॥ मनःशांती उपनिषदातून ॥ धर्मशाळा की अधर्मशाळा?

0
144
  • प्रा. रमेश सप्रे

‘पणजोबा राहिले नि गेले, नंतर आजोबा आले नि गेले, वडीलही राहिले नि गेले.. तूही आज आहेस पण काही काळानंतर जाशील. हो ना? मग ही धर्मशाळा नाही तर काय आहे? विचार कर, वेड्या, हे सारं जगच धर्मशाळा आहे. निदान तुझ्या घराची तरी अधर्मशाळा बनवू नकोस’. घरमालकानं त्यांचे पाय धरले.

आधुनिक काळातील अनेक विचारवंतांनी उपनिषदांचा किंवा उपनिषदांचं उपनिषद असलेल्या गीतेचा अभ्यास करा म्हणून सांगितलंय. विशेषतः युवावर्गाला. उपनिषदांवरील अनेक ग्रंथ सर्व भाषांतून, विशेषकरून इंग्लिशमध्ये प्रकाशित झाले आहेत, होत आहेत. पण वाचले पाहिजेत ना? वाचन- मनन- चिंतन या नंतरच्या, पण आजच्या काळात अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत.

गंमत म्हणजे माणसाच्या वृत्ती – प्रवृत्ती, मनोरचना व बुद्धीची कार्यपद्धती प्राचीन काळापासून आजपर्यंत फारशी बदललेली नाही. भौतिक जगात इतक्या सुधारणा, क्रांतिकारक परिवर्तन होऊनही, त्याचा मानवाच्या देहाशी निगडित जीवनशैलीवर लक्षात येईल एवढा परिणाम होऊनही मनाच्या किंवा बुद्धीच्या इच्छा, अभिलाषा, आकांक्षा जवळजवळ त्याच आणि तशाच राहिल्यायत. कठोपनिषदातील हा मंत्र पहा….

न सांपरायः प्रतिभाति बालं प्रमाद्यन्तं वित्तमोहेन मूढम् |
अयं लोको नास्ति पर इति मानी पुनः पुनः वशं आपद्यते मे ॥

अर्थ – (ऐहिक) संपत्तीच्या मोहानं मोहित होणार्‍या (वित्तमोहेन मूढम्), सदैव चुका, प्रमाद करणार्‍या अज्ञानी व्यक्तीला (प्रमाद्यंतम् बालम्) परलोक (सांपरायः) सुचत नाही, त्याचं स्मरणही राहात नाही (न प्रतिभाति). असा बालबुद्धीचा, अज्ञानी माणूस हा प्रत्यक्ष दिसणारा इहलोक (म्हणजे स्वतःचा देह, कुटुंब, आप्त मित्र, दृश्य संपत्ती, देहाचे उपभोग इ. इ.) खरा आहे (अयं लोकः) याच्याशिवाय परलोक, स्वर्ग- नरक इ. काहीही नाही (परः न अस्ति) असं मानणारा (नि त्याप्रमाणे जगणारा) अजाण पण अभिमानी मनुष्य (इति मानी) पुनःपुन्हा माझ्याकडे येतो. येत राहतो (पुनः पुनः मे वशं आपद्यते|)
असं नाही का वाटत की आजही आपल्यापैकी अनेकांचं वर्णन आहे. स्वर्ग- नरक, नरकवास- नरकयातना, यम- चित्रगुप्त हे सारं पुराणातलं आहे, सार्‍या भाकडकथा आहेत. त्या काळच्या अडाणी, निरक्षर, अंधश्रद्ध माणसांना फसवण्यासाठी हे सारं रचलेलं आहे. असं मानणार्‍यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणात आहे.

केवळ विचार म्हणून जर उपनिषदांकडे पाहिलं तर कोणत्याही स्वार्थी उद्देशानं ऋषीमुनींनी या गोष्टी सांगितलेल्या नाहीत. मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांना ध्यानसमाधीतून, अखंड चर्चा- चिंतनातून त्यांना गवसलेली ही जीवनरहस्यं आहेत. जीवनसूत्रं आहेत. या दृष्टीनं नि निरपेक्ष वृत्तीनं सांगितली गेल्यानं या चिंतनातून आपोआप वर आलेलं हे अनुभव- नवनीत आजही तितकंच, नव्हे त्यापेक्षाही जास्त उपयुक्त नि ग्राह्य आहे.

