पणजीत इमारतीचा भाग कोसळला

0
128

>> आझाद मैदानाजवळील घटना; तिघांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश

येथील आझाद मैदानाजवळील प्रकाश लॉज, प्रकाश कॅफे या इमारतीचा पुढील भाग पहाटे ३ च्या सुमारास कोसळला. इमारतीच्या कोसळलेल्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघा जणांना पणजी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रकाश लॉजच्या इमारतीचा पुढील भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटे तीनच्या सुमारास लॉजच्या इमारतीचा भाग कोसळल्याने तिघे जण इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकून पडल्याने खळबळ उडाली. येथील अग्निशमन दलास या घटनेची माहिती मिळताच दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अडकून पडलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. ढिगार्‍याखाली सापडल्याने त्या तिघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिघेही इमारतीच्या खाली झोपले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

घरे दुरूस्ती सक्तीची करणार : महापौर
पणजी महानगरपालिका क्षेत्रात काही धोकादायक इमारती, घरे आहेत. चार दिवसांपूर्वी येथील टपाल मुख्य कार्यालयाजवळील एक जुने घर कोसळण्याची घटना घडलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर जुन्या इमारती, घरे दुरुस्ती मालकांना सक्तीची करण्यावर विचारविनिमय करीत आहेत, अशी प्रतिक्रिया महापौर उदय मडकईकर यांनी व्यक्त केली आहे.