>> पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांची माहिती
राज्यातील हॉटेल्स आज दि. २ जुलैपासून पर्यटक व अन्य नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या हॉटेलवाल्यांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेली आहे व हॉटेल्स खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज केलेले आहेत त्यांनाच हॉटेल खुली करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.
हॉटेल खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज आतापर्यंत २५० हॉटेलवाल्यांनी केले असून त्यात पंच तारांकित हॉटेल्ससह अन्यांचा समावेश असल्याची माहितीही आजगावकर यानी दिली. पर्यटन खात्याशी नोंदणी असलेले अथवा नोंदणी करून जे यापुढे हॉटेल खुले करण्यास परवानगी मागतील त्यांनाही परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती आजगावकर यांनी दिली. अनलॉक प्रक्रियेचाच हा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाचणी करूनच या
अथवा गोव्यात करा
आता राज्यात हॉटेल्स खुली होणार असल्याने परराज्यांतून पर्यटनासाठी पर्यटक येणार असून त्यांना येतानाच आपल्या राज्यातून कोरोनाची चाचणी करून यावे लागणार आहे. अन्यथा गोव्यात आल्यानंतर चाचणी करावी लागणार आहे. तसेच त्यांना गोव्यात येण्यापूर्वीच ऑनलाइन हॉटेल बुकींग करावे लागणार आहे. बुकींग न करता येणार्यांना राज्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
४८ तासांपूर्वी कोविडची चाचणी केल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच व चाचणी निगेटिव्ह असलेल्यांना कोणत्याही अडचणीशिवाय राज्यात प्रवेश मिळेल. जे गोव्यात येऊन चाचणी करतील त्यांना अहवाल मिळेपर्यंत विलगीकरणात रहावे लागेल आणि अहवाल निगेटिव्ह आला तरच राज्यात फिरता येईल, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
कोरोना आपत्तीमुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सर्व हॉटेल्स बंद असून त्यामुळे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोेडले आहे.
आता हॉटेल्स सुरू होणार असल्याने राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार असल्याचे आजगावकर म्हणाले.