आजच्या जीवनातील वाढलेले ताणतणाव, त्यातून निर्माण झालेली अस्वस्थ मनःस्थिती नि यात भर म्हणून दिवसेंदिवस जनजीवनातील वाढती अनियमितता नि अनिश्चितता हे सारं वातावरण मन खचून जायला, खिन्न- उदास व्हायला, जीवनात वैफल्य भावना यायला अत्यंत पोषक आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण ‘उपनिषदातून मनःशांती’ यावर सहचिंतन करत आहोत.

कठोपनिषद हे सर्व उपनिषदांचं जीवनाच्या अंगानं काढलेलं सार समजायला हरकत नाही. प्रत्यक्ष यमराज मेधावी (बुद्धिमान) किशोर नचिकेताला मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून आनंदी जीवनाचं नि त्यानंतर येणार्‍या शांत मृत्यूचं रहस्य सांगताहेत.

आजची बाह्य परिस्थिती पूर्वी कधीही गेली नव्हती इतकी हाताबाहेर गेलेली आहे. स्वतःला खूप स्वच्छ, सुंदर, समर्थ नि सुखी समजणार्‍या राष्ट्रांना म्हणजेच तेथील नेत्यांना तसंच सामान्य जनतेलाही कोरोना नामक अदृश्य विषाणूनं अक्षरशः हैराण केलंय. दुर्दैवानं सध्याच्या जीवनशैलीची अतिरिक्त महत्त्व दिली गेलेली अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. कोरोनाचं थैमान आज ना उद्या लस सापडली, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपचारपद्धती (उदा. प्लाझमा ट्रीटमेंट) मिळाली तर कमी होईलच. पण खरी परीक्षा त्यानंतरच आहे.
यासाठी जीवनातील जास्त महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. याची जाणीव आपल्याला गेल्या काही दिवसात प्रकर्षानं झालीय. काही गोष्टी अशा…..

* कितीही काळजी घेतली तरी घडणार्‍या गोष्टी घडतातच. अनेक उच्चपदस्थ व्यक्ती, सेलेब्रिटी यांना झालेली कोविड-१९ या रोगाची बाधा हेच दाखवते. म्हणून घडणार्‍या कोणत्याही गोष्टीचा स्वीकार आपण कणखर मनानं व सकारात्मक वृत्तीनं केला पाहिजे.

* देह, देहाचे उपभोग यांच्याशी संबंधित विचारापेक्षा मन, बुद्धी या अंतरंगाचा, त्यांच्या आरोग्याचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे.

या संदर्भात एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. –
एका साधूला आपल्या तपःसामर्थ्यानं सिद्धी प्राप्त झाली आहे. त्याच्या दिव्य दृष्टीला अदृश्य शक्तीही दिसतात. एकदा शेजारील राज्यात घाईघाईनं जाणार्‍या मृत्युदेवतेला त्यानं विचारलं, ‘‘कोणत्या कामगिरीवर निघाले आहात आपण, यमराज?’’ यावर यमानं उत्तर दिलं, ‘‘या भागात एका दुर्धर व्याधीनं अनेकांना ग्रासलंय. त्यातील पाचशे लोकांचा मृत्यू जवळ आलाय. त्यांचे प्राण हरण करायला निघालोय’’. यावर साधूनं स्मित केलं नि तो गप्प बसला. त्यानं अंतर्ज्ञानानं सारी परिस्थिती जाणून घेतली. यमराज परत जाताना त्यानं विचारलं, ‘‘आपण तर पाचशे लोकांना नेणार होतात ना? मग हे पाच हजार जणांचे जीव कशाला नेताहात?’’ यावर हसून यम म्हणाला, ‘‘मी पाचशे जणांचाच जीव हरण केला ज्यांचा रोग बिकट अवस्थेला पोचला होता. पण बाकी साडेचारहजार लोक मृत्यूच्या भयानंच मेले, काय करणार? माझा नाइलाज झाला. त्यांचेही प्राण बरोबर आणावे लागले.’’ साधू म्हणाला, ‘‘बरोबर आहे. अनेकजण भयानं मृत्यूपूर्वीच मरतात. याचं कारण ते जीवनाचं खरं महत्त्व अन् मृत्यूचं खरं रहस्य जाणतच नाहीत. मनुष्यजीवनाचं खरं महत्त्वच समजत नाही. अशांना यमराज ‘बालबुद्धीचे’ म्हणजे एका अर्थानं मूढ, मूर्ख म्हणतोय.

परलोक, स्वर्गनरक, यम-चित्रगुप्त या गोष्टी मानल्या नाहीत तरी मानवी अस्तित्वाचं, बुद्धीचं महत्त्व तरी समजणं अवघड नाही. तसं पाहिलं तर पाताळ- पृथ्वी- स्वर्ग असे तीन लोक, पूर्वजन्म- पुनर्जन्म या कल्पना अनेकांना हास्यास्पद, अंधविश्‍वास असलेल्या वाटतात. तरी ज्या उद्देशानं काही शतकांपूर्वी तयार केलेल्या या कल्पनांना, शब्दचित्रांना, अमूर्त कल्पनांना समाजासमोर मांडणारे ऋषीमुनी, साधुसंत ही सामान्य बुद्धीची – माणसं नव्हती. प्रगल्भ प्रतिभेचं वरदान त्यांना लाभलं होतं – खरं तर त्यांनी तपश्चर्या, साधना करून ते वरदान प्राप्त करून घेतलं होतं.
दिसतं ते अन् इंद्रियांना पटेल अशा रीतीनं सिद्ध करता येईल तेच फक्त खरं असं मानणं हे स्वतःला फसवणं (आत्मवंचना) आहे. स्वतःशी द्रोह करणं ही (आत्मप्रतारणा) आहे. याचं यमाला आश्चर्य वाटलं नाही तरी वाईट वाटतं. परलोकाची कल्पना या लोकात, या जन्मात, या देहात चांगलं वागण्यासाठी आहे. पुनर्जन्म असेल वा नसेल पण त्यातून मुक्त होण्याची कल्पना मात्र प्रभावी आहे. यासाठी हा जन्म सुफलसंपूर्ण केला पाहिजे. तो कशानं होईल?
दोन विचारच पाहू या की –

* मृत्यूनंतर आपल्या हाडांवरही समाजाची मालकी (समाजऋण) आहे असं जो मानतो नि त्याप्रमाणे जगतो आणि मरतो, तोच खरा माणूस – असं तिरुवल्लुवर या तामीळ प्रतिभावंतानं आपल्या ‘कुरल’ ग्रंथात म्हटलंय.

* ‘वही मनुष्य है जो दूसरों के लिए मरें|’ या प्रसिद्ध वाक्याचा अर्थ – जो दुसर्‍यासाठी मरतो तोच खरा जगतो. स्वतःसाठी जगतो तो जिवंत असूनही मृतच असतो. आज सर्वत्र अशा जिवंतमृतांचा सुळसुळाट झालेला दिसतो.

* यमाला मृत्यूचं रहस्य सांगायचंय त्याचा एक अर्थ या जन्मातलं मरण हे शेवटचं मरण समजा, यासाठी इतरांसाठी जगा म्हणजे मुक्तच व्हाल तेही मृत्यूनंतर नव्हे तर जिवंतपणीच. म्हणजेच जीवनमुक्त व्हा!

* यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ‘मी फक्त देह आहे. सर्व इंद्रियातून मिळणारे भोग हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे’, असे विचार बदलले पाहिजेत. दृश्य गोष्टी, आकार धारण केलेल्या वस्तू सतत बदलत असतात याचा नित्य अनुभव सर्वांना येतो. उदाहरणार्थ-

* खाद्य पदार्थ डोळ्यासमोर शिळे होतात, नासतात, कुजूनही जातात.

* विकत घेतलेल्या प्रत्येक वस्तूच्या गॅरंटी किंवा वॉरंटीबद्दल आपण खूप जागरुक असतो. याचा अर्थ प्रत्येक वस्तू काळाच्या ओघात झिजत- बिघडत जाऊन एक दिवस मोडणार असते. देह, आकार, आकारमान (व्हॉल्यूम), वजन असलेल्या वस्तू मोडणार, संपणार असतात.

* ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’. (इंग्रजीतही ऑल् दॅट् ग्लिटर्स इज नॉट गोल्ड म्हणजे चकाकते ते सर्व सोने नसते.) हा अगदी व्यावहारिक अनुभव झाला. यापेक्षा खोल अनुभव म्हणजे ‘दिसतं ते नासतं’. नासतं म्हणजे ‘न असतं’. क्षणाक्षणाला दिसणारी वस्तू बदलत असते. उदाहरण दिलंय- गाभार्‍यात (गर्भकुडीत) किंवा देव्हार्‍यात संथ, मंद जळणार्‍या ज्योतीचं. तिला पाहून ती अनंत काळ तेवत राहील असं आपल्याला वाटतं. पण क्षणोक्षणी ती ज्योत संपत असते. तेल संपल्यावर ती शांत होणार असते.
म्हणून दृश्य गोष्टींबाबतची आपली अनावर आसक्ती, नको तितकं अवलंबन, त्या कायम टिकणार आहेत हा भ्रम या सार्‍यांचा त्याग केला पाहिजे.
जन्मापूर्वी आपण (आपला देह) नसतो, मृत्यूनंतरही आपण (आपला देह) नसतो. या दोन ‘नसण्यांच्या’ मधलं आपलं ‘असणं (म्हणजे जगणं)’ किती खरं असतं?
क्षणाक्षणानं विनाशाकडे, मृत्यूकडे सरकणार्‍या आपल्याभोवतीच्या सार्‍या भोग्य वस्तू, स्वतःचा देह नि त्याच्याशी भावबंधांनी जोडले गेलेले देह (व्यक्ती) काय न बदलणार्‍या, न मरण पावणार्‍या आहेत? सध्या मृत व्यक्तींची संख्या जगाच्या सर्व देशात नि भारताच्या प्रत्येक राज्यात स्फोटक रीतीनं वाढतेय. याचा विचार केलाच पाहिजे.

येत्या काही वर्षांत सर्व जगात हिंसा, गुन्हेगारी, अन्याय यांचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. आत्महत्या नि हत्या यांचं प्रमाण प्रमाणाबाहेर वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण संपूर्ण जगात काही कोटी लोक बेकार होणार आहेत. ही प्रक्रिया आत्ताच सुरू झालीय. येणारा काळ हा कितीही भीषण भयंकर असला तरी आपण शांत, प्रसन्न, आनंदी राहू शकतो.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यमाला हेच हवंय. ‘हे न समजल्यामुळे माणसं पुन्हा पुन्हा माझ्याकडे येत असतात.’ असं तो नचिकेताला स्पष्ट शब्दात सांगतो.

आपण खर्‍या महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्वच देत नाही. ज्या गोष्टी आपण जमवतो (पझेशन्स) नि ज्या गोष्टी- व्यक्तींबद्दल आपली स्वामित्वाची भावना असते (पझेसिव्हनेस) त्या किती क्षणभंगूर आहेत, कायम टिकणार्‍या नाहीत याची जिवंत जाणीव असल्याशिवाय अखंड आनंदात राहताच येणार नाही. इंद्रियांच्या पलीकडे अशा आनंदाचा उगम असतो. गंमत म्हणजे एखाद्या साध्या सामान्य बुद्धीच्या माणसाला ही गोष्ट पटू शकते. पण शिकलेल्या, चिकित्सक व्यक्तीला, समर्थ रामदास ज्यांना ‘पढतमूर्ख(वाइजफूल)’ म्हणतात त्यांना हे पटवून देणं अवघड आहे.

एक प्रसंग. सिद्धारूढ स्वामी एकदम पाऊस सुरू झाला म्हणून एका घराच्या आडोशाला थांबले होते. हे पाहून घरमालकानं त्यांना विचारलं, ‘ही काय धर्मशाळा आहे, कुणीही येऊन थांबायला?’ यावर शांतपणे सिद्धारूढ महाराजांनी विचारलं, ‘कुणी बांधले हे घर?’ घरमालक ‘माझ्या पणजोबांनी.’ ‘ते आता राहतात इथं?’ ‘नाही, ते केव्हाच गेले!’ ‘त्यांच्यानंतर कोण राहत होतं?’ ‘आजोबा’. ‘त्यांच्यानंतर वडील’ ‘आजोबा, वडील अजूनही राहतात?’ ‘नाही. तेही गेले’. ‘आता तू राहतोयस ना? अजून शंभर वर्षांनी तू या घरात असशील का?’ ‘ते कसं शक्य आहे?’ घरमालकाच्या या उत्तरावर हसत सिद्धारूढ महाराज म्हणाले, ‘पणजोबा राहिले नि गेले, नंतर आजोबा आले नि गेले, वडीलही राहिले नि गेले.. तूही आज आहेस पण काही काळानंतर जाशील. हो ना? मग ही धर्मशाळा नाही तर काय आहे? विचार कर, वेड्या, हे सारं जगच धर्मशाळा आहे. निदान तुझ्या घराची तरी अधर्मशाळा बनवू नकोस’. घरमालकानं त्यांचे पाय धरले.