बुमराहचा सामना करणे सर्वांत कठीण

0
162

>> ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने केले कौतुक

भारताविरुद्ध केवळ एक कसोटी सामना खेळलेला ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने भारतीय वेगवान गोलंदाजीच्या फळीमधील जसप्रीत बुमराह याचा सामना करणे सर्वांत कठीण असल्याचे काल रविवारी सांगितले. भारतीय गोलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहून डिसेंबरमध्ये होणार्‍या मालिकेत खोर्‍याने धावा जमवण्याचा विश्‍वासही त्याने व्यक्त केला आहे.

लाबुशेन याने २०१८-१९ साली भारताविरुद्धच्या मालिकेत सिडनी येथे झालेला एकमेव सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटची स्वप्नवत सुरूवात केल्यानंतर ही घोडदौड अशीच कायम राखण्याचा दबाव भारताच्या संभाव्य ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याच्यावर असेल. भारताचे सर्व गोलंदाज चांगले आहेत. परंतु, बुमराहला खेळणे आव्हानात्मक असेल, असे २६ वर्षीय लाबुशेनने सांगितले. सातत्याने ताशी १४० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. वातावरण पुरक असेल तर चेंडू स्विंगदेखील तो करतो. तसेच चेंडू झपकन आत आणून फलंदाजांना अडचणीत आणण्याची त्याची क्षमता जगजाहीर आहे, असे लाबुशेन याने बुमराहचे कौतुक करताना सांगितले. ‘सर्वांत चांगल्या गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानेच प्रेरणा मिळते. जसप्रीत हा भारतीय गोलंदाजी फळीचा नायक आहे, असे १४ कसोटींत ६३च्या सरासरीने ४ शतके व ७ अर्धशतकांसह धावा केलेल्या लाबुशेन याने पुढे बोलताना सांगितले. मागील दोन वर्षांत इशांत शर्माच्या गोलंदाजीत झालेल्या कमालीच्या सुधारणेने लाबुशेन प्रभावित झाला आहे.

स्वतःच्या फलंदाजी फॉर्मविषयी बोलताना लाबुशेन म्हणाला की, तुम्ही चांगले खेळ लागल्यावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरता. आजी, माजी, इतर देशांचे खेळाडूदेखील तुमचे कौतुक करतात. कौतुक करताना प्रतिस्पर्धी संघ तुमच्या खेळातील उणिवा, कच्चे दुवे यांचा अभ्यास करू लागतात. तुम्हाला बाद कसे करावे हे शोधून काढतात. त्यामुळे प्रशंसेने हुरळून न जाता कामगिरीत सातत्य राखून खेळ करण्याचा माझा प्रयत्न असेल.

लाबुशेन याने माजी कर्णधार स्टीव स्मिथकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाबाबत जाहीर आभारही मानले. लाबुशेन याने आपल्या इतर संघ सहकार्‍यांप्रमाणेच आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली. वनडे क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधींत मी ५०.८३च्या सरासरीने व ९४.४२च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे वेगाने धावा करण्यास माझी शैली अनुरुप आहे. भारतीय वातावरणात खेळण्याचा अनुभवदेखील असल्याने संधी दिल्यास मी त्याचा फायदा उठवेन, असे लाबुशेन शेवटी म्हणाला.