अधिक सज्जतेची गरज

0
205

मडगावचे गोव्याचे एकमेव कोविड इस्पितळ पूर्ण भरल्याची कबुली आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पेडण्यात आयोजिलेल्या बैठकीत स्वतः दिली होती. मात्र, याचे गांभीर्य ओळखून माध्यमांनी तो विषय अधोरेखित करताच त्यांनीच ट्वीट करून २२० खाटांच्या या इस्पितळातील फक्त १०५ खाटा सध्या भरल्याचा दावा आता केला आहे. प्रत्यक्षात कोविड इस्पितळच नव्हे तर तेथील अतिदक्षता विभाग देखील पूर्ण भरला असल्याच्या बातम्या आहेत. काहीही झाले तरी रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता एका नव्या सुसज्ज उपचार सुविधेची तातडीची गरज राज्याला आहे. त्यामुळे आधी घोषित केल्यानुसार उत्तर गोव्यामध्ये एक नवे कोविड इस्पितळ सुरू करण्याचे पाऊल सरकारला आता उचलावेच लागणार आहे.
नवे कोविड इस्पितळ म्हणजे अर्थात सध्याच्या एखाद्या सरकारी इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करणे अथवा खासगी इस्पितळ ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर कोविड इस्पितळात करणे यापैकी एखादा पर्याय सरकारला अवलंबावा लागणार आहे. इस्पितळ म्हणजे नुसत्या खाटा नव्हेत. त्यासाठी लागणारी प्राणवायू साधने किंवा व्हेंटिलेटर्ससारखी वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आदींची सर्व व्यवस्थाही तेथे असावी लागते. सध्या डॉक्टरांना देखील कोरोनाने सोडलेले नाही. मडगावच्या कोविड इस्पितळातील दोघा डॉक्टरांनाच कोरोना झाल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा भासण्याची दाट शक्यता आहे. सरकारलाही याची जाणीव झालेली आहे. त्यामुळेच नव्याने पन्नास डॉक्टरांची भरती करण्याचा विचार आरोग्यमंत्र्यांनी बोलून दाखविलेला दिसतो.
जुलैच्या प्रारंभापासूनच नव्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढू लागल्याने कोविड केअर सेंटर्सची संख्या अपुरी भासू लागल्याने तेथे देखील सरकारला शेवटच्या क्षणी धावाधाव करावी लागली. नवनवी ठिकाणे त्यासाठी मुक्रर करून जवळजवळ पाचशे नव्या खाटांची भर आधीच्या एक हजार क्षमतेमध्ये घालण्यात आली. मात्र, ही कोविड केअर सेंटर्स केवळ कोविड पॉझिटिव्ह सापडलेल्या लक्षणविरहित रुग्णांसाठीच असल्याने लक्षणे आढळणार्‍या रुग्णांना गोव्याच्या एकमेव कोविड इस्पितळात पाठवणे अपरिहार्य बनते. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने लागोपाठ गेलेले आठ बळी पाहता अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सोयी असणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे सध्याचे कोविड इस्पितळ भरले आहे म्हणा अथवा भरलेले नाही म्हणा, परंतु गोव्यासाठी आणखी किमान एक कोविड इस्पितळ तातडीने सज्ज करावे लागणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
सध्या नव्याने आढळणार्‍या रुग्णांपेक्षा ‘बरे होणार्‍या’ रुग्णांचे प्रमाण राज्यात अधिक आहे ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे एक गोष्ट घडते ती म्हणजे ऍक्टिव्ह रुग्णांची सरासरी सरकारला आटोक्यात ठेवता येते आहे. मात्र, तरी देखील दिवसागणिक नव्वद, शंभरच्या प्रचंड वेगाने नवे रुग्ण सापडण्याचे सत्र आता सुरू झालेले असल्याने आरोग्यविषयक सज्जतेचा बोर्‍या वाजण्यास एखाद आठवडा पुरेसा ठरेल. त्याची जाणीव सरकारने ठेवली पाहिजे. सध्या अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयटी आदी शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहांमधून केली गेलेली व्यवस्था पूर्णकालीक असू शकत नाही, कारण शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाल्यावर त्या सुविधा हटवाव्या लागणार आहेत. नवे पर्याय शोधावे लागणार आहेत. राज्यातील कोरोनाचा चहुअंगांनी झालेला फैलाव आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सध्याच्या सर्व सोयी लवकरच अपुर्‍या पडण्याचे संकेत आहेत. त्यामुळे केवळ रुग्णांच्या बर्‍या होण्याच्या प्रमाणावर विसंबून निर्धास्त राहता येणार नाही.
गेल्या काही दिवसांत लागोपाठ कोरोनाचे आठ बळी राज्यात गेले. त्यात माजी आरोग्यमंत्र्यांपासून माजी मंत्र्यांच्या बंधूंपर्यंतचा समावेश राहिला. एक सत्ताधारी आमदार अत्यवस्थ आहेत. त्यामुळे कोरोनाचे गांभीर्य एव्हाना सरकारच्या लक्षात आले असेलच. परिणामी प्लाझ्मा थेरपीसारख्या काही राज्यांत यशस्वी ठरलेल्या उपचारपद्धतीचा अवलंब करून तरी गुंतागुंत असलेले रुग्ण वाचवता येतील का याचा प्रयत्न सरकार करून पाहणार आहे.
कोरोनाने मृत्युमुखी पडणार्‍यांवर बेवारशी असल्यासारखे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत ही अतीव दुःखाची बाब आहे. कोरोनामुळे माणुसकी विसरली जाता कामा नये. कोरोना आज आहे, उद्या नसेल. शेवटी माणसे राहणार आहेत. सध्या स्तब्ध झालेला काळ पुन्हा मोकळा होणार आहे हे कोरोनाच्या या कहरात विसरले जाऊ नये!