अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडची जागा धोक्यात

0
213

>> आर्चर, वूडच्या वेगाला मिळू शकते झुकते माप

इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाबाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. बुधवारपासून हा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. जोफ्रा आर्चर व मार्क वूड या वेगवान गोलंदाजांना जेम्स अँडरसनच्या जोडीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलद मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्यासह अष्टपैलू ख्रिस वोक्स यालादेखील संघात जागा मिळणे कठीण झाले आहे.

मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड व पहिल्या कसोटीसाठीचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी एकमेव स्पेशलिस्ट फिरकीपटू डॉम बेस याला खेळविण्याचे संकेत दिल्यामुळे ब्रॉड व वोक्स यांना जागा मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत ब्रॉड याचा अँडरसन याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो. अँडरसन हा प्रामुख्याने स्विंग गोलंदाज आहे. ताशी १३०-१३५ किमी प्रतितास वेगाने तो गोलंदाजी करतो.

स्टुअर्ट ब्रॉड हा ‘हिट दी डॅक’ गोलंदाज असला तरी त्याचा वेगदेखील अँडरसनप्रमाणेच आहे. आर्चर व बूड यांचे तसे नाही. सातत्याने ताशी १४० ते १४८ किमी वेगाने गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या वेगाने अचंबित करण्याची क्षमता या दोघांकडे आहे. त्यामुळे अनुभव व वेग यांच्यापैकी एकाची निवड इंग्लंडला करावी लागणार आहे.

२०१२ साली ब्रॉड याला वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील कसोटी सामन्याला शेवटच्या वेळी मुकावे लागले होते. यानंतर इंग्लंडच्या मायदेशातील सर्व कसोटींत ब्रॉड खेळला आहे.