर्ली येथे २ रुग्ण आढळून आले आहेत.
वास्कोत २८ रुग्ण
वास्को येथे २८ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ३७४ झाली आहे. वास्को भागात आत्तापर्यंत पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कुठ्ठाळी येथे आत्तापर्यंत ३७७ रुग्ण आहेत. कासावली येथे आणखी १ रुग्ण आढळून आला आहे.
मडगावात १२ रुग्ण
मडगाव येथे नवीन १२ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ६७ झाली आहे. कुडचडे येथे १, काणकोण येथे १, बाळ्ळी येथे १ रुग्ण आढळून आला. नावेली येथे १ रुग्ण आढळला.
धारबांदोड्यात १७ रुग्ण
धारबांदोडा येथे १७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४६ झाली आहे. फोंडा येथे ४ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ५७ झाली आहे. मडकई येथे १ रुग्ण आढळला.
टोंक, करंजाळे येथे रुग्ण
टोक, करंजाळे येथे धेंपे भाटात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. हा परिसर पोलिसांनी सील केला आहे.

महापौरांच्या प्रभागामध्ये रुग्ण
महापौर उदय मडकईकर यांच्या प्रभागातील एका इमारतीमधील एक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सांतइनेज बांध येथे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. पणजी मासळी मार्केटमधील एका इमारतीमध्ये राहणारे आणखी नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.

आमदार डायस यांच्या प्रकृतीत सुधारणा
गेले काही दिवस मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणारे कुंकळ्ळी मतदारसंघाचे भाजप आमदार क्लाफासियो डायस यांची प्रकृती आता सुधारली असून त्यांना आता अतिदक्षता विभागातून बाहेर आणले आहे.