- अनुराधा गानू
(आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)
अशा हजारो लोकांना हजारो सवयी असतील. पण या सवयी मुद्दाम कोणी लावून घेत नाहीत. त्या आपोआपच लागतात. पण एकदा लागल्या की त्या सवयीचे गुलाम आपण कधी होऊन जातो हे आपल्याला कळतच नाही, हो ना!
एकदा मी आणि मैत्रीण बसस्टॉपवर उभ्या होतो. आमच्या शेजारी एक माणूस उभा होता. तो दर थोड्या थोड्या वेळाने इकडे-तिकडे बघायचा आणि डोळे मिचकवायचा. आम्हाला वाटलं, तो आमच्याकडेच बघून असं करतोय. आम्ही म्हणत होतो, ‘आपल्या पांढर्या केसांकडे बघून आपल्या वयाचा काही अंदाज येत नाहीये का याला? हा काय मूर्खपणा. आमच्याकडे बघून डोळे काय मिचकावतोय?’ आमच्याइकडच्या बसेस ठरावीक वेळीच असल्यामुळे आम्ही तिथे बराच वेळ उभ्या होतो. थोड्या वेळाने आमच्या लक्षात आलं की तो फक्त आमच्याकडेच बघून डोळे असे करत नव्हता तर मध्ये मध्ये सगळ्या बाजूंना मान वळवून तो तेच करत होता. म्हणजे डोळे मिचकावणे ही त्याची सवयच होती तर!
प्रत्येक माणसाला काही ना काही सवय ही असतेच. काही सवयी वाईट असतात तर काही चांगल्या. ते प्रत्येकानं आपलं आपलं ठरवावं. आपण जर कधी पोस्टात, बँकेत, बस स्टॉपवर गेलात आणि तिथे जास्त वेळ थांबावे लागले तर अनेक वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या सवयी आपल्याला बघायला मिळतील. वेळ लागतोय म्हणून सवयीप्रमाणे शिव्या देत थांबू नका. चांगला टाइमपास होतो. हे मला कसं कळलं… विचारताय का? हे मी स्वतः बघितलंय ना. एकदा पोस्टात गेले होते. १०-१२ माणसं माझ्याआधी उभी होती. त्यामुळे मला भरपूर वेळ होता. मी आपली सगळ्या माणसांचं निरीक्षण करत बाकावर बसले होते. माझ्या पलीकडच्या बाकावर आणखी कोणी बसले होते. त्यातला एक जण बसल्या बसल्या सतत दोन्ही पाय हलवत होता. कारण पाय हलवण्याची त्याची सवयच होती. त्याच्या पलीकडे एकजण होता, त्याची बोटं सतत तोंडाजवळ. परत परत तो आपली नखं दाताखाली दाबत होता. समोर एक मुलगी उभी होती. केसांचा छोटासा झुपका बांधलेली. ती आपली थोड्या थोड्या वेळाने केसांचा झुपका पुढे आणायची. त्यावर हळुवारपणे हात फिरवायची आणि मग मानेला झटका देऊन परत मागे टाकायची. असं ती कितीतरीवेळा करायची. बहुधा ही तिची सवयच असावी.
एकदा सिनेमा बघायला गेलो होतो. माझ्या पुढच्या रांगेत बसलेला एक माणूस सारखा डोक्यावरून हात फिरवत होता. केस नव्हतेच. पण तो आपला सारखा टकलावरून हात फिरवायचा. एकदा कोणाकडे बसायला गेलो होतो. त्यांच्या घरातले गृहस्थ बोलता बोलता सारखं शेजारी बसलेल्या माणसाच्या मांडीवर थापट मारायचे. ‘कसं’ असं म्हणायचे आणि थापड मारायचे. शेजारच्या माणसाचा काही विचारच नाही. मग तो शेजारचा माणूस सरकत सरकत .. जरा जाऊन येतो.. म्हणून उठलाच तिथून. काही माणसांना दर २-३ वाक्यांनंतर ‘द्या टाळी’ म्हणून हात पुढे करायची सवय असते. काही माणसांना दर दोन वाक्यांनंतर ‘तर अशी गंमत’ म्हणायची सवय असते. समोरच्या माणसाला कळतच नाही की याच्या बोलण्यात ‘गंमत’ काय होती. काहीच गम्मत नाहीयेय. पण त्याला ‘तर अशी गंमत’ म्हणायची सवयच होती.
