– डॉ. सोमनाथ कोमरपंत
माणसानेही आपल्या संस्कृतीच्या अथक प्रवासात नदीवर कवने रचली आहेत. कधी दीर्घ पल्ल्याची तर कधी छोटी. छोटी आणि मोठी हा भेद नगण्य. ती उत्कट किती, उतट भावनांची किती हे महत्त्वाचे.
नदी ही जीवनदायिनी असल्यामुळे माणसावर तिने अनंत उपकार करून ठेवले आहेत. हे परस्पर नाते आई आणि मूल यांच्यातील नात्यासारखे असते. आई आपल्या मुलाबाळांसाठी सर्वकाही करते. निरपेक्ष भावनेने करते. आईप्रमाणेच नदी आपल्या काठावरील माणसांकडून उपकाराची परतफेड व्हावी अशी अपेक्षा कधी बाळगत नाही. तिचा खळाळता जीवनप्रवाह हा आपल्या लेकरांसाठीच असतो.
‘जीवनप्रवाह’ या संज्ञेत श्लेष आहे. जीवन म्हणजे पाणी. पाणी हे प्राणिमात्रांचे जीवन. मनुष्य, पशुपक्षी पाण्यासाठी आसुसलेले असतात. पाण्यावाचून तडफडतात. पशुपक्ष्यांना आपली तीव्र तडफड बोलून दाखविता येत नाही. माणूस नदीविषयीचे स्पंदन शब्दांद्वारे व्यक्त करू शकतो. आजवर त्याने ते केलेले आहे. जीवनप्रवाह या संज्ञेचा दुसरा अर्थ निरंतर वाहणार्या नदीच्या जीवनाचा प्रवाह. म्हणजेच तिच्या समर्पणशील जीवितध्येयाचा प्रवाह. मघाशी पशुपक्ष्यांना आपल्या भावना बोलून दाखविता येत नाहीत हे म्हटले खरे, पण ते पूर्णतः खरे नव्हे. नदीच्या दोन्ही काठांवर- वळणावाकणांवर विविध प्रकारच्या वृक्ष-वेली, वनस्पती असतात. त्या झाडांचा, वेलींचा आणि वनस्पतींचा आश्रय घेऊन अनेक प्रकारचे, रंगविभ्रमांचे पक्षी आपले भक्ष्य शोधतात. फळा-फुलांचा मनसोक्त आस्वाद घेतात. त्यांचे त्यामुळे पोषण होते. नदीपात्रातील थरथरत्या जलस्पंदनांत ते आपले रूपसौंदर्य न्याहाळतात. पहाटे पहाटे त्यांचे वृक्षांवर कूजन चालते. हे त्यांचे नदीविषयीचे, वृक्ष-वेलींविषयीचे स्तुतिगान नव्हे का?
माणसानेही आपल्या संस्कृतीच्या अथक प्रवासात नदीवर कवने रचली आहेत. कधी दीर्घ पल्ल्याची तर कधी छोटी. छोटी आणि मोठी हा भेद नगण्य. ती उत्कट किती, उतट भावनांची किती हे महत्त्वाचे. समग्रतेने याचा शोध घेणे कठीण; पण जे जे संस्मरणीय ते तरी काही अल्प प्रमाणात टिपता येते. कारण नदीचा प्रवाह अनादिकालापासूनचा आहे. आजमितीला तो अथकपणे चाललेला आहे. गद्यापेक्षा तो कवितेत मिताक्षरांतून उत्कटतेने मांडता येतो. रमणीयतेने सांगता येतो. भावपूर्ण उद्गार क्षणोक्षणी नोंदविता येतो. अर्थपूर्ण आशय सुलभतेने मांडता येतो.
