‘एटीएम’बाबत माहिती देताय, तर सावधान!

0
199

>> फसवणुकीचे प्रकार : सायबर गुन्हा विभागाकडून सतर्कतेच्या सूचना

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने बँक एटीएम कार्ड धारकांच्या फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
बँकेच्या एटीएम कार्डधारकांना बँकेचे प्रतिनिधी, एजन्सीचे प्रतिनिधी असल्याशी बतावणी करून कार्डधारकांकडून पीन कोड घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास केली जात आहे.

अनोळखी व्यक्तीने दिलेल्या ..२१, ४०१ या सारख्या क्रमांकावर एटीएम कार्डधारकांनी कधीच फोन कॉल करू नये. एटीएम कार्डधारकाला बँकेकडून कॉल आल्यास बँकेशी संपर्क साधून योग्य पडताळणी करून घ्यावी, अशा सूचना सायबर गुन्हा पोलिसांनी केल्या आहेत.

बँक खात्यातून पैसे काढून खातेदाराला गंडा घालणार्‍या व्यक्तींकडून कॉल फॉरवर्ड या सुविधेचा गैरवापर केला जात आहे, असे सायबर गुन्हा विभागाने म्हटले आहे. फसवणूक करणारा व्यक्ती आपण बँक खातेदाराला ग्राहक केंद्रातील कर्मचारी किंवा प्रतिनिधी असल्याचे सांगतो. त्यानंतर खातेदाराला अमुक एका क्रमांकावर कॉल करण्याची सूचना केली जाते. खातेदाराने सदर क्रमांकावर कॉल केल्यानंतर कॉल गंडा घालणार्‍या व्यक्तीला फॉरवर्ड केला जातो. गंडा घालणारा व्यक्ती पासवर्ड लक्षात नसल्याचे सांगून नवीन ओटीपी देण्याची विनंती करतो. ़खातेधारकाचा फोन दुसरीकडे वळविण्यात आल्याने फसवणूक करणार्‍याला नवीन ओटीपी मिळतो. त्यानंतर खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढली जाते. फसवणूक करणार्‍यांकडून बँकिंग साइट, सोशल मिडिया अकाउंटचा पासवर्ड अशाच पद्धतीने मिळविला जातो, असेही सायबर गुन्हा विभागाने म्हटले आहे.