विकास दुबेचा खात्मा गुन्हेगारी जगताला संदेश

0
156
– दत्ता भि. नाईक
गुन्हेगारीवर आळा घालायचा असेल तर त्यांना समजेल अशाच भाषेत सांगावे लागेल असे समाजमनाला वाटते. काहीही असो, पण गुन्हेगारी जगताकडे वळणार्‍यांना विकास दुबेच्या निमित्ताने हा चांगलाच धडा आहे असेच म्हणावे लागेल.
दि. १० जुलै रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर शहराजवळ सचेंडी रोड या स्थानावर पहाटे साडेसहा वाजता पोलिसांच्या गोळीबारात कुख्यात गुंडांच्या टोळीचा नायक विकास दुबे ठार झाल्यामुळे देशभर या घटनेबद्दल उलट-सुलट चर्चेला ऊत आला आहे. यापूर्वी ६ डिसेंबर २०१९ रोजी महिला पशुवैद्यक डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून टाकणार्‍या चार संशयितांचा हैदराबादजवळ बेंगळुरू-हैदराबाद मार्गावर एन्काऊन्टर केला होता. त्यावेळेसही अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले होते. अशा प्रसंगाला चूक की बरोबर असा प्रश्‍न विचारला तर उत्तर म्हणून कुणीही बरोबर हा पर्याय देणार नाही; तरीही काही घटना अशा असतात की वळणावळणांच्या मार्गाने समस्येला उत्तर शोधण्यापेक्षा एक घाव दोन तुकडे या न्यायाकडेच समाजमनाचा कल असतो.
आठ पोलिसांची हत्या
सुमारे साठहून अधिक गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांना हवा असलेला हा विकास दुबे. बहुजन समाजवादी पार्टीतील नेत्यांमध्येही त्याचे आश्रयदाते आहेत. याशिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये त्याची माणसे नसतील असे छातीठोकपणे सांगता येत नाही. तरीही त्याने २००१ मध्ये संतोष शुक्ला या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची हत्या केली होती, हे लक्षात ठेवावे लागेल.
कानपूरच्या जवळ असलेले बिकरू हे विकास दुबेचे गाव. गुरुवार दि. २ जुलै रोजी मध्यरात्री त्याला पकडण्यासाठी म्हणून त्याच्या गावात गेलेल्या पोलीस पथकावर दुबेच्या गुंडांनी गोळीबार केला त्यावेळी जिल्हा अधीक्षक धरून आठ पोलिसांचा त्यांच्याकडून खात्मा केला गेला. याशिवाय दोन उपनिरीक्षक, तीन कॉन्स्टेबल, एक होमगार्ड व एक नागरिक असे सात जण याप्रसंगी जखमी झाले. पोलिसांना ही नामुष्कीची जशी गोष्ट होती तशीच ती सूडाच्या भावनेने पेटवणारीही होती. घराच्या छप्परावरून गोळीबार करून मरण पावलेल्या व जखमी झालेल्या सात जणांची शस्त्रे घेऊन ते सर्वजण तिथून पसार झाले. पोलिसांनी संपूर्ण गाव बंदिस्त करून शोधमोहीम राबवली व विवाडा या शेजारील गावावर छापा टाकून प्रेम प्रकाश आणि अतुल दुबे यांना गोळीने टिपले व पळवून नेलेली काही शस्त्रेही त्यांच्याकडून हस्तगत केली.
जादेपूर-घरसा येथील राहुल तिवारी यांनी चौबेपूर पोलीस स्थानकावर त्याच्या जिवाला विकास दुबे याच्यापासून धोका असल्याची तक्रार केली होती व म्हणून त्याच्याविरुद्ध अटकवॉरंट घेऊन पोलीस आले होते. राहुल तिवारी याच्या मालकीच्या जमिनीवर विकास दुबेने जबरदस्तीने कब्जा केल्यामुळे हा प्रश्‍न उद्भवला होता. दुबेच्या सहकार्‍यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे उभारून पोलिसांची त्यांच्यापर्यंत येण्याची गती कमी केली होती. विशेष पथकाचे महानिरीक्षक अमिताभ यश यांच्या म्हणण्याप्रमाणे विकास दुबे याच्याकडून यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या रायफलचा वापर यावेळी करण्यात आलेला आहे. २०१७ साली त्याला अटक केली असता कृष्णानगर येथे त्याच्याकडून जप्त केलेले शस्त्र त्याच्यापर्यंत कसे पोहोचले हा एक मोठा चौकशीचा विषय आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही रायफल एका अधिकार्‍याच्या ताब्यात देण्यात आली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताबडतोब कानपूरला भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. विरोधी पक्षांनी सरकारला कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर धारेवर धरणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे प्रसारमाध्यमांनीही विषय कमी प्रमाणात का होईना, उचलून धरला.
थरारक एन्काऊन्टर
उत्तर प्रदेश पोलिसांचा विचार केल्यास हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता. शोधमोहीम राबवणार्‍या पोलीस खात्याने त्यांचा मार्ग रोखण्यासाठी ज्या जे.सी.बी. यंत्राचा वापर केला होता त्याच्याच साहाय्याने त्याचे घर पाडून भुईसपाट केले. पोलिसांची शंभर पथके सुसाट सुटली व चौबेपूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय तिवारी याला फितुरीच्या संशयावरून निलंबित करण्यात आले. काही संशयितांना ताब्यात घेतले व विकास दुबे नेपाळमध्ये पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे लखीमपूर-खीरी जिल्ह्यातील पोलिसांना सावध करण्यात आले.
उत्तर प्रदेशची सीमा ओलांडून तो मध्य प्रदेशात घुसला. स्वतःला धर्माच्या नावावर संरक्षण मिळावे व श्रद्धाळू हिंदूंची सहानुभूती प्राप्त व्हावी म्हणून तो उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेला. तिथे त्याने स्वतःची ओळख लपवली नाही. स्वतःच्या नावाने मंदिरात पावती फाडली. पोलिसांनी तो मंदिरातून बाहेर आल्याबरोबर त्याला पकडले. मी मध्य प्रदेश सरकारच्या पोलिसांचा कैदी आहे असे म्हणून अटक प्रकरणाला कलाटणी देण्याचा त्याचा प्रयत्न होता. आतापर्यंतच्या शिरस्त्याप्रमाणे स्थानिक न्यायालयासमोर गुन्हेगाराला उपस्थित करून मग परराज्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात येते. परंतु मध्य प्रदेशच्या स्थानिक पोलीस अधिकार्‍यांनी चोवीस तासांच्या आत त्याचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिल्यामुळे हा प्रश्‍न उपस्थित झाला नाही.
खरी थरारक व नाट्यपूर्ण घटना पुढे घडलेली आहे. दि. ९ जुलै रोजी संध्या. ८.४५ वाजता चौदा पोलीस ज्यात विविध पदांवरचे अधिकारी होते. त्यांच्या पाच वाहनांपैकी एकात ताब्यात घेतलेला गुंड विकास दुबे होता. या तीन वाहनांच्या पाठोपाठ विविध प्रसारमाध्यमे व वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी असलेली वाहने कानपूरच्या दिशेने निघाली होती. दि. १० जुलै रोजी ३.१५ वा. झाशीमधील रक्सा टोल नाक्यावरून पोलिसांच्या वाहनांचा ताफा उत्तर प्रदेश राज्यात प्रवेश करतो. त्यानंतर सव्वासहा वाजता कानपूरजवळील बराजोड टोल नाक्यावर पोलिसांची वाहने सोडून सर्व वाहने पुढे जातात.
 कानपूर शहराजवळ सचेंडी मार्गावर मध्ये अचानक म्हशींचा तांडा आल्यामुळे पोलिसांचे एक वाहन ज्यात दुबे होता ते कलंडते. ही संधी साधून दुबे कॉन्स्टेबलकडील शस्त्र हिसकावून घेतो व गोळीबार करतो ज्यात पाच पोलीस जखमी होतात. उत्तरादाखल पोलिसांनी झाडलेल्या चार गोळ्यांमुळे तो गंभीर जखमी होतो. सव्वासात वाजता नागपूर शहरातील एल. एल. आर. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तो मृत असल्याचे घोषित करण्यात येते. प्रसारमाध्यमांच्या गाड्या मागे राहिल्यामुळे एकूण घटनाक्रमाचे साक्षीदार पोलीस सोडून कुणीही नाही.
अनेक प्रश्‍न उभे
ज्या पद्धतीने दुबेचे एन्काऊंटर करण्यात आले त्याकडे पाहता अनेक प्रश्‍न उभे राहतात. कोणत्याही गुन्हेगाराला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना बेडी घालून ती वाहनाला अडकवली जाते किंवा दोन्ही हाताना बेडी घातली जाते, ज्यामुळे गुन्हेगार पळून जाऊ शकत नाही. हा तर अतिशय महत्त्वाचा असा भयानक गुंड, त्याला एखाद्या प्रवाशासारखा ऐसपैस का म्हणून बसवण्यात आले होते? प्रसारमाध्यमांच्या वाहनांशी असलेला संबंध तुटताच पंधरा मिनिटांनी ही घटना घडली. थोडा वेळ गेला असता तर ती सर्व वाहने गती वाढवून घटनास्थळापर्यंत पोहोचली असती.
आता गुन्हेगारच मरण पावल्यामुळे त्याची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत याचा शोध घेता येणार नाही. त्याच्या हातून मारल्या गेलेल्या जितेंद्र पाल सिंह या पोलिसाच्या वडिलांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी विशेष चौकशीसाठी त्याला जिवंत ठेवणे आवश्यक होते. सोळा फ्लॅट्‌स व अकरा घरे अशी भलीमोठी माया या गुन्हेगाराने जमवली होती. याशिवाय बेकायदेशीरपणे हडपलेल्या कितीतरी जमिनी त्याच्या ताब्यात आहेत.
अशा घटनेनंतर उठवला जाणारा गदारोळ या खेपेस उठवला गेला नाही तरीही जनमत पोलिसांच्या बाजूने आहे. त्याच्या नावावर इतके सारे खटले चालू असताना त्याला जामीन मिळतो. २०१७ साली न्यायालयाच्या आदेशावरून त्याला सोडावे लागले. त्यामुळे त्याच्या कारवायांत खंड पडला नाही. ज्यांना न्यायालयाचे काहीही पडलेले नाही त्यांना न्यायालयासमोर उभे केल्यामुळे पोलिसांचे हसे होते असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार सत्तेवर आल्यापासून १२२ एन्काऊंटर झाल्याचे वृत्त आहे. गुन्हेगारीवर आळा घालायचा असेल तर त्यांना समजेल अशाच भाषेत सांगावे लागेल असे समाजमनाला वाटते. विरप्पनला पोलिसांनीच संपवले व त्यानंतर कर्नाटक पोलीस बंदुका वर करून नाचले. त्याला पकडले असते तर त्याच्यावरील खटले अजूनही चालू राहिले असते. काहीही असो, पण गुन्हेगारी जगताकडे वळणार्‍यांना हा चांगलाच धडा आहे असेच म्हणावे लागेल.