कोरोनाचा विस्तार होतोय सावधान…!

0
145
–  डॉ. राजेंद्र साखरदांडे
कोरोनाचा विस्तार फेब्रुवारी २१ पर्यंत चालू राहणार. जर आपण लॉकअप करत राहिलो तर जगात उलटलेली सध्याची दुसरी लाट भारतात मार्च २१ नंतर दिसेल. मग सर्दी, पडसे यांचा व्हायरस जसा आजवर आमच्याबरोबर आहे तसाच हाही ‘कोविड-१९’ आमच्याबरोबरच राहणार या मानसिकतेची जबाबदारी आपण आताच घेतलेली बरी.
‘कोरोना’विषयीचे पानीपत पेटलेय. घरोघर धूमश्‍चक्री चालू आहे. ही लढाई संपण्याची लक्षणे दिसत नाहीत व दिसणार पण नाहीत… असे म्हणून मी वाचकांना नाऊमेद तर करत नाही ना, ही शंकेची पाल मनात चुकचुकतेय… मी माझी मते परखडपणे मांडत आलेलो आहे, तेव्हा यावेळी वेगळे घडणार नाही हेही तेवढेच खरे.
सध्या जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे… जास्तीत जास्त लोक घरातच बसले आहेत… त्यांचे करमणुकीचे साधन म्हणजे टीव्ही. दिवसरात्र प्रत्येक चॅनलवर ९० टक्के फक्त ‘कोरोना’विषयीच्याच बातम्या. परवा कोरोनाने मरण पावलेल्यांची प्रेते अगदी बोचक्यात बांधून, ओढून नेऊन खड्‌ड्यात टाकताना चॅनलवाले दिवसभर दाखवत होते. ते एवढे विदारक दृश्य होते की हृदयविकारी बिचारा मरूनच जाईल. चीनमध्ये वुहान या शहरात घरांना बाहेरून कुलुपे ठोकून लोकांना आतल्या आत कुजत ठेवले… याबाबत चकार आवाज नाही. ही अशी दृश्ये चॅनलवर दाखवणे बंद व्हायला हवे. तिथे ५६ इंचाची छाती दाखवायलाच हवी.
जनता भयभीत झाली आहे… कारण त्यांना कुणी वाली राहिलेला नाही. मागे आमच्या बालपणी एक गोष्ट ऐकली होती, त्यात आभाळ कोसळतेय… पळा पळा… म्हणत सर्वप्रथम ससा पळत सुटला. मग सगळी जनावरे एकापाठोपाठ पळत होती. शेवटी पळणारा सिंह होता. इथे तर सिंह-वाघ पुढे पळताहेत… सिंह कोण व वाघ कोण हे जाणून घ्यायला जनताजनार्दन समर्थ आहे!
राज्य चालवणार्‍यांवरचा जनतेचा विश्‍वास उडतोय… उडलाय… चारी बाजूंनी चक्रव्यूहात अडकलेल्या जनतेला वाचवायला कुणी मायेचा बाप पुढे येत नाही. सरकार फक्त घोषणा करताहेत- ‘कोरोनाला घाबरू नका… काहीही होणार नाही… या रोगाला तोंड द्यायला आम्ही समर्थ आहोत. आमच्याकडे कोरोना नाही, जर गोव्यात कोरोनाच्या केसेस आल्या की होताहेत… त्या बाहेरून आलेल्या आहेत. त्या कर्नाटक, महाराष्ट्र, युपी, बिहार, तेलंगणा वगैरे वगैरे भागांतून आलेल्या आहेत.’ आज लाखो मजूर तर आपल्या घरी परतलेत, आता काय?
सुरुवातीला आम्ही लवचिकता दाखवली… चेकनाके फक्त नाके बनले. मलाई गोळा करण्यातच दिवस गेले… थर्मल टेस्टिंग केले गेले. ज्यांना ताप सापडला त्यांना डेटिंग केले गेले. पॅरासेटामॉलच्या गोळ्या घेऊन बाहेरील राज्यांतील लोक गाडी, रेल्वे, विमान यांतून गोव्यात आले. गोवेकरांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे काम ते करत राहिले. सुरुवातीचे हेल्थ किट किती खरे उतरले माहीत नाही… कितीतरी महिन्यांनी जी.एम.सी.मधील लॅब सुसज्जित करण्यात आली. सरकारने फक्त थोड्याच लोकांच्या टेस्टस् घ्यायला सुरुवात केली.
