आरोग्याची त्रिसूत्री  आहार- विहार- उपचार

0
346
– डॉ. मनाली म. पवार
(पणजी)
आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोणताही व्हायरस आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकत नाही. कोरोनाची भीती नसली तरी सामाजिक अंतर व मास्कचा वापर नियमित केल्यास किंवा प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पावसाळ्यातील इतर आजार म्हणा किंवा कोरोना व्हायरसवर आपण सहज मात करू शकतो.
सध्या पावसाळा व त्याचबरोबर कोविड-१९ चा अनलॉक काळ सुरू झाला आहे म्हणून आरोग्य सांभाळण्यासाठी त्रिसूत्रीचे आचरण नक्की कराच…
आहार, विहार व उपचार ही तीन सूत्रे आरोग्य सांभाळण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत. या काळात तब्येतीला जरा जास्त जपायचे आहे. इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात शरीरामध्ये वातावरण व पर्यावरणाचे खूप बदल झालेले असतात. हे बदल म्हणजे….
* शरीराची सर्व कार्ये त्रिदोषांवर अवलंबून असतात, त्यापैकी वातदोषाचा प्रकोप होतो तर पित्त दोष साठत आहे.
* धातू ज्यावर शरीर उभे असते, त्या रसरक्तादी धातूंची शक्ती कमी होते. सर्वच धातू शिथिल झालेले आहेत.
* बाह्य वातावरणात पाण्याचे प्रमाण वाढल्याने मूत्रप्रवृत्ती वारंवार होऊ लागते.
* अग्नी मंदावतो, त्यामुळे भूक, पचनशक्ती कमी झाली आहे.
* हवेतील दमटपणामुळे वातावरणात जंतूंचे प्रमाण वाढते. तसेच धातू शिथिल झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
* त्यात कोरोना महामारीच्या या काळात लॉकडाऊन संपून अनलॉक काळ सुरू झाला व जनसामान्य जरा जास्तच बेताल वागू लागले आहेत. जरी नियम शिथिल झालेले असले तरी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, गरम पाणी पिणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, रसायनांचा वापर करणे या नियमांचे पालन करणे किंवा चालू ठेवणे अपेक्षित आहे.
-ः आहार ः- 
भजेत्साधारणं सर्वं उष्मणस्तेजनं च यत् |
अशा प्रकारच्या अन्नाचे सेवन करावे जे वात-पित्त व कफ तिन्ही दोषांचे संतुलन करेल, जे उष्ण असेल व अग्नीलाही प्रदीप्त करण्यास सक्षम असेल.
तसेही सध्या मुलांचे म्हणा वा थोरामोठ्यांचे शारीरिक श्रम कमी झालेले आहेत. घरात बसून हालचाल कमी, व्यायाम नाही, बैठे काम वाढले आहे व भूकही कमी लागते आहे. जे काही अतिरिक्त खाल्ले जात आहे ते भूक लागली म्हणून नाहीतर वेळ जात नाही म्हणून किंवा टीव्ही- मोबाइलच्या अति-वापरामुळे. त्यामुळे आरोग्य रक्षणासाठी…..
– चार घास कमी खावेत.
– संध्याकाळी लवकर जेवावे व तेसुद्धा हलके अन्न खावे.
रात्री साधे मुगाचे यूष, द्रवाहार म्हणजे सूप किंवा चुरमुरे घेतले तरी चालते.
– सकाळी नाश्त्याला लाह्या व दूध, मुलांना गरम भातावर थोडेसे तूप टाकून मेतकुटाबरोबर भात खायला द्या. या कोरोना महामारीच्या काळात सध्या रोज भाज्या, फळे खायला पाहिजे असा नियम घालून घेऊ नका. तुमच्या साठवणीतल्या पदार्थांचा वापर करा. पचण्यास हलका आहार म्हणजे साधारण साडेबारा-एक वाजेपर्यंत मस्त भूक लागेल असा नाश्ता घ्या. सध्या मुलं घरी आहेत तर वेळेवर तरी जेवू द्या.
– दुपारचे जेवण गरम असण्याकडे लक्ष द्या.
दुपारच्या जेवणात चपातीऐवजी ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी किंवा फुलका घ्यावा. भात जुन्या तांदळाचा असावा. शक्यतो कुकरमध्ये शिजवलेला भात टाळावा. कारण तो पचायला जड असतो.
धान्ये – तांदूळ, ज्वारी, बाजरी. थोड्या प्रमाणात गहू, सर्व धान्ये आधी भाजून घेतल्यास उत्तम.
– डाळी, कडधान्ये, मूग, मटकी, तूर, कुळीथ
भाज्या – दुधी, तोंडली, दोडकी, भोपळा, पडवळ, भेंडी, कारले, बटाटे व रानभाज्या सेवन करा. इतर पालेभाज्या (मेथी, पालक, मुळा) टाळाव्यात.
फळे – सफरचंद, पपई, अंजीर, नारळ
मसाल्याचे पदार्थ – आले, हिंग, दालचिनी, धने, जिरे, मिरे, बडीशोप, लवंग.
दूध व दुधाचे पदार्थ – दूध, ताजे व गोड ताक, घरचे साजूक तूप.
गोड पदार्थ – खीर, शिरा, केशरभात, मुगाचे लाडू.
इतर – साळीच्या लाह्या, खडीसाखर, मध, सैंधव.
मांसाहार – मांसरस सेवन करता येतो.
दुपारच्या जेवणानंतर जिरे, काळे मीठ, आले टाकून ताजे ताक पिणे उत्तम. दहीभात टाळणेच चांगले.
– पावसाळ्यात पाण्याचा विपाक आंबट होतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. तसेच पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही सर्वाधिक असल्याने पिण्याचे पाणी चांगले वीस-पंचवीस मिनिटे उकळून घ्यावे व पाण्याचा आंबट विपाक कमी करण्यासाठी त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ यांसारखी मधुर विपाकाची द्रव्ये वापरावीत.
– वातप्रकोपाचा काळ असल्याने मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळा.
– पचण्यास जड असे वाटाणा, चवळी, पावटा, चणा, ढोबळी मिरची, गवार वगैरे पदार्थ टाळावेत.
– अंडी व मांसाहारसुद्धा वर्ज्य करणेच चांगले.
-ः विहार किंवा आचरण ः- 
पावसामुळे सूर्यप्रकाश कमी असल्याने अन्न नासण्याची किंवा बुरशी येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शिळे अन्न टाळावे.
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
– खेळती हवा नसणार्‍या ठिकाणी राहू नये.
– ओल आलेल्या ठिकाणी राहू नये.
– घरातील हवा शुद्ध राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळ ऊद, गुग्गुळ, ओवा, कडुनिंब, अगरू, चंदन, विडंग द्रव्यांचा वापर करून तयार केलेल्या धूपाने धूपन करावे.
– भीमसेनी कापूर सकाळ-संध्याकाळ घरात जाळावा.
– वाढलेला वात, कमी झालेली शरीरशक्ती यांच्या अनुषंगाने प्रवास टाळावा. रात्री जागरणे टाळावीत. दमछाक करणारे व्यायामप्रकार टाळावेत. त्याऐवजी योगासने, अनुलोम-विलोम प्राणायाम, भस्त्रिका यांसारखे सोपे, न दमवणारे पण पंचवायूंना संतुलित करणारे व्यायाम करणे अधिक श्रेयस्कर आहेत.
– अंग नेहमी कोरडे ठेवावे. उबदार कपडे घालावे.
– ओवा, शेपा, वावडिंगाची धुरी घेता आली तर फारच उत्तम. याने सर्दी-खोकला-घसा दुखणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनला प्रतिबंध होऊ शकतो.
– कोरोना व्हायरसची भीती आता मनातून काढून टाका. ज्याप्रमाणे सर्दीचा व्हायरस आपले काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे कोरोना व्हायरसही. कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असणारे कितीही रुग्ण मिळाले तरी त्यातले रुग्ण बरे होतानाही दिसत आहेत. मृत्यूची संख्या शून्य आहे. म्हणजेच आपली प्रतिकारशक्ती चांगली असल्यास कोणताही व्हायरस आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकत नाही. कोरोनाची भीती नसली तरी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर नियमित केल्यास किंवा प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास पावसाळ्यातील इतर आजार म्हणा किंवा कोरोना व्हायरसवर आपण सहज मात करू शकतो.
-ः उपचार ः- 
– खोकला किंवा सर्दीची चिन्हे दिसू लागल्यावर लगेचच सितोपलादी चूर्ण मधाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घ्यायला सुरू करा. यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते.
– छाती व पाठीला अगोदर तेल लावून ओव्याच्या पुरचुंडीने शेकल्यास छातीत साठलेला कफ मोकळा व्हायला मदत होते. दम कमी लागतो.
– घरच्या घरी बनवता येणारा काढासुद्धा उपयोगी पडतो. कपभर पाण्यात गवतीचहाचे एक-दीड इंचाचे तुकडे, दोन-तीन तुळशीची पाने, दोन-तीन पदिन्याची पाने, थोडेसे किसलेले आले, अर्धा चमचा बडीशेप व चवीनुसार साखर घालून एक उकळी आणावी. नंतर गॅस बंद करून दोन-तीन मिनिटे झाकून ठेवावे. नंतर गाळून घेऊन घोट घोट प्यावे. असा हा चहा दिवसभरात कधीही घेता येतो. यामुळे सर्दी-ताप-घसादुखी वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो. पचन सुधारते. पोट साफ होण्यास, लघवी साफ होण्यास मदत होते.
– वातदोष संतुलनासाठी नेहमी प्रयत्न करावे. त्यासाठी अभ्यंग, बाष्पस्वेदन, बस्ती हे उपचार उत्तम होय. घरच्या घरीसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी अंगाला तेल लावून जिरवणे. दुसर्‍या दिवशी सकाळी स्नानाच्या वेळी साबणाऐवजी उटणे वापरावे.
– सांधे, पाठ, कंबर दुखत असल्यास रुईच्या पानांनी किंवा निरगुंडीच्या पानांनी शेकावे.
– रोज सकाळी सुंठ-गूळ-तूप याची सुपारीच्या आकाराची गोळी करून खावे.
अशा प्रकारे ही आयुर्वेदाची त्रिसूत्रे सांभाळण्यास आरोग्य व्यवस्थित राहील.