भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णा याने ‘चेस९६०’ या स्वित्झर्लंडमधील ५३व्या बाईल चेस महोत्सवाचा भाग असलेली स्पर्धा काल ७ पैकी ५.५ गुण मिळवत जिंकली. हरिकृष्णा (इलो (२६९०) याने अपराजित कामगिरी केली. पोलंडच्या राडोस्लाव वोताझेक याचा अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या नोए स्टुडर याच्याकडून झालेला पराभव हरिकृष्णाच्या पथ्यावर पडला. जर्मनीचा १५ वर्षीय व्हिनेसेंट केयमार याने ५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. ४.५ गुण घेतलेल्या वोताझेक याला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
हरिकृष्णा याने स्पर्धेची सुरुवात इंग्लंडच्या मायकल ऍडम्स याला बरोबरीत रोखून केली. यानंतर त्याने आलेक्झांडर डोनचेंको व नोएल स्टुडर यांना अनुक्रमे दुसर्या व तिसर्या फेरीत पराभूत केले. ३४ वर्षीय हरिकृष्णा याला यानंतर केयमार व वोताझेक यांच्याविरुद्ध चौथ्या व पाचव्या फेरीत गुण विभागून घ्यावे लागले. शेवटच्या दोन फेरीत हरिकृष्णाने रोमेन एदुआर्द व स्पेनच्या डेव्हिन आंतोन गुईजाको या स्पर्धेतील अव्वल मानांकित खेळाडूला धूळ चारली.
संयुक्त अरब अमिरातीचा खेळाडू जीएम सालेम सालेह या प्रवासावरील निर्बंधामुळे येऊ न शकल्याने त्याची जागा जीएम आर्कादी नाईदिश याने घेतली. स्पर्धेचा रॅपिड प्रकार कालपासून सुरू झाला असून सोमवारच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून क्लासिकल प्रकार होईल.