कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर गोवा विद्यापीठाने येत्या ३ ऑगस्टपासून बीए, बीएससी, बीकॉम व इतर पदवी कार्यक्रमासाठी अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या संबंधीचे परिपत्रक गोवा विद्यापीठाचे निबंधक प्रा. वाय. व्ही. रेड्डी यांनी जारी केले आहे. युजीसीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी अंतिम सत्रातील परीक्षा घेतली जात आहे. सर्व महाविद्यालयांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजता प्रश्नपत्रिका गुगल क्लासरूम, मूडल, ईमेल, वॉट्सअप इत्यादींद्वारे पाठविली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी २ तासांचा अवधी दिला जाणार आहे. लिहिलेली उत्तरपत्रिका स्कॅन किंवा फोटो घेऊन दुपारी २ वाजेपर्यंत अपलोड केली पाहिजे. अपलोड केलेली उत्तरपत्रिका आपल्या रेकॉर्डसाठी ठेवावी असे परिपत्रकात म्हटले आहे.
नववी ते बारावीपर्यंतचा
अभ्यासक्रम कमी करणार
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नववी ते बारावीपर्यंतचा ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय काल घेतला आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाला आरंभ न झाल्याने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववी ते बारावीच्या अभ्यासक्रम ३० टक्के कमी करण्याचा प्रस्ताव मंडळाने तयार केला. मंडळाची खास बैठक या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. राज्यातील शैक्षणिक वर्षातील वर्ग ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालयीन अभ्यासक्रमांसाठी
आजपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
उच्च शिक्षण संचालनालयाने सरकारी तसेच सरकारी अनुदानित महाविद्यालयांत बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी., बीसीए, बीबीए, कायदा, संगीत, गृहविज्ञान, कृषी, बीएस.सी. बी.एड, बीए.बी.एड व अन्य अभ्यासक्रमांसाठी आज १५ जुलैपासून ऑनलाइन प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
अव्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणार्यांसाठी संचालनालयाने एक नावीन्यपूर्ण असे एक सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याच्या आधारे एका समान पोर्टलवरून सर्व जणांना ऑनलाईन ऍडमिशन करता येणार आहे. वरीलपैकी कुठल्याही एका शाखेत प्रवेश मिळवायचा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांला http://https://www.dhe.goa.gov.in/ वरून १५ जुलै २०२० पासून ऑनलाइन अर्ज करता येईल.