खरी माहिती तर गोवा सरकारने तेव्हा दिलीच नाही. खोट्या माहितीच्या आधारे गोवा राज्य भारतात खोट्या दिमाखासाठी पारितोषिके स्वीकारू लागले. स्वतःची महती स्वतःच आपल्या भाटाद्वारे जनतेला सांगू लागले. आता तर भांडा फुटतोय. आताच तर भटजी आंघोळ करायला गेलेत… पूजा अजून बाकी आहे. यावर पुढे केव्हातरी बोलूच.
मध्येच साहेब बोलून गेले… ‘कोव्हिड- १९’ व ‘कोरोना’ हे दोन विषय… मग म्हणाले, गोव्यात सामाजिक संसर्ग चालू झालाय.
परवाच भारताचे गृहमंत्री म्हणाले, भारतात सामाजिक संसर्ग झालेला नाही. मग कोलांटी उडी घेत साहेब बोलते झाले, गोव्यात सामाजिक संसर्ग झालेला नाही. हे वरील प्रकारचे दावे साहेबांकडून अपेक्षित नाही, कारण ते राज्याचे सर्वेसर्वा आहेत. महिन्यापूर्वी दहाच्या खाली कोरोनाच्या केसेस सापडल्यावर गोवा सरकार आपणच आपली पाठ थोपटवण्यात दंग राहिले. तोवर विमानमार्गे, रेल्वेमार्गे, बसेसमधून, गाड्यांतून, ट्रकांमधून, दुचाकीवरून व चालत परराज्यांतून कोरोनाग्रस्त गोवा राज्यात दाखलही झाले.
आजकाल दररोज गोवा आरोग्य खाते पत्रक काढत आहे. त्यात एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येते व ती म्हणजे, मांगोर हिलमधील रोगी… मांगोर हिलमधून संसर्ग झालेले… व मग इतर. आजकाल साखळीमध्ये कितीतरी रुग्ण सापडलेत, जे बाहेरून कोरोनाचे व्हायरस साखळीत घेऊन आलेले आहेत. तर आम्ही त्यांना पणजीहून आलेले, वास्कोहून आलेले असे म्हणू का?
वास्को- मांगोर हिलवर रुग्ण सापडायला सुरुवात झाली त्याअगोदर तिथे डेंग्यूचे परीक्षण करणार्‍या वास्को शहरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य रक्षकांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. शहरी आरोग्य केंद्राच्या ३४ पैकी २४ लोकांना लागण झाल्यानंतर धामधूम सुरू झाली व मग मांगोर हिलमध्ये महाभयंकर प्रमाणात रुग्ण सापडू लागले… आज वास्कोत परिस्थिती बिकट आहे… मांगोर, वाडे, नवेवाडे, बायणा, वास्को शहरी भाग कोरोनाने ग्रासला आहे. यावर सरकार गुळीमुळी चुप्पी साधून आहे.
आता आम्ही वर्तमानात येऊ. आजचा हा कोरोनाचा वायरस २०१९ साली दिसून आला म्हणून त्या व्हायरसला आम्ही कोव्हिड- १९’ म्हणतो. त्या व्हायरसमुळे ज्या रोगाचा फैलाव होतो त्याला आपण ‘कोरोना’ म्हणतो. या रोगाचा विस्तार कोठवरपर्यंत होणार व पुढे काय होणार? असे कैक प्रश्‍न सामान्यांच्या मनात सध्या घर करून बसलेत.
राज्याचे सर्वेसर्वा म्हणतात, ‘‘तुम्ही घाबरू नका, घाबरण्याचे कारण नाही.’’ हे साफ खोटे आहे. तुम्ही घाबरले पाहिजे व घाबरल्यानंतरच माणसाच्या व्यवहाराला, राहणीला एक वाटचाल मिळते. गोवेकरांनी आज स्वतःवर बंधने घालायची काळाची गरज आहे.
आज सरकार मायक्रो कन्टेन्मेंट व कन्टेन्मेंट यावर ऊहापोह करत आहे. साखळी, वास्को व गोव्यातील गावागावांत, वाड्यावाड्यांत कन्टेन्मेंट झोन करत आहेत. राजकीय प्रभाव आणणार्‍या वजनदार राजकारणी लोकांच्या मतदारसंघांत घमासान पद्धतीने ‘स्वाब टेस्टिंग’ चालू आहे. येथे टेस्ट किट वापरले जात नाही. ज्यांना लक्षणे दिसून येतात त्यांनाच टेस्ट किट वापरले जातात. खरे म्हणजे अहवाल एक दिवसानंतर यायला हवा. तो अहवाल चारपाच दिवसांत येत असेल तर तो पॉझिटिव्ह निघालेला रुग्ण तोवर कितीतरी लोकांना आपला रोग स्थलांतर करील याचा नेम नाही. याचे पुरावे आहेत, वरकरणी मी हे लिहीत नाही.