नदी म्हटली की भारतीय मनाला गंगा, यमुना (आणि आज अस्तित्वात नसलेली सरस्वती) या नद्या आठवतात. त्रिवेणी संगम आठवतो. दोन डोळ्यांतून होणार्या अश्रुपातालादेखील गंगा-यमुनाची उपमा दिली जाते. शालेय वयात अभ्यासलेले सुभाषित आठवते ः
गङ्गा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा|
पापं तापं च दैन्यं च हन्ति सन्तो महाशयाः॥
गंगा पाप नाहीसे करते, चंद्र उष्मा नाहीसा करतो, त्याप्रमाणे कल्पवृक्ष हा गरिबी नाहीशी करतो; थोर मनाची माणसे पाप, ताप आणि दैन्य ही तिन्ही नाहीशी करतात. गंगा ही पापविनाश करणारी. पण ती कशी हे नक्की सांगता येणार नाही. पण हृषिकेशकडचा तिचा शांत प्रवाह, हरिद्वारजवळचा खळाळता प्रवाह आणि बनारसचा विशाल, नीलांग प्रवाह पाहिला की डोळ्यांचे पारणे फिटते.
प्रयागजवळचा गंगा-यमुना संगम असाच अवर्णनीय! प्रथम स्मरण होते ते ‘रसगंगाधर’मध्ये ‘रमणीयार्थप्रतिपादकः शब्दः काव्यम्|’ असे म्हणणार्या जगन्नाथाचे. त्याने ‘गंगालहरी’ किंवा ‘पीयूषलहरी’, ‘अमृतलहरी’, ‘करुणालहरी’, ‘लक्ष्मीलहरी’ आणि ‘सुधालहरी’ या पाच लहरी लिहिल्या. गंगेच्या घाटावर बसून त्याने गंगेवरील ‘गंगालहरी’ हे प्रसाद आणि माधुर्य या काव्यगुणांनी मंडित असलेले काव्य लिहिले. त्याच्याविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.
कालिदासासारख्या प्रतिभावंत कवीने ‘ऋतुसंहार’ काव्यात वर्षाऋतूचे वर्णन करीत वेग-प्रवेगाने समुद्राकडे धावणार्या प्रमत्त नदीप्रवाहाचे वर्णन करताना म्हटले आहे ः
निपातयन्त्यः परितस्तद्रुमा-
न्प्रवृद्धवेगैः सलिलैर निर्मलैः|
स्त्रियः सुदुष्टा इव जातविभ्रमाः
प्रयान्ति नदस्त्वरितं पयोनिधिम्॥
कालिदासाच्या ‘मेघदूता’मध्येही सिंधू, क्षिप्रा, सरस्वती व गंगा या नद्यांचे उल्लेख त्या-त्या भावसंदर्भात आले आहेत. त्यामुळे त्या वर्णनाला उठाव आला आहे.
प्राचीन अभिजात संस्कृत वाङ्मयाकडून आधुनिक मराठी साहित्याचे विहंगमावलोकन केले असता कोणते चित्र दिसते?
कविवर्य भा. रा. तांबे यांच्या ‘क्षिप्रा-चमळासंगम’ या कवितेत दोहींच्या संगमतीर्थाचे वर्णन येते. कवी उद्गारतो ः
प्रेमाचें भरतें अनावर! बघा ही आमुची दुर्गती!
आहाहा! किति रम्य संगम! गमे श्री-शारदा भेटती,
किंवा या भगिनीच गीति-कविता आसक्त आलिंगनीं-
सांगूं याहुनि काय? भिन्न कुलिं गे पावोनिया संभवा
तूं मी ज्यापरि भेटलों मिसळलों, गे एक झालों सखे.
कवी दत्त यांनी बडोद्याजवळच्या विश्वामित्री या नदीच्या काठचे अप्रतिम वर्णन ‘विश्वामित्रीच्या कांठी’ या कवितेत केले आहे ः
सृष्टिसुंदरी नटली थटली,
सूक्ष्म धवल वल्कला नेसली;
खुलली जणुं सुमवेली फुलली;
रम्य ही शोभा-
हिजपुढे काय ती रंभा?
शान्त तटिनि जणुं पथ स्फटिकाचा
जातिपुष्पपथ वनदेवीचा
किंवा ओघ सजिव रजताचा
कीं रत्नाची-
मेखलाच उद्यानाची!
चंद्रशेखर उत्तरायुष्यात बडोद्याला राहिले. ते तेथील राजकवी होते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण नाशिक परिसरात झाली. याच ठिकाणी त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा झाली. त्यांची कविता जरी पंडिती वळणाची असली तरी त्यांच्या मनातील उत्कट तरंग ‘गोदागौरव’ या त्यांच्या दीर्घ स्वरूपाच्या कवितेत उमटले आहेत ः
येथ शिवानें जटा फटाफट आपटुनी तुज वाहविली,
गोवधपापें अनुपाताकुल गौतमतनु अवगाहविली,
धन्य महात्मा! आपण तरला, तारियलें जग निरंतरीं.
जय् संजीवनि जननि पयोदे श्रीगोदे! भवताल हरी.
‘गोदाकाठचा संधिकाल’ या कुसुमाग्रजांच्या कवितेत केवळ गोदावरीच्या काठचे निसर्गवर्णन नाही. कविमनातील संवेदनाप्रवाहाचे चित्र तितक्याच उत्कटतेने या कवितेत व्यक्त झाले आहे. त्यांच्या ‘वाटेवरच्या सावल्या’ या संस्मरणात्मक पुस्तकातील ‘नदी’ या लेखात त्यांनी गोदावरीविषयीचा कृतज्ञताभाव ओघवत्या शैलीत व्यक्त केला आहे. ते नितांत मधुर गद्यकाव्यच वाटते.
कवी यशवंतांनी चाफळ खोर्यातील मांड नदीविषयीची आत्मीयतेची भावना ‘मांडवी’ आणि ‘मांडवीच्या पुनर्भेटीत’ या कवितांमधून व्यक्त केली आहे. समर्थ रामदासांच्या काळात तिला ‘मांडवी’ असे संबोधले जाई. यशवंतांनी हाच संदर्भ मनात बाळगून ‘मांडवी’ असाच या नदीचा उल्लेख केला आहे.
‘मांडवी’ या कवितेत कवी उद्गारतो ः
आनंदाचे या वनभुवनी
स्वधर्ममंदिर भव्य उभवुनी
प्राण वेंचिले ज्यांनी ज्यांनी
अंतकाळच्या आशा त्यांच्या ठाऊक तुजला क्लेश
‘मांडवीच्या पुनर्भेटीत’ या कवितेत कवीने अशी आकांक्षा व्यक्त केली आहे ः
आणि माते मिळो गर्भवासी उशी
क्रांतिकारी नव्या ह्या पिढीची कुशी
आणि तव कामनापूर्तिच्या उत्सवी
रांगण्याचे मिळो भाग्य मज मांडवी
‘कृष्णा-कोयनांचा संगम’ या कवितेत माधवानुजांनी (काशीनाथ हरी मोडक) या दोन नद्यांमधील एकत्वाचे सुरेख वर्णन केले आहे. बा. भ. बोरकर यांनी ‘निर्जन नदि शांत शांत’ या कवितेत निसर्गाच्या भावछटा व्यक्त करता करता मनातील अनुरागाच्या छटा तींत मिसळल्या आहेत ः ‘‘निर्जन नदी शांत शांत आहे… आसमंत अति निवान्त आहे… अस्ताचलाचा सूर्य ‘पुष्पपरागकान्त’ आहे… गगनात दाट दही फुटलेले आहे… हरित काठ विस्मयाच्या डोळ्यांनी पाहत आहे. मी मात्र मुकाट आहे… तूही मुकाट आहेस… काळ या क्षणी स्तब्ध झाला आहे.’’