राज्य सरकारने मुरगाव तालुक्यातील लॉकडाऊन शुक्रवार २४ जुलै २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय काल घेतला आहे. तर, राज्यातील इतर भागातील लॉकडाऊन सोमवारी सकाळी ६ वाजता संपणार आहे. दरम्यान, राज्यात १० ऑगस्टपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ यावेळेत संचारबंदी कायम राहणार आहे.
राज्य सरकारने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शुक्रवार १७ ते २० जुलै दरम्यान राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. या लॉकडाऊनला १६ जुलैला रात्री ८ वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील बाजारपेठ, खासगी आस्थापने बंद ठेवण्यात आली. केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने, टॅक्सी सेवा, औद्योगिक आस्थापने सुरू ठेवण्यात आली. राज्यभरात मागील तीन दिवस लॉकडाऊनला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यात लॉकडाऊन केलेले असले तरी कोरोना रुग्णांच्या प्रमाणात अजून घट झालेली नाही. राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याच्या अफवांना रविवारी मोठे पीक आले होते. लॉकडाऊन वाढणार असल्याचे संदेश समाज माध्यमावर फिरत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये लॉकडाऊन वाढण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. अखेर, सरकारने राज्यातील लॉकडाऊन वाढणार नसल्याचे जाहीर केल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.
मुरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव झालेला आहे. या तालुक्यातील १४ जणांचा आत्तापर्यंत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेला आहे.
जिल्हाधिकार्यांकडून आदेश जारी
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित राय यांनी मुरगाव तालुक्यातील वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत रविवारी आदेश जारी केला आहे. २० रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असून २४ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ते कायम राहणार आहे.
दामोदर सप्ताह रद्द
कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदाचा श्री दामोदर भजनी सप्ताह साजरा होऊ शकणार नाही, असे श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीतर्फे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे. फक्त आवश्यक धार्मिक विधी मंदिरामध्ये संपन्न होतील.
राज्यात नवे १७३ पॉझिटिव्ह रुग्ण
चिंबल येथील एकाचा मृत्यू : बळींची संख्या २२
राज्यातील आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या आता २२ झाली आहे. नवीन १७३ पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४१७ झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह १८० रुग्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
६७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू
चिंबल येथील ६७ वर्षीय रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले. या कोरोनाबाधित रुग्णाला अन्य आजार सुध्दा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येणे सुरूच आहे. कुठ्ठाळी येथे सर्वाधिक ३५५ रुग्ण आहेत. वास्को येथे नवीन २२ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या २९४ झाली आहे. कुडचडे येथे ६, कुडतरी येथे १, धारबांदोडा येथे ४, नावेली येथे नवीन ३ रुग्ण आढळले.
उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यातील कासारवर्णे येथे नवीन ९ रुग्ण, साखळी येथे २ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ५४ झाली आहे. पेडणे येथे १, म्हापसा येथे २, कोलवाळ येथे ४, चिंबल येथे १ रुग्ण आढळला असून रुग्ण संख्या ९४ झाली आहे. पर्वरी येथे २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २४ झाली आहे.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत ५०२८ नमुन्यांपैकी १९३४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३०९४ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात ३९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पेडण्यात एकाच दिवशी १५ रुग्ण
पेडणे तालुक्यात वारखंड येथील एकाच कुटुंबातील दहा व्यक्तींना व धारगळ येथील आयुष इस्पितळाचे बांधकाम करणार्या तीन कामगारांना मिळून दिवसभरात १५ कोरोना रुग्ण सापडले. पेडणे तालुक्यात आतापर्यंत ६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.त्यामुळे पेडण्यात दक्षता घेतली जात असून लोक चाचण्या करून घेण्यासाठी गर्दी करित आहेत.