>> वेस्ट इंडीजचा ११३ धावांनी पराभव
>> बेन स्टोक्सची अष्टपैलू चमक
बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यजमान इंग्लंडने दुसर्या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा ११३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठी इंग्लंडने ठेवलेल्या ३१२ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव ७०.१ षटकांत १९८ धावांत संपला. इंग्लंडकडून दुसर्या डावात ब्रॉडने सर्वाधिक ३ तर वोक्स, स्टोक्स व बेस यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना याच मैदानावर २४ जुलैपासून खेळविला जाणार आहे.
विंडीजची दुसर्या डावातही सुरुवाच चांगली झाली नाही. कॅम्पबेल, ब्रेथवेट, होप व चेज हे आघाडीचे चार गडी तंबूत परतले त्यावेळी फलकावर केवळ ३७ धावा लागल्या होत्या. जर्मेन ब्लॅकवूड (५५) व शामार ब्रूक्स (६२) यांनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. ब्रूक्सने आपल्या खेळीत ४ चौकार व २ षटकार ठोकले. तर ब्लॅकवूडने ७ चौकारांसह आपली खेळी सजवली. यष्टिरक्षक फलंदाज शेन डावरिच पहिल्या डावाप्रमाणे दुसर्या डावातही भोपळा फोडू शकला नाही. कर्णधार जेसन होल्डरने ३५ धावा करत पराभवाचे अंतर कमी केले.
तत्पूर्वी, चौथ्या दिवशी इंग्लंडने आपल्या दुसर्या डावाची सुरुवात करण्यासाठी बेन स्टोक्स व जोस बटलर या आक्रमक फलंदाजांना पाठवले. परंतु, त्यांची हा चाल यशस्वी झाली नाही. किमार रोच याचा बाहेर जाणारा चेंडू छेडण्याच्या नादात बटलरने चेंडू आपल्या यष्ट्यांवर ओढवून घेतला. पहिल्या डावात भोपळाही फोडू न शकलेल्या झॅक क्रॉवली याला तिसर्या स्थानावर बढती मिळाली. पण, याचा लाभ घेण्यात तो कमी पडला. रोचला ‘अक्रॉस द लाईन’ फटकावण्याच्या नादात त्याला आपली यष्टी गमवावी लागली. चौथ्या दिवसाच्या २ बाद ३७ धावांवरून काल पुढे खेळताना बेन स्टोक्स विंडीजच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने केवळ ५७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा कुटल्या. समन्वयाच्या अभावामुळे कर्णधार ज्यो रुट याला २२ धावांवर धावबाद व्हावे लागले. इंग्लंडने आपला दुसरा डाव ३ बाद १२९ धावांवर घोषित करत विंडीजसमोर ८५ षटकांत ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले.
इंग्लंडने आपला पहिला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला होता तर विंडीजचा पहिला डाव २८७ धावांत संपला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्व स्थानांवर फलंदाजी
करणारा बेन स्टोक्स पाचवा खेळाडू
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर ते ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा जगातील पाचवा खेळाडू ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्व स्थानांवर फलंदाजी केलेला चौथा खेळाडू जगाला मिळाल्यानंतर पाचवा खेळाडू मिळण्यासाठी तब्बल ४७ वर्षे वाट पहावी लागली. त्याने पहिल्या, तिसर्या, नवव्या, दहाव्या व अकराव्या क्रमांकावर प्रत्येकी एकदा फलंदाजी केली आहे. चौथ्या क्रमांकावर तीन, पाचव्यावर १९, सातव्यावर ६ व आठव्यावर २ वेळा त्याला फलंदाजीची संधी मिळाली आहे. सर्वाधिक ४४ वेळा त्याने सहाव्या स्थानावर फलंदाजी केली आहे. पाकिस्तानविरुद्ध शारजा येथे २०१५ साली खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने दहाव्या व ११व्या स्थानी फलंदाजी केली होती. २०१८ साली पल्लेकेले कसोटी श्रीलंकेविरुद्ध तो तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला होता. तर भारताविरुद्ध २०१४ साली लॉर्डस् कसोटीत त्याने नवव्या स्थानी फलंदाजी केली होती. स्टोक्सने आत्तापर्यंत ६५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच १५० पेक्षा अधिक बळी घेतले आहेत. स्टोक्सव्यतिरिक्त इंग्लंडच्या विल्फ्रेड र्होडस्, ऑस्ट्रेलियाच्या सिडनी ग्रॅगरी, भारताच्या विनू मंकड व पाकिस्तानच्या नसीम उल घनी यांनी असा कारनामा केला आहे.