एकदा बँकेत पैसे काढायला गेले होते. बँकेत पैसे भरायला वेळ लागत नाही पण पैसे काढायचे असले म्हणजे थांबावे लागते. मला पैसे काढायचे होते म्हणून थांबणं भागच होतं. सोफ्यावर जागा दिसली म्हणून टोकन घेऊन सोफ्यावर जाऊन बसले… सवयीप्रमाणे निरीक्षण करत. काही माणसं उभी होती. त्यातला एक माणूस सारखा एक पाऊल पुढच्या बाजूनं आपटत ‘टप टप’ असा आवाज करत उभा होता. दुसरा एक जण सारखा नाकाशी हात न्यायचा, नाकपुड्या दाबायचा आणि परत हात खाली. चाळाच त्याचा तो. काही माणसं एका जागी स्वस्थ बसूच शकत नाहीत. परत परत उठतात, दोन फेर्या मारतात, परत बसतात. परत उठतात… पुन्हा तेच. असं करणं त्यांचं चालूच असतं. यावरून आठवलं, ‘‘पूर्वी आमच्याकडे माझे दोन मामा शिकायला होते. एक एम्एस्सी करत होता आणि दुसरा एल्एल्बी. एक मामा अभ्यासाची वेळ झाली की एका खोलीत दार बंद करून बसायचा. त्याला कोणी आवाज केलेला किंवा मध्ये मध्ये कोणी आलेलं त्याला आवडायचं नाही. शांततेत अभ्यास करायची त्याची सवय. दुसरा मामा मात्र ज्या खोलीत सगळे गप्पा मारत बसलेले असायचे, तिथेच जाऊन फेर्या मारत मारत अभ्यास करायचा. ती त्याची सवय.
आमच्याकडे आमच्या दूरच्या नात्यातल्या एक आजी कधीतरी दोन दिवस राहायला यायच्या. त्यांची एक सवय होती. त्या आपल्या थोड्या थोड्या वेळाने विचारायच्या, ‘‘किती वाजले गं?’’ आपण सांगितलं की म्हणायच्या ‘अरे बाप रे, १० वाजले का?.. ११ वाजले का?..’ किती वाजले असतील त्याप्रमाणे. खरं तर, कितीही वाजले तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता. काही काम नसायचं. कुठे जायचं नसायचं, कुठे यायचं नसायचं. सवय आपली.
तशाच आणखी एक बाई पूर्वी आमच्याकडे तास-दोन तासांसाठी बसायला यायच्या. त्या तास-दोन तासांत पातेलाभर तरी जमिनीचे पोपडे काढायच्या. तेव्हा माझ्या आईच्या घरी फरश्या नव्हत्या. शेणानं सारवलेली जमीन होती. त्या बसल्या बसल्या जमीनच खरवडायच्या. काय बघा एकेक सवय! कोणाला सतत खांदे उडवायची सवय असते.
कोणाला सकाळी उठल्या-उठल्याच चहा लागतो तर कोणाला संध्याकाळी चारची चहाची वेळ चुकली की जीवाची घालमेल होते. काही व्यक्ती चहा पिताना ‘फुर्र फुर्र’ असा आवाज करत पितात किंवा काही व्यक्ती खाताना ‘मच मच’ आवाज करत खातात. खरं तर खाता-पिताना असा आवाज करायची काहीच गरज नसते. पण आवाज करायची एक सवय जडलेली.
या अशा प्रत्येक माणसाच्या वेगळ्या वेगळ्या सवयी. हे आपलं माझं निरीक्षण. अशा हजारो लोकांना हजारो सवयी असतील. मलासुद्धा आहेत. पण मी कशाला सांगू तुम्हाला? ते तुम्ही निरीक्षण करा. पण या सवयी मुद्दाम कोणी लावून घेत नाहीत. त्या आपोआपच लागतात. पण एकदा लागल्या की त्या सवयीचे गुलाम आपण कधी होऊन जातो हे आपल्याला कळतच नाही, हो ना!