राज्य विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती राजेश पाटणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. येत्या २७ जुलैला होणार्या विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात समितीच्या सदस्यांनी संमती दिलेली विधेयके मांडून संमत केली जाणार आहेत. एक दिवसीय अधिवेशनात सर्वच विषयावर चर्चा होऊ शकत नाही, अशी माहिती सभापती पाटणेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
कामकाज सल्लागार समितीच्या (बीसीए) बैठकीत सर्व सदस्यांनी विविध विषय मांडले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विधेयके मांडली जाणार आहेत. चर्चा न करता विधेयके संमत करण्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. त्या शंकेचे निरसन करण्यात आले. सर्व सदस्यांची मान्यता असलेली बिले मान्य केली जाणार आहेत, असे सभापती पाटणेकर यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशनात खर्च कपात करण्यात येणार आहे. आमदारांना जेवण दिले जाणार नाही. केवळ अल्पोपहार दिला जाणार आहे. अधिवेशनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत, असेही ते म्हणाले.
अधिवेशनामध्ये कोविड, आर्थिक स्थिती आणि पर्यावरण यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.