डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनाने निधन

0
175

माजी आरोग्य मंत्री, तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर (६८ वर्षे) यांचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले. कोरोना विषाणूची बाधा झाल्याने डॉ. आमोणकर यांना कोविड इस्पितळात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. येथे दाखल करण्यापूर्वी डॉ. आमोणकर यांच्यावर एका खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले होते.

डॉ. आमोणकर यांनी संयम, चिकाटी व जिद्दीने भाजपच्या कार्याचा गोव्यात विस्तार करण्यासाठी सुरुवातीच्या काळात जोरदार प्रयत्न केला. डॉ. आमोणकर हे शांत, कमी बोलणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. डॉ. आमोणकर यांनी सुरुवातीच्या काळात पाळी सारख्या ग्रामीण भागात दवाखाना सुरू करून जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. भाजपच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा डॉ. आमोणकर यांनी समर्थपणे सांभाळली. डॉ. आमोणकर यांनी सलग १० वर्षे पाळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पहिल्यांदा १९९९ मध्ये पाळी मतदारसंघातून विजय प्राप्त केला. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून यश प्राप्त केले.
फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात डॉ. सुरेश आमोणकर यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारमध्ये डॉ. आमोणकर यांचा समावेश होता. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात डॉ. आमोणकर यांनी आरोग्य, समाजकल्याण, कारखाने व बाष्पक खात्याचा पदभार सांभाळता होता. डॉ. आमोणकर यांनी आपल्या आरोग्य मंत्रिपदाच्या कार्यकाळात पहिल्यांदा १०८ च्या धर्तीवर रुग्णवाहिका सेवा सुरू केली.

डॉ. आमोणकर यांना २००७ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. भाजपने २०१२ मध्ये पक्षाची उमेदवारी न दिल्याने डॉ. आमोणकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यानंतर डॉ. आमोणकर यांनी सुभाष वेलिंगकर यांनी स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंचात प्रवेश करून २०१७ ची विधानसभा निवडणूक साखळी मतदारसंघातून लढविली होती. तथापि, त्यांना निवडणुकीत परत एकदा पराभवाला तोंड द्यावे लागले.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री सुरेश आमोणकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. डॉ. आमोणकर यांनी आपल्या कार्यकाळात गोवा राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान आम्ही विसरू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आमोणकर यांनी राज्यात भाजपला जनतेत स्थान मिळावे म्हणून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून श्रम घेतले होते. पक्षासाठी शिस्तप्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले होते.- श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्री

डॉ. सुरेश आमोणकर हे अतिशय प्रेमळ सात्विक व विचारसंपन्न लोकप्रिय नेते होते. त्यांनी राजकारण व समाजकारण यांची योग्य सांगड घालताना विकासाला चालना दिली व अनेक माणसे जोडली, अशी प्रतिक्रिया सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केली. – सभापती राजेश पाटणेकर

डॉ. आमोणकर यांच्याशी जवळचे नाते होते. त्यांनी राजकीय, सामाजिक, वैयक्तिक जीवनात सचोटी व प्रामाणिकपणा जपला, असे कामत यांनी म्हटले आहे.- विरोधी पक्षनेते दिगंबर कामत

अतिशय नम्र असे डॉ. आमोणकर यांचे निधन झाल्याची वार्ता दुःखद असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया प्रविण झांट्ये यांनी व्यक्त केली.- आमदार प्रविण झांटये

डॉ. आमोणकर हे खूपच कार्यक्षम नेते होते. त्यांच्या निधनाने साखळी मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे माजी आमदार प्रताप गावस यांनी सांगितले.- माजी आमदार प्रताप गावस

ऍड. रमाकांत खलप यांना दु:ख
माजी मंत्री सुरेश आमोणकर यांच्या निधनाबद्दल माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी दुःख व्यक्त केले असून राज्यात वाढत चाललेल्या कोरोना फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कोविडच्या पार्श्‍वभूमीवर जारी केलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन खलप यांनी केले आहे.