काय आहेस तू माझा…

0
163

– निशा पोकळे

काय आहेस तू माझा
तू माझे विचार, की अबोल काव्य आहे
माझा श्रृंगार, की नुसताच आरसा आहे
अंतरी मनीचे भाव माझ्या, की आहे सुंदर कल्पना
माझा तू स्नेह आहे, की क्षणिक सुखाचं आकर्षण
की मी म्हणू तू माझे सुंदर जीवन आहे

काय आहेस तू माझा
तू माझी प्रभात आहे, संध्याही तूच माझी
रात्री स्वप्न ही तुझीच मला, प्रत्येक श्‍वासात तुला स्मरते
तूच माझा सखा, अथांग विश्‍वास पण तुझ्यावर
जडतो जीव वेड्या तुझ्यावर, कळले माझेच न मला आजवर
की मी म्हणू तू माझं सुंदर जीवन आहे

काय आहेस तू माझा
मानला तर दिव्यत्वाचा प्रकाश आहे
जाणला तर देवरुपी मानव आहे
पाहिला तर तार्‍यांतुनी ध्रुवतारा आहे
इंद्र जणू तू रंग सारे, डोईवर शोभे मुकुट मणी जसा
माझी प्रेरणाही तूच, तू जसा कल्पतरू माझा,
तसे बंधनही माझं तूच
काय म्हणू मी वेड्या तुला
की मी म्हणू माझं सुंदर जीवन आहे

काय आहेस तू माझा
मागणे माझे पूर्ण हो, मा शांताई तुझ्यावर प्रसन्न हो
पूर्ण हो तुझी कामना, अभिमान आहे तू माझा जन्मांधांत्याचा
नात्यांचे भाव ना कळे कुणा, ना करो स्तुती कुणी कुणाची
जीवन वास्तव आहे वेड्या,
अवघड नक्कीच नाही
आहेस तू राजा तुझ्या विश्‍वाचा,
माझा मात्र वाटसरू नक्की आहे
हेच मी पुन्हा पुन्हा म्हणेन
की तू माझं सुंदर जीवन आहे