यापूर्वी केलेल्या आपल्याच विधानाशी फारकत घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नसल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग झालेला आहे असे मी यापूर्वी म्हटले होते. मात्र त्या संबंधी बारकाईने अभ्यास केल्यानंतर राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला नसल्याच्या निष्कर्षावर आपण आलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत अशा भागांत गेलेल्या लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात कोरोनाचा असा एकही रुग्ण नाही ज्याने अथवा त्याचा कुटुंबीयांनी प्रवास केलेला नाही आणि त्याला कोरोना झालेला आहे. जे फिरले अथवा त्यांच्या कुटुंबातील लोक फिरले अशाच लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनामुळे राज्यात चौथा बळी
मंगळवारी रात्री उशिरा कोरोनामुळे राज्यात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ४ झाली आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मात्र मृत्युमुखी पडलेल्या चारही रुग्णांना अन्य वेगवेगळी गंभीर स्वरूपाची दुखणी व आजार होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी निधन झालेल्या चौथ्या रुग्णाला गोमेकॉच्या विलगीकरण वॉर्डातच कोरोनाचा संसर्ग झाला असावा. त्याला त्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
‘त्या’ आमदारासोबत
८ दिवसांपूर्वी बैठक
दरम्यान, दक्षिण गोव्यातील ज्या आमदाराला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे त्याच्यासोबत आम्ही शेवटची बैठक आठ दिवसांपूर्वी झाली होती. त्यावेळी आपण त्याच्यापासून सामाजिक अंतर ठेवले होते. आपण आपल्या संपर्कात येणार्या सर्वांशी सामाजिक अंतर ठेवत असल्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला.