>> नवीन ७२ पॉझिटिव्ह रुग्ण
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह एका ६६ वर्षीय ताळगाव येथील व्यक्तीचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये मंगळवारी मध्यरात्री निधन झाले असून राज्यातील कोरोना बळींची संख्या ४ झाली आहे. दरम्यान, राज्यात काल नवीन ७२ रुग्ण आढळून आले असून कामराभाट-करंजाळे आणि बोरी-शिरोडा येथे आयझोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, जुवारीनगरात नवीन २४ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ७१३ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह ७४ रुग्ण बरे झाल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले आहे.
ताळगाव येथील ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने चार दिवसांपूर्वी मडगावच्या कोविड इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला कोरोनाबरोबरच इतर आजार होते, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. या कोरोना पॉझिटिव्ह मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी त्याच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून मयत व्यक्तीवर आज अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कामराभाटमध्ये कोरोनाबाधित रुग्ण
कामराभाट करंजाळे येथे कोरोना पॉझिटिव्ह १ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कामराभाट येथे पणजी महानगरपालिकेचे कामगार मोठ्या संख्येने राहतात. येथील प्रशासन सतर्क झाले असून सावधगिरीचा उपाय म्हणून कामराभाटमध्ये जाणारा रस्ता अडविण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पत्नीची कोविड चाचणी करण्यात आली असून चाचणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. पणजी महानगरपालिकेने सावधगिरीचा उपाय म्हणून कामरा भाट येथे राहणार्या सुमारे शंभर कामगारांना कामावर न येण्याची सूचना केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बोरीत एक आयसोलेटेड रुग्ण
बोरी शिरोडा येथे कोरोना पॉझिटिव्ह १ आयसोलेटेड रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील विविध भागात आयसोलेटेड रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.
साखळी येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले असून साखळीतील रुग्णांची संख्या ३१ झाली आहे. परराज्यातून आलेले ९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
वेर्णा येेथे नवीन ३ पैकी १ आयसोलेटेड रुग्ण आढळून आला होता. या ठिकाणची रुग्णाची संख्या ४ झाली आहे.
‘त्या’ आमदारात सौम्य लक्षणे
सासष्टी तालुक्यातील कोरोनाची विषाणूची बाधा झालेल्या आमदाराची प्रकृती स्थिर आहे. सदर आमदारामध्ये कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असून उपचार सुरू करण्यात आल्याने घाबरण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
जुवारीनगर वास्कोत नवीन २४ रुग्ण
जुवारीनगर वास्को येथे नवीन २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून जुवारीनगरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे.
राजकीय पातळीवर चिंता
भाजपच्या आमदाराला कोरोना विषाणूची बाधा झाल्याने राजकीय पातळीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या आमदाराच्या संपर्कात आलेल्या सर्व आमदार व इतर सावध झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या २४ जूनला आयोजित बैठकीला सदर आमदाराची उपस्थिती होती.
खारीवाडा येथे २१ रुग्ण
खारीवाडा येथे २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नवेवाडे येथे नवीन ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ३५ झाली आहे. बायणा येथे आणखी ४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. बायणातील रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. सडा येथे आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून रुग्णांची संख्या ६३ झाली आहे.
फोंड्यात दोन पोलीस पॉझिटिव्ह
फोंडा पोलीस स्थानकावरील तिघांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. फोंडा पोलीस स्थानकावरील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर पोलीस स्थानकावरील सर्व कर्मचार्यांची कोविड चाचणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात पोलीस स्थानकाच्या प्रमुख पोलीस अधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.