धर्मामुळेच अध्यक्षपदावरून हटवले

0
125

>> हॉकी इंडियाच्या मोहम्मद मुश्ताक अहमद यांचा क्रीडा मंत्रालयावर आरोप

केवळ अल्पसंख्याक असल्यामुळेच हॉकी इंडिया अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडल्याचा आरोप मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी क्रीडा मंत्रालयावर काल मंगळवारी केला. सुधांशू मित्तल (अध्यक्ष, खो खो असोसिएशन), राजीव मेहता (अध्यक्ष, तलवारबाजी) व आनंदेश्‍वर पांडे (सरचिटणीस, हँडबॉल) यांच्यावर मात्र क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची खंत अहमद यांनी व्यक्त केली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू असताना क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेवरून अहमद यांना ‘राष्ट्रीय क्रीडा संहिता २०११’ याचा भंग केल्याप्रकरणी पद सोडावे लागले होेते.

ऑक्टोबर २०१८ मध्ये मुश्ताक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. सध्या ते सलग तिसर्‍यांदा हॉकी इंडियाचे अध्यक्षपद भूषवत होते. त्यांनी सक्तीचा असलेला चार वर्षांचा ‘कुलिंग ऑफ पिरियड’ घेतला नसल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे. मुश्ताक अहमद हे २०१०-२०१४ या कालावधीत हॉकी इंडियाचे खजिनदार होते. २०१४ ते २०१८ या कालावधीत ते सरचिटणीस झाले. २०१८ ते २०२२ ही सलग तिसर्‍या कार्यकाळात कार्यकारिणीत असल्यामुळे त्यांनी क्रीडा संहितेचा भंग केला आहे, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. क्रीडा संहितेनुसार सरचिटणीस किंवा खजिनदार यांनी चार वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर चार वर्षांचा ‘कूलिंग ऑफ पिरियड’ अनिवार्य आहे. क्रीडा मंत्रालयाने ६ जुलै रोजी हॉकी इंडियाला पत्र लिहिले असून २०१८-२०२२ या कालावधीसाठी ३० सप्टेंबरपूर्वी अध्यक्ष निवडण्याचा आदेश दिला आहे. अहमद यांनी २०१८ साली अध्यक्षपद स्वीकारले त्यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणतीही हरकत नोंदविली नव्हती. अध्यक्ष म्हणून १५ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर क्रीडा मंत्रालयाला अचानक जाग येऊन त्यांनी अहमद यांना तडकाफडकी हटवणे हॉकीप्रेमींनी रुचलेले नाही.

क्रीडा मंत्रालयाकडून माझ्या शंकाचे योग्य निरसन झाले नाही तर मी पंतप्रधान कार्यालयापासून न्यायालयापर्यंत सर्वांकडे दाद मागेन असे अहमद यांनी क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले आहे. ७ जुलै रोजी अहमद यांनी हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. क्रीडा मंत्रालयाने हॉकी इंडियाला अहमद यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई झाली. त्यामुळे क्रीडा मंत्रालय मुश्ताक अहमद यांच्या पत्रावर काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.