राष्ट्रीय संघासाठी मुख्य पुरस्कर्ता मिळविण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचा संघर्ष सुरूच असताना शाहिद आफ्रिदी फाउंडेशन पीसीबीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. इंग्लंड दौर्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो दिसणार आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्यावर तीन कसोटी व तीन टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. पीसीबी व पेप्सी या पुरस्कर्त्यांमध्ये बोलणी सुरू असून अजूनपर्यंत यातून निष्कर्ष निघू शकलेला नाही.
पेप्सीने मागील वेळेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी रक्कम पीसीबीला देऊ केल्यामुळे या बाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पाकिस्तान आपला पहिला कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे ५ ते ९ ऑगस्ट या कालावधीत खेळणार आहे. यानंतर उर्वरित दोन कसोटी १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत व २१ ते २५ ऑगस्ट या दिवसांत साऊथहॅम्पटन येथे होतील. मालिकेतील तिन्ही टी-ट्वेंटी लढती २८ ऑगस्ट, ३० ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे होतील.