एका टेस्ट किटची किंमत सरकारला ५०० रुपये पडते. सध्या सरकारकडे किती टेस्ट किट आहेत याची माहिती नाही. या किटला २० टक्के एरर आहे. म्हणजे १०० लोकांची जर टेस्ट झाली तर २० जणांची ती फॉल्स निगेटिव्ह होते. म्हणजे ते १०० टक्के लागण झालेली दाखवत नाही. विषय गंभीर आहे तो म्हणजे, लक्षणे दाखवत नसलेले लोक म्हणजे ‘असिम्टोमॅटिक’- ते तर सापडणारच नाहीत. कारण सरकार सगळ्याच लोकांच्या टेस्ट करत नाही.
कन्टेन्मेंट करण्यामागचा हेतू असा की, त्या वाड्यावरच्या प्रत्येक घरातील, प्रत्येक माणसाची टेस्ट करणे व त्यावरचा रिपोर्ट आल्यावर कन्टेन्मेंटरहित करणे, नाहीतर चौदा दिवस बंदी लागू करणे. तोवर सगळे तिथले व्यवहार ठप्प. मग त्या भागात जाणे-येणे बंद व त्या भागातील लोकांचे बाहेर जाणे बंद. फक्त कामाधंद्यानिमित्त बाहेर जाणार्‍यांवर नजर ठेवणे. पण जर का १३ दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत तिथे सापडले तर काय? यावरचा उपाय कोणी सुचवलाच नाही. कारण याचे उत्तर त्यांना माहीत नाही. असिम्टोमॅटिक रुग्ण कोरोनाचा फैलाव १४ दिवसांत करणारच. थोडे रुग्ण २० दिवसांत फैलाव करतात. मग ते रुग्ण आपल्याला काहीही झाले नाही असे म्हणत गावभर फिरत राहणार त्याचे काय? आता हे कोठवरपर्यंत?
मी म्हणालो, भटजी आताच आंघोळीला गेलेत… पूजा अजून बाकी आहे. याचाच अर्थ ‘कोव्हिड- १९’चा व्हायरस आज व पुढेही आमच्याबरोबरच राहणार. महिन्याच्या महिने… वर्षानुवर्षे… तेव्हा घाबरायला नको..!
भारतात अजून ‘सर्वोच्च बिंदू’ (पिक) झालेला नाही. दर दिवशी कोरोनाच्या केसेस वाढत राहणार. कालचा आकडा दिवसा १८ हजार… पुढे वाढत जाणार. ऑगस्टच्या शेवटाला वरचा ‘सर्वोच्च बिंदू’ गाठला जाईल. मग दोनतीन आठवड्यांची सपाटी… मग केसेस उतरत जातील… त्याला तीनचार महिने लागतील. तोवर कोरोनाचे रुग्ण दगावत राहणार.
आज जर गोव्यात कोरोनाचा जाहीर आकडा १५ शेच्या जवळ पोचला आहे, तर खरा नंबर ४ हजाराच्या पुढे आहे. कारण आकडा फुगणार म्हणून सरकार सर्वसामान्य गोवेकरांवर टेस्टिंग करत नाही. केली असती तर बरे झाले असते. कारण त्याने मरणाचे प्रमाण ३ टक्के वरून ०.५ टक्के आले असते. सरकारी आकडे खरे आहेत कशावरून?
दिवसेंदिवस आकडे फुगत राहतील. कोरोनाचे रुग्ण गोव्याच्या गावागावांत सापडत आहेत व सापडत राहणार. तेव्हा गोवेकरांनी आपली मानसिकता तयार ठेवली पाहिजे की आपल्याला या पाहुण्याबरोबर राहायला पाहिजे.
हा रोग छोट्या मुलांना व वयस्कर लोकांना घातक आहे. तरुण या महाभयंकर पुरात तरून जातील… तेच हे असिम्टोमॅटिक. १४ ते २० दिवस या माणसांपासून इतर लोकांना धोका आहे. मग ज्यांच्या रक्तात असिम्टोमॅटिक तयार होतात त्याने हा रोग त्या माणसाला एक वर्षापर्यंत परत होणे नाही. फार थोड्या लोकांना हा रोग परत होऊ शकतो. त्याला आपण ‘हर्ड इम्युनिटी’ म्हणतो. सरकारकडे दोन उपाय आहेत. एक तर रुग्ण आढळल्यावर तिथे कन्टेन्मेंट करून, टेस्टिंग करून तिथल्या भागातील रुग्णांना शोधून काढून १४ दिवस कॉरन्टाईन करणे. हे चालूच ठेवणे किंवा प्रत्येकाला त्याची लागण होऊ देणे, म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीनुसार लोकांना या रोगाची लागण होईल किंवा या भवसागरात तो तरून जाईल. मात्र यात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन, लठ्ठ लोक, वयस्कर लोक व लहान मुले यांना धोका संभवतो.
कोरोनाचा विस्तार फेब्रुवारी २१ पर्यंत चालू राहणार. जर आपण लॉकअप करत राहिलो तर जगात उलटलेली सध्याची दुसरी लाट भारतात मार्च २१ नंतर दिसेल. मग सर्दी, पडसे यांचा व्हायरस जसा आजवर आमच्याबरोबर आहे तसाच हाही ‘कोविड-१९’ आमच्याबरोबरच राहणार या मानसिकतेची जबाबदारी आपण आताच घेतलेली बरी.
आता आपण काय करायचे… घरी बसून राहायचे, कामावर जायचे नाही, मग पोट कसे भरणार? असे किती दिवस…? हे विचारच प्रत्येक गोवेकराला पडलेले आहेत. ‘तुम्ही घाबरू नका, काहीही होणार नाही…’ असे ऐकण्याची तयारी कुणाचीच नाही. कारण काहीतरी बरे-वाईट होणार हे निश्‍चितच. कालच मला एक शिक्षिका भेटली. म्हणाली, मला छोटी मुलगी, मुलगा आहे. भय वाटते. मला मरायचे नाही. आजकाल प्रत्येक दवाखान्यात, फार्मासित लोक गर्दी करतात. इम्युनिटी वाढवायच्या गोळ्या घेताहेत. त्यात ‘….’ बाबासारखेही आपले हात धुवून घेताहेत. कुणी हळद खातोय तर कुणी आले, लसूण… तर कुणी कुठल्यातरी झाडांची पाने, फळे, मुळे चाखतोय… कुणालाही मरायचे नाहीय.
आता शेवटचे… आम्ही सर्वसामान्य लोकांनी काय करावे?
१) घराबाहेर निघायचे नाही.
२) तोंडावर मास्क चढवायचा, नाकसुद्धा बंद करायचे.
३) हात, पाय, तोंड धूत राहायचे.
४) काम असेल तरच बाहेर पडायचे.
५) सोशल डिस्टन्स सांभाळायचे.
६) कुणाच्या घरी जायचे नाही. अगदी जवळच्या नातेवाईकांकडेही नाही. कुणालाही घरी येऊ द्यायचे नाही. आलाच तर गेटवरून परत पाठवायचे. भीड बाळगायची नाही. आवश्यकता असली तर मास्क परिधान करूनच घरात घ्यावा. सोशल डिस्टन्सिंग सांभाळावे.
७) विविध रोगांवर औषधे घेणार्‍यांनी तर याचे काटेकोर पालन करावे.
८) वयस्कर व लहान मुलांनी घरातच राहावे. घरातच व्यायाम, योगा व चालणे चालू ठेवावे.
९) व्यसनाधीन लोकांनी व्यसने सोडावीत. दारू पिल्याने रोगाचे किटाणू मरतात या संभ्रमात राहू नये.
१०) कामावर जाणार्‍या माणसांनी घरात आल्यावर आंघोळ करावी, नवीन कपडे परिधान करावेत.
११) चांगले पौष्टिक अन्न ग्रहण करावे.
१२) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग उपचार डॉक्टरी सल्ल्यानुसार करावेत.
१३) गर्दी टाळावी.
या रोगावरची लस तयार करण्यात राष्ट्रांची जोरदार शर्यत चालू आहे. बातम्या येतच आहेत. लस येईतोवर महिने लागतील, कदाचित जानेवारी २१ उजाडेल सांगता येत नाही.
स्वतःला सांभाळा. पुढचा काळ भयंकर आहे. सर्वकाही ठीक आहे… ऑल इज वेल… म्हणत थ्री इडियट्‌स गेले… त्यांच्या मागे आपण जाऊ नये. अशात मन थार्‍यावर आणण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याचे व्यसन लावून घेऊ नका.
लढा… मी तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतोय. ही तर सुरुवात आहे. हा लेख लिहिण्यात डॉ. प्रणव बुडकुले यांचे फार मोठे साहाय्य लाभले.. त्यांचे आभार मी इथे नमूद करतो. धन्यवाद. देव तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवो!