भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची १७ जुलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत चीनमधील पुरस्कर्ते, टीम इंडियाचा सुधारित फ्युचर टूर प्रोग्राम व देशांतर्गत क्रिकेट मोसमाची सुरुवात या संबंधी निर्णय अपेक्षित आहेत. मंडळाची मागील बैठक ६ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली होती. १७ रोजीच्या बैठकीत इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे चीनी प्रायोजक व्हिवो संबंधी चर्चा अपेक्षित आहे. प्रायोजकत्व रद्द करण्यासंबंधी निर्णय मात्र आयपीएल संचालन परिषदेलाच घ्यावा लागणार आहे.
आयपीएल स्पर्धा सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये होणार असे गृहित धरूनच देशांतर्गत मोसमाची आखणी बीसीसीआयला करावी लागणार आहे. देशांतर्गत मोसम सुरू करून तो मार्च महिन्यापर्यंत संपवण्याचे मोठे आव्हानही बीसीसीआयसमोर असेल. टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी केंद्र सरकारकडून करातून सूट घेण्यासाठी आयसीसीने डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुद्यावरदेखील चर्चा अपेक्षित आहे. भारताचा जून-जुलैमधील श्रीलंका दौरा तसेच झिंबाब्वे दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. या दौर्यांचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे.