माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याला लिजंडस् ऑफ द चेस या १५०,००० यूएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ऑनलाइन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलर याच्याकडून १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला. मॅग्सन कार्लसन टूरचा भाग असलेल्या या स्पर्धेत खेळण्याची आनंद याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या फेरीतील पहिले तिन्ही सामने बरोबरीत सुटल्यानंतर चौथ्या सामन्यात आनंदला पराभव स्वीकारावा लागला.
आनंदने मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन नेशन्स कप स्पर्धेनंतर कोणत्याही स्पर्धेत सहभाग नोंदविला नव्हता. अनुभवी बोरिस गेलफंड हा पहिल्या फेरीचा स्टार ठरला. त्याने जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असलेल्या चीनच्या डिंग लिरेन याला ३-१ अशी धूळ चारली. वर्ल्ड नंबर १ मॅग्सन कार्लसन याने नेदरलँडस्च्या अनीश गिरी याला ३-१ असे पराजित केले. रशियाच्या इयान नेपोमनियाच्ची व हंगेरियाच्या पीटर लेको यांनी देखील विजयी सलामी दिली.
लिजंडस् ऑफ चेस ही अनोख्या पद्धतीची स्पर्धा आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने या स्पर्धेतील सामने खेळविण्यात येत आहेत. कार्लसन, लिरेन, नेपोमनियाच्ची व गिरी हे चेसेबल मास्टर्स स्पर्धेच्या (कार्लसन टूर स्पर्धेचा भाग) अंतिम चारमधील खेळाडू या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले असून सध्या ४० ते ५२ या वयोगटात असलेले व आपल्या कारकिर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बुद्धिबळाच्या क्षितिजावर चमकलेल्या खेळाडूंना निमंत्रणाद्वारे या स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे.
पहिल्या फेरीचा निकाल
इयान नेपोमनियाच्ची वि. वि. व्लादिमीर क्रामनिक (३-२), मॅग्सन कार्लसन वि. वि. अनीश गिरी (३-१), पीटर स्विडलर वि. वि. विश्वनाथन आनंद (२.५-१.५), बोरिस गेलफंड वि. वि. डिंग लिरेन (३-१), पीटर लेको वि. वि. वेस्ली इव्हानचूक (